जराडवाडी येथे भीषण अपघात; दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू, एक महिला गंभीर जखमी
प्रतिनिधि/वर्षा चव्हाण
बारामती, ता. २२ जुलै – संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर बारामती तालुक्यातील जराडवाडी हद्दीत रविवारी (दि. २० जुलै) सायंकाळी साडेचारच्या सुमारास दोन दुचाकी समोरासमोर धडकल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, एक महिला गंभीर जखमी झाली आहे.
मृतांमध्ये शरद (नाना) दत्तात्रेय मोरे (वय ३६, रा. सोनवडी सुपे, ता. बारामती) आणि ज्ञानेश्वर बबन वलेकर (वय ४२, रा. दहीगाव, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांचा समावेश आहे. अपघातात अक्कामाई ज्ञानेश्वर वलेकर (वय ३९) या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर बारामतीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्प्लेंडर दुचाकी (क्र. एम. एच. ४२ व्ही ३२१९) बारामतीच्या दिशेने येत असताना, समोरून येणारी होंडा अॅक्टिव्हा दुचाकी (क्र. एम. एच. १४ जे. जी. ९२०६) पाटसच्या दिशेने जात होती. आठवा मैल जवळील जराडवाडी परिसरात या दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेचा आवाज एवढा भीषण होता की, परिसरात काही वेळ भीतीचं वातावरण पसरलं.
या मार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, पंधरा दिवसांपूर्वी याच ठिकाणी आणखी एक भीषण अपघात झाला होता. त्या अपघातात टाटा टिगोर कार आणि दुचाकीमध्ये झालेल्या जोरदार धडकेत दोन जणांचा मृत्यू झाला होता. कार दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने गेल्याने ही दुर्घटना घडली होती. त्या अपघातात कारचालकाचं शीर धडावेगळं झालं होतं.
या अपघातांनी पालखी महामार्गावरील सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, स्थानिकांनी रस्त्यावरील वाहतूक नियंत्रणासाठी अधिक कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.