पाडळसरे धरण प्रकल्पाला गुंतवणूक बोर्डाची मंजूरी; श्रेयवादाच्या लढाईत राजकीय वातावