. . . कर्मयोगीचा महिला दिन कृतीतून साजरा..
जागतिक महिला दिनी २५ सायकल वाटपाचा दुसरा टप्पा..
खरोखरच गोरगरिबांचे कैवारी म्हणजे कर्मयोगी फाऊंडेशन वनिता साखरकर अध्यक्ष राजमाता जिजाऊ लोकविद्यापीठ
कर्मयोगी तत्वाचा साक्षात्कार मला कर्मयोगीं फाऊंडेशन मध्ये झाला. इंदिरा चौधरी उपविभागीय अधिकारी नागपूर
कर्मयोगीचे कार्य अखंड चालू राहण्यासाठी नितीन लोणकर कार्यकारी अध्यक्ष उत्पादक संघटना बुटीबोरी यांचेकडून ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत..
कर्मयोगी फाऊंडेशन हे बोलते नव्हे तर कर्ते व्हा या तत्वावर कर्मयोगी गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कृतीशील विचारधारेवर सत्य सातत्य व समर्पित भावनेने काम करत आहे.
कर्मयोगीने महिला सक्षमीकरणावर मोठ्या प्रमाणात काम करतांना विधवा ताईंच्या मुलींसाठी व विशेषतः कोरोना काळात आई वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलींचा शिक्षणातील उत्साह वाढविण्याकरिता व आपल्यालाही कोणाचा तरी आधार आहे ही जाणीव करून देण्यासाठी १०१ सायकल वाटपाचा संकल्प करण्यात आला आहे. या संकल्पाचे चार टप्पे पाडण्यात आले आहे. या संकल्पाचा दुसरा टप्पा जागतिक महिला दिनी केईसी ट्रेनिंग सेंटर बुटीबोरी येथे आई किंवा वडिलांचे छत्र हरवलेल्या गरजवंत मुलींना २५ सायकली देऊन जागतिक महिला दिन कृतीतून साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्ष राजमाता जिजाऊ लोक विद्यापीठ बोपी अमरावतीच्या अध्यक्ष वनिता साखरकर उदघाटक उपविभागीय अधिकारी नागपूर इंदिरा चौधरी, प्रमुख उपस्थिती छत्रपती शिवाजी महाराज लोकविद्यापीठ अमरावती महासंचालक मंगेश देशमुख, प्रमुख उपस्थितीमध्ये उत्पादक संघटना बुटीबोरी कार्यकारी अध्यक्ष नितीन लोणकर, तसेच मनीष बंसल, मुन्ना खान, प्रकाश घवघवें, मधुकर पोटभरे, ही मंडळी व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होती…
यावेळी अध्यक्षीय भाषणात वनिता साखरकर म्हणाल्या की मी आठवी वर्ग शिकलेली आहे. गोरगरीब लोकांना कोणीच किंमत देत नाही. मला अध्यक्ष स्थान दिलेला हा माझ्यासाठी पहिलाच कार्यक्रम आहे. मी हिंमतीने पुढे येऊन बोपी येथे लोकविद्यापीठाचे काम सांभाळते, गोमूत्र अर्कचा छोटा उद्योग उभारून आजपर्यंत सात लाख रुपयांचे गोमूत्र अर्क विकले, किराणा दुकान चालविते, माझ्या मुलांना उच्चशिक्षित केलं. महिलांनी ठरविलं तर त्या काहीही करू शकतात. मला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रेम मिळालं कर्मयोगी हे खरोखरच गोरगरिबांची दखल घेत त्यांच्यासाठी कैवारी ठरत आहे.
उदघाटनिय भाषणात इंदिरा चौधरी म्हणाल्या की कर्मयोगीच्या कार्यक्रमात मला कर्मयोगी तत्वाचा साक्षात्कार झाला. अनेकांप्रमाणे मिरवणूक, इतर कार्यक्रम फक्त बोलण्यापूरते मार्यदित न ठेवता या गरजवंत मुलींना गरजेच्या वेळी सायकल उपलब्ध करून महिला दिन कृतीतून साजरा केला आहे. सायकल हे आपल्या आयुष्याच्या गतीच चक्र आहे. त्यामुळे ही सायकल या मुलीच्या आयुष्याला गती देणार आहे आता तुम्ही जोमाने मेहनत घेऊन प्रगती करा असा त्यानी यावेळी मुलींना संदेश दिला.
प्रमुख उपस्थिती मध्ये लाभलेले नितीन लोणकर यांनी महिला दिनाची विस्तृत माहिती दिली व कर्मयोगी फाऊंडेशन जे लोककल्याणाचं काम करत आहे त्यात कोठेही खंड पडू नये म्हणून आपल्याकडून ५१ हजार रुपयांची मदत केली.
या कार्यक्रमाला रामटेक पं. स. सदस्य रामकृष्ण वरफडे, उमरी रामटेक सरपंच कविता राऊत, ग्रामसेविका सरला चिमोटे, पत्रकार, सुभाष राऊत, संदीप बलविर, मनोज हिरुळकर इतर गणमान्य मंडळी व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कर्मयोगी फाऊंडेशन परिवारातील मंडळींनी मोठ्या प्रमाणपंख यशस्वी मेहनत घेतली….