१२ हजारांत खाकी डागाळली! “गॅस भरायचाय… पण आधी खिसा भरा!
अमळनेर पोलिस स्टेशनहद्दीतील लाचखोरीचा थरार रात्री सामान्यां सह पत्रकारांनी ही फिरवली तपासाची चक्रे तर काहीच पोलिसांना देखील खबर नाही.
अमळनेर : विक्की जाधव
‘जनतेचे रक्षक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खाकीवर पुन्हा एकदा लाचखोरीचा काळा डाग उमटला आहे.
अमळनेर पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल अमोल पाटील आणि त्यांचा साथीदार जितेंद्र निकुंभे यांनी एका कडून गॅस रिफिलिंगच्या धंद्यात 15 हजार रुपयांची थेट मागणी केली. तपासणीदरम्यान 12 हजार रुपयांची रोकड जप्त झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
गॅस भरण्याच्या ट्रिपरवरुन सुरू झालेला हा व्यवहार थेट लाचलुचपत विभागाच्या पथकापर्यंत पोहोचला.
तक्रार दाखल होताच सापळा रचण्यात आला आणि आरोपींना रोकड रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. यानंतर पोलीस दलातील प्रामाणिक कर्मचाऱ्याच्या कपाळावर आठ्या पडल्या, तर सर्वसामान्य नागरिक कोणावर टयाप झाला असे विचारू लागले.
“खाकीचेचं दलाल झाले तर नागरिकांचा विश्वास कुठे ठेवायचा?” असा जळजळीत प्रश्न नागरिकांच्या मनात घुमू लागला आहे. एकेकाळी कायद्याचे रक्षक म्हणून आदराने पाहिल्या जाणाऱ्या गणवेशाने आज लाचखोरीच्या जाळ्यात डागाळल्याचे चित्र समोर आले आहे.
या प्रकरणात सर्वात मोठा प्रश्न असा की, हे फक्त धागे आहेत की अजूनही वरपर्यंत ‘आका’ या जाळ्यात अडकणार आहेत?
कारण, साध्या कॉन्स्टेबल पातळीवर इतक्या सहजतेने लाचखोरीचे व्यवहार होऊच शकत नाहीत. कुणाच्या तरी वरदहस्ताशिवाय एवढी निर्भय मागणी करणं शक्य आहे का? या शंकेने चर्चेला उधाण आले आहे.
नागरिकांच्या मनात आता संशय पसरला आहे की, “लाच घेणाऱ्यांना वरून टार्गेट होतं का?” म्हणजेच वरपर्यंत वाटा जातो की काय? अशा चर्चेला अधिक खतपाणी मिळाली आहे. जर ही साखळी उघडकीस आली, तर अमळनेरच नाही तर संपूर्ण जळगाव जिल्हा हादरून जाईल, यात शंका नाही.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मात्र, या तपासातून केवळ तळागाळातील आरोपींनाच शिक्षा होणार की या ‘लाचखोरीच्या रॅकेट’मागील खरे सूत्रधार बाहेर येणार, हा प्रश्न कायम आहे.
दरम्यान, या घटनेने अमळनेर पोलीस स्टेशनची प्रतिमा कलंकित झाली असून, प्रामाणिक पोलीस अधिकारीही यामुळे तोंड लपवत आहेत. खाकीच्या सन्मानासाठी ‘निःपक्षपाती आणि निर्भीड कारवाई’ हीच वेळेची गरज असल्याची मागणी जनतेतून होत आहे.