शक्ती, पैसा आणि सत्ता अपुरी ठरली; शिरीष चौधरी ठरले ‘किंगमेकर’ शहर विकास आघाडीचा पराभव नेमका कुठे झाला?
अमळनेर : पत्रकार विक्की जाधव.
अमळनेरच्या राजकारणात झालेल्या या निवडणुकीने एक गोष्ट पुन्हा सिद्ध केली मतदार सगळं पाहतो, समजतो आणि योग्य वेळी निर्णय घेतो. आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखालील शहर विकास आघाडीला पराभव स्वीकारावा लागला, तर दुसरीकडे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाने राजकीय कसब, संयम आणि भावनिक नात्याच्या जोरावर बाजी मारली.
शहर विकास आघाडीची पहिली आणि सर्वात मोठी चूक झाली ती तिकीट वाटपात. अनेक दिग्गज, निष्ठावान आणि मैदानात राबणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आले. यामुळे स्थानिक पातळीवर तीव्र नाराजी निर्माण झाली. काही कार्यकर्त्यांनी उघडपणे बंड पुकारले नाही, मात्र मागच्या दरवाज्याने शिवसेनेला अदृश्य पाठिंबा दिला, याचा थेट फायदा नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. परीक्षित बाविस्कर यांना झाला आणि ते निवडूनही आले.
तांबेपुरा सारख्या १५ हजारांहून अधिक मराठा समाजाचे मतदार असलेल्या भागात एकही मराठा उमेदवार न देणे ही शहर विकास आघाडीची आणखी एक गंभीर चूक ठरली. या निर्णयामुळे नाराजीचा सूर अधिक तीव्र झाला. परिणामी अपक्ष उमेदवार कैलास तात्या पाटील निवडून आले आणि या निकालाने शहर विकास आघाडीचे डोळे उघडले असतील, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
याच दरम्यान शहरात राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे लढण्याचा आग्रह धरला नाही, ही बाबही शिवसेनेसाठी फायदेशीर ठरली.
त्यामुळे हा पराभव केवळ शहर विकास आघाडीचे उमेदवार जितेंद्र ठाकूर यांचा नसून, खासदार स्मिता वाघ, माजी आमदार साहेबराव पाटील आणि विद्यमान आमदार तथा माजी मंत्री अनिल पाटील यांचा सामूहिक पराभव असल्याचे राजकीय विश्लेषक ठामपणे सांगत आहेत.
विद्यमान आमदारांनी फक्त आणि फक्त लक्ष्मी घरपोच वाटपावर भर देत नगराध्यक्ष आपलाच बसेल असा भाबडा विश्वास बाळगला. मात्र मतदारांनी या गणितावर पूर्णपणे पाणी फिरवले. मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधीच शहर विकास आघाडीचे काही कार्यकर्ते स्वतःच्या आघाडीविरोधात प्रचार करताना दिसले, तर काही उमेदवार फक्त स्वतःपुरतेच मत मागताना दिसले. याचा परिणाम असा झाला की अनेक दिग्गज माजी नगरसेवकांना पराभव स्वीकारावा लागला.
दुसरीकडे शिवसेनेची संपूर्ण जबाबदारी खांद्यावर घेतलेले माजी आमदार शिरीष चौधरी नंदुरबारसह अमळनेरची सूत्रे सांभाळत होते. ऐन प्रचारादरम्यान काकासाहेब हिरालाल चौधरी यांच्या आजारपणामुळे निधन झाल्याने शिरीष चौधरी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि प्रचारयंत्रणा जवळपास ५० टक्के थांबली. अशा परिस्थितीतही शिवसेनेच्या उमेदवारांना विजयाची शाश्वती नव्हती. मोठ्या धनशक्ती पुढे आपण टिकणार कसे हा प्रश्न सतत निर्माण होणार होता.
मात्र श्रीकांत शिंदे यांच्या जाहीर सभेत जेव्हा शिरीष चौधरी मायबाप मतदारांसमोर भावूक झाले, तेव्हा जणू अमळनेरच्या जनतेने ठरवले “शिरीष दादा एकटे नाहीत, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत.” या भावनिक क्षणाचा थेट परिणाम मतदानावर झाला. मतदारांनी केवळ नगराध्यक्षपदाचीच नव्हे, तर शिवसेनेचे अनेक नगरसेवकही मोठ्या संख्येने निवडून दिले.
नगराध्यक्षपदी डॉ. परीक्षित बाविस्कर आणि नगरसेवकांच्या विजयामुळे अमळनेरच्या राजकारणात शिरीष चौधरी यांचा दणदणीत कमबॅक झाला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. शहर विकास आघाडी “ही शिरीष चौधरी यांची शेवटची निवडणूक आहे” अशी वल्गना करत होती; मात्र ती पूर्णपणे फोल ठरली. वडिलांच्या निधनाने दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही अमळनेरमध्ये शिवसेना पुन्हा जिवंत करण्याचे काम शिरीष चौधरी यांनी केले.
एकूणच आमदार, खासदार आणि माजी आमदार या तिघांनी लावलेल्या शक्तीला जुगारून, माजी आमदार शिरीष चौधरी ‘किंगमेकर’ ठरले, आणि अमळनेरच्या राजकारणात अनुभव, भावनिक नातं आणि संघटनशक्ती अजूनही निर्णायक ठरते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.