अमळनेरात पेट्रोल-डिझेलसाठी नागरिकांची वणवण; पंपांवर वाहनांच्या रांगा
अमळनेर : विक्की जाधव.
शहरात गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांना अक्षरशः वणवण फिरण्याची वेळ आली आहे. शहरातील अनेक प्रमुख पेट्रोलपंपांवर इंधन उपलब्ध नसल्याने वाहनधारक त्रस्त झाले असून, रोजच्या कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. सकाळपासूनच अनेक वाहनचालक पेट्रोलच्या शोधात एका पंपावरून दुसऱ्या पंपावर फिरताना दिसत आहेत.
शहरातील बोहरी पेट्रोलपंप, प्रशांत निकम यांचा पेट्रोलपंप, पैलाड भागातील कृष्णा पेट्रोलपंप, नायरा पंप तसेच इंडियन ऑइलचे बजरंग शेठ यांच्या पंपावर पेट्रोल-डिझेल मिळेनासे झाल्याची परिस्थिती आहे. काही ठिकाणी इंधन आले असल्याची माहिती मिळताच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. अनेक वाहनचालक तासन्तास प्रतीक्षा करूनही रिकाम्या हाताने परत जात असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, अचानक निर्माण झालेल्या या इंधन संकटामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था, छोटे व्यावसायिक, शेतकरी तसेच रोजंदारीवर काम करणाऱ्या नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून इंधन पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. “पेट्रोलसाठी फिरा आणि कामधंदा सोडा” अशी अवस्था अमळनेरकरांची झाली असून, संबंधित विभाग मात्र अद्याप ठोस भूमिका घेताना दिसत नसल्याची चर्चा शहरभर सुरू आहे.