करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- सामाजिक बांधिलकी आणि जनसेवेचा वारसा जपत, कै. बाबुराव (तात्या) गायकवाड प्रतिष्ठानच्या वतीने करमाळा शहरात शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी ‘आरओ फिल्टर पाणी प्लांट’ कार्यान्वित करण्यात आला आहे. गुरुवारी दि. २ एप्रिल रोजी सकाळी ११:०० वाजता छत्रपती चौक, भवानी नाका येथे या प्लांटचे भव्य उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.
सचिन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कै. बाबुराव (तात्या) गायकवाड प्रतिष्ठानने करमाळ्यात अनेक स्तुत्य उपक्रम राबवले आहेत. यापूर्वी प्रतिष्ठानने ‘माणुसकीची भिंत’ हा अनोखा उपक्रम राबवून गरजूंना मदतीचा हात दिला होता. यासोबतच वेळोवेळी आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे आणि तळागाळातील कर्मचाऱ्यांचा सन्मान करून समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. आता वाढत्या उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन नागरिकांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
या उद्घाटन समारंभास करमाळ्यातील सर्व नगरसेवक, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. “समाजातील शेवटच्या घटकाचा विचार करून प्रतिष्ठान करत असलेले कार्य प्रेरणादायी आहे,” अशा भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या.
या उपक्रमामुळे करमाळा शहरातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची मोठी सोय झाली असून, सचिन गायकवाड यांच्या सामाजिक कार्याची मोहोर अधिक गडद झाली आहे.