“भांडेवाटप योजनेत अडथळे; अमळनेरमध्ये महिलांचा उद्रेकमहिलांचा जमाव थेट आमदारांच्या निवासावर”
अमळनेर : विक्की जाधव
महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगारांसाठी सुरू केलेल्या भांडेवाटप योजनेबाबत अमळनेर तालुक्यात मोठी उदासीनता आणि गैरव्यवहार समोर येत आहेत. महिलांना वारंवार भांडीवाटपासाठी बोलावून पुन्हा परत पाठवले जात असून, केवायसीच्या नावाखाली 500 ते 700 रुपयांपर्यंत वसुली केली जात आहे, अशी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. दिवसभरात 50 ते 100 महिलांची केवायसी केली जाते आणि त्यातून मोठा काळा धंदा फोफावत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे.

महिलांच्या या संतापाला अखेर मोर्चाच्या रूपाने आवाज मिळाला. तब्बल 50 ते 100 महिलांनी आमदार अनिल पाटील यांच्या घरासमोर ठिय्या देत महिलांना होणाऱ्या त्रासाविषयी थेट बोलून दाखवले. “आम्हाला शासनाचा लाभ मिळायला हवा; पण कॉन्ट्रॅक्टर आणि काही सायबर कॅफेवाल्यांच्या संगनमतामुळे पैशांची लूट चालू आहे,” असा थेट आरोप महिलांनी केला.
या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोक आधार पाटील यांनी महिलांचे म्हणणे ऐकून घेतले आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टरशी बोलून लवकरात लवकर भांडीवाटप करण्याचे आश्वासन दिले. तरीसुद्धा महिलांच्या मनातील अस्वस्थता आणि शासन योजनेंतर्गत चाललेला भ्रष्टाचार यामुळे तालुक्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.
“भांडेवाटप योजनेतून हक्काची भांडी मिळणार की दलालांचा खिसा भरणार?” — हा प्रश्न महिलांच्या ओठांवर आहे.