सन २०२२ च्या ७५व्या कान फिल्म फेस्टिवल मध्ये सांगलीजिल्ह्यातील खंबाळे (भा.) या छोट्याशा खेड्यात जन्मलेल्या दिलीप मालन बाळकृष्ण यांच्या ‘खेंगाट’ या चित्रपटाची निवड नुकतीच अधिकृत निवड यादीमध्ये झाली असल्यामुळे सर्वच थरातून त्यांच्या वरती अभिनंदनाचा वर्षाव होतोय.. आमचे प्रतिनिधी.. यांनी त्यांच्याशी केलेली बातचीत..
आमच्या वाचकांना एकंदरीत तुमच्या प्रवासाबद्दल जाणून घ्यायला आवडेल..
सामाजिक, आर्थिक, आणि कौटुंबिक स्तरावर सतत ससेहोलपट होत असणाऱ्या, एका गावकुसाबाहेर राहणा-या गरीब अशिक्षित अशा आई बाबांच्या पोटी माझा जन्म झाला.. परिस्थितीचे चटके पाचवीला पुजलेले.. सामाजिक स्तरावर सततची गळचेपी ठरलेली.. आपण जन्माला का आलो..? खरंच आपण माणूस आहोत का..? अशा काही प्रश्नांना ही प्रश्न पडावा अशी परिस्थिती.. त्यावेळी माझे बाबा ज्यांना आम्ही बाप्पा म्हणायचो ते सायकल वरुन गावोगावी फिरून ढेकूण पिसवाचे औषध विकायचे.. आणि त्यातून येणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नावर आम्हचं कुटुंब कसंतरी चालायचं.. खाणारी तोंड दहा कमावणारे एकटे.. ढकलगाडी सारखं कसंतरी आयुष्य चाललेलं.. जिवंत असूनही आम्ही मेल्याहून मेलेलो होतो.. रुढीनं चालत आलेल्या नशिबाला दोष देण्याशिवाय पर्याय नव्हता.. अशातचं मी महाविद्यालयीन जीवनात प्रवेश केला.. आणि माझी ओळख साहित्याच्या माध्यमातून फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारेशी झाली..
चित्रपट करायचा हे कधी ठरवलं आणि तयारी कशी सुरू झाली..
आपण चित्रपट करायचा हे साधारण तीस वर्षांपूर्वीच ठरलेलं होतं.. जेव्हा मी महाविद्यालयीन शिक्षण घेत होतो.. महाविद्यालयात बालाजी वाघमोडे, महेश बनसोडे असे काही समविचारी मित्र होते.. आमच्यात सतत चित्रपटा बाबत चर्चा व्हायची.. परंतु चित्रपट बनवण्यासाठी आर्थिक तरतूद नसल्यामुळे, आणि समाजातील कुणीही दानशूर पाठीशी नसल्यामुळे चित्रपट हे माझ्यासाठी स्वप्नचं होतं.. जेव्हा ‘खेंगाट’ ची तयारी सुरु झाली तेव्हाही आर्थिक संघर्ष होताच.. यावेळी मात्र संदीप डांगे या मित्राच्या माध्यमातून संदीप जाधव हा मित्र भेटला.. सह निर्माता म्हणून तयारी दर्शविली आणि काम सुरू झाले.. पुढे सुनील दादा जगदाळे, बाळासाहेब पवार, आण्णासाहेब शिंदे या सर्वांच्या साथीने आणि माझ्या सर्वच कलाकार बंधू भगिनींनी केलेल्या सहकार्याने, चित्रपट सुरू झाला.. मी चालू लागलो.. चित्रपटाचे डिओपी तुषार विभूते, संगीतकार संजय महादेवन, डॉ. निरज लांडे, राहुल गुरव, केदार कुलकर्णी अशी काही सहृदय माणसे भेटत गेली.. आणि चित्रपट पूर्ण झाला..
आपला देश हा मुळातच अनेक समस्यांचे भांडार आहे.. स्वातंत्र्यानंतर यामध्ये थोडासा बदल होईल असे वाटले होते परंतु, वैयक्तिक स्वार्थ, प्रबळ इच्छाशक्तीचा अभाव, आणि प्रत्यक्ष कृती पेक्षा दिखाऊ पणाचे चोचले इत्यादी कारणांमुळे आजही आपण जैसे थे आहोत.. त्यातच भारतीय चित्रपट निर्माते हे धाडसी नसल्यामुळे संस्कृतीच्या नावाखाली तथाकथित व्यवस्थेने लादलेली पिढीजात बंधने झुगारून देण्यास तयार नाहीत.. म्हणूनचं अजूनही देव,धर्म, देश, प्रेम यातून बाहेर पडलेले नाहीत.. त्याच त्या कथा आलटून पालटून मांडताना दिसतात.. खेंगाट हा चित्रपट मात्र या सरधोपट मार्गाने न जाता नव्या युगाची पायवाट निर्माण करणारा ठरेल यात शंका नाही..
