करमाळा प्रतिनिधी :- करमाळा येथे जागतिक महिला दिनानिमित्त सौ. शगुफ्ता शेख (हुंडेकरी) यांनी महिलांच्या सत्य व सद्य परिस्थितीवर समाजाच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालणारी कविता सादर करून समाजामध्ये महिलांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम केले आहे. त्यांच्या या कवितेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आजपर्यंत शगुफ्ता शेख यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील स्व लेखन स्पर्धेत सहभाग घेऊन राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळविला आहे तसेच त्यांच्या उत्कृष्ट साहित्याने समाज जनजागृती होत असल्याने त्यांच्या भावी साहित्यास व जागतिक महिला दिनानिमित्त त्यांना मार्मिक समाचार च्या वतीने खूप खूप शुभेच्छा.
…….स्त्री……..
किती निर्मळ हेतू विधात्याचा!
सृष्टीच्या सृजनशील स्त्री निर्मितीचा,
भविष्यकाळाला ओटीत फुलवणारी ,,
गतकाळाला पदरात झुलवणारी.
बेड्या ठोकल्या रूढीच्या परंपरेनं,
सशक्त झाली खरी शिक्षणानं ,,
तिच्या हाती विश्वरथाची दोरी,
पण ती सुरक्षित आहे का खरी?
भय तिला आईच्या गर्भातही,
सामूहिक अत्याचाराची बळी समाजातही,,
घराबाहेर पडणंही अवघड झालंय,
लेकीसाठी आईबापाची चिंता वाढलीय.
नुसती आंदोलनं, मोर्चे, वायदे,
नाहीतच तितके कठोर कायदे,,
जिजाऊ, सावित्री, दुर्गेला पूजून,
संपणार का अत्याचार निषेध नोंदवून?
मुलींनीच घ्यावे स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण,
मुलांनाही द्यावे संस्काराचे शिक्षण,,
बदलावी आता युवापिढीने मानसिकता,
बांधिलकीने जपूयात संवेदनशीलता.
सौ.शगुफ्ता शेख (हुंडेकरी)
मुख्याध्यापिका,
जि.प. प्रा. शाळा खडकेवाडी
ता.करमाळा (सोलापूर)