पुणे ग्रामीण पोलिस दलातर्फे 51 वी कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धा दिमाखात संपन्न.
बारामती/प्रतिनिधी – वर्षा चव्हाण
पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या वतीने आयोजित 51 वी कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धा 2025 या स्पर्धांचा समारोप 21 नोव्हेंबर रोजी उत्साहात पार पडला. 17 ते 21 नोव्हेंबर दरम्यान बऱ्हाणपूर उपमुख्यालय, बारामती पोलिस उपमुख्यालय, विद्या प्रतिष्ठान मुख्य मैदान, अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट मैदान शारदानगर आणि वीर सावरकर भवन जलतरण तलाव अशा विविध ठिकाणी या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.
या वर्षीच्या स्पर्धांचे आयोजन करण्याचा मान पुणे ग्रामीण पोलिस दलाला मिळाला होता. समारोप सोहळ्यास अपर पोलिस महासंचालक व संचालक पोलिस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान व परिवहन दीपक शिवानंद पांडेय हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते, तर विशेष पोलिस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र सुनील फुलारी यांनी अध्यक्षस्थानी भूषविले.
समारोप कार्यक्रमास पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, गणेश बिरादार, तसेच सोलापूर शहराचे पोलिस आयुक्त एम. राजकुमार, साताऱ्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी, कोल्हापूर पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता आणि सांगलीचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात अकलूज येथील यमाई हलगी ग्रुप आणि बारामतीच्या तुषार मावळा ग्रुप यांच्या पारंपरिक स्वागत वादनाने झाली. प्रारंभी पुरुष व महिला 100 मीटर धावण्याच्या रोमांचक शर्यती रंगल्या. पुरुषांमध्ये साताऱ्याचे चैतन्य मरडे तर महिलांमध्ये साताऱ्याची गौरी सावंत प्रथम क्रमांकावर ठरल्या.
प्रस्ताविकामध्ये एसपी संदीपसिंह गिल्ल यांनी खेळामुळे पोलिस दलातील तंदुरुस्ती, ऐक्यभाव आणि मानसिक स्थैर्य वाढते असे सांगत सर्व स्पर्धकांचे कौतुक केले. तर विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन करून आगामी राज्यस्तरीय स्पर्धांसाठी उत्तम तयारीचे आवाहन केले. प्रमुख अतिथी दीपक पांडेय यांनी उत्कृष्ट आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करत शिस्तबद्ध परेड आणि बँड पथकाचे विशेष कौतुक केले.
या स्पर्धेत कोल्हापूर परिक्षेत्रातील 900 पुरुष आणि 250 महिला असे एकूण 1150 खेळाडू सहभागी झाले. एकूण 7 सांघिक व 12 वैयक्तिक अशा 19 स्पर्धा विविध मैदानांवर रंगल्या. स्पर्धेत पुणे ग्रामीण, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण आणि सोलापूर शहर असे 6 संघ सहभागी झाले.
स्पर्धेतील सर्वसाधारण विजेतेपद सातारा जिल्ह्याने 207 गुणांसह पटकावत मानाचा बहारदार मुकुट आपल्या नावावर केला. आभारप्रदर्शन अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार यांनी केले.
या क्रीडा महोत्सवात सर्व सामने खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले असून, पोलीस व नागरिक यांच्यात समन्वय वाढावा यासाठी स्थानिक शाळांनाही सहभागी करून घेण्यात आले होते.तसेच,पोलिस दलातील तंदुरुस्तीबरोबरच परस्पर सौहार्द वृद्धिंगत करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या स्पर्धांनी बजावले.