लेखक, निर्माता, दिग्दर्शक अशा सगळ्याचं जबाबदा-या पार पाडणं किती आव्हानात्मक होतं..
लेखक म्हणून असणारी जबाबदारी, निर्माता म्हणून असणारी जबाबदारी,आणि दिग्दर्शक म्हणून असणारी जबाबदारी ही वेगवेगळ्या स्वरूपाची असल्यामुळे प्रत्येकाचे आव्हान हे वेगळे होते.. परंतु, आपलं जगणं हेच फार मोठं आव्हान असल्यामुळे चित्रपट लेखक, निर्माता, दिग्दर्शक या आव्हानांचा तितकासा फरक जाणवला नाही.. शुटींग दरम्यान मात्र रोज सकाळी समोर दहा समस्या यायच्या.. परंतु, माझ्या सोबत असणारे पडद्यावर झळकलेले आणि पडद्यापाठीमागे असणारे सर्व कलाकार बंधू भगिनीं, तंत्रज्ञ, आणि सहृदय लोकांच्या साथीने आव्हानांना मूठमाती देण्यात यशस्वी झालो आहे..
स्वतःची फिल्म कंपनी निर्माण करण्या पाठीमागे काही विषेश कारण..
हो आहे ना.. स्वतःला आवडलेल्या विषयावर जर चित्रपट निर्मिती करावयाची असेल तर स्वतःची कंपनी असल्याशिवाय पर्याय नाही..
आगामी कोणते प्रोजेक्ट विचाराधीन आहेत..
एका हिंदी चित्रपटाची जुळवाजुळव सध्या सुरू आहे.. कलाकार निवड ब-यापैकी झालेली आहे.. लोकेशन आणि प्रि प्राँडक्शनच्या काही गोष्टी चालू आहेत.. साधारण सप्टेंबर आक्टोबर मध्ये प्रत्यक्ष चित्रकरणास सुरुवात होईल..
नवीन चित्रपटाचा विषय काय असेल..
विषय इतक्यातच नाही सांगता येणार.. परंतु,निश्चितच सक्षम इंटरनॅशनल मुव्हीज या कंपनीच्या नाव लौकिकाला साजेसाचं असणार आहे.. मळलेली वाट सोडून नव्या युगाची पायवाट.. शोधणारा असेल यात शंका नाही..
‘खेंगाट’ मुळे समाधानी आहात का..
हो.. नक्कीच.. जितका छान विषय असणं, तितक्याच छान पणे तो चित्रीत होणं, हे बहुधा खूप कमी चित्रपटांच्या बाबतीत नेमकेपणाने होत असतं.. परंतु, डिओपी तुषार विभूते सोडले तर बाकी सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ या सर्व मंडळींचा खेंगाट हा पहिलाच चित्रपट आहे.. तरीही तो कसलेल्या लोकांनी बनवलेला आहे असं वाटणं हेच या चित्रपटाचे यश आहे..
कान्स सारख्या जगप्रसिद्ध फिल्म फेस्टिवल मध्ये अधिकृत निवड यादीत निवड झाल्यानंतर कसं वाटतंय..
२० सप्टेंबर १९४६ रोजी सुरु झालेल्या कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये जगभरातील निवडक चित्रपट, माहितीपट दाखवले जातात. कान्सचे भारताशी विशेष नाते आहे. १९४६ मध्येच चेतन आनंदच्या ‘नीचा नगर’ या चित्रपटापासून या पर्वाची सुरुवात झालेली आहे. कान फेस्टिव्हलमध्ये चित्रपटाचे प्रदर्शनही खूप महत्त्वाचे असते.आजपर्यंत आवारा, दो बिघा जमीन, बूट पॉलिश, पाथेर पांचाली, गाइड, सलाम बॉम्बे, उडान, लंचबॉक्स, असे काही मोजकेच चित्रपट प्रदर्शित झालेले आहेत.अशा या नामांकित फिल्म फेस्टिवल मध्ये ‘खेंगाट’ या चित्रपटाची निवड अधिकृत निवड यादी मध्ये होणं हेच आमच्या टिम साठी अभिमानास्पद आहे.. त्यामुळे खूप छान वाटतयं.. आपण घेतलेल्या कष्टाचे चिज होताना पाहून समाधान वाटतयं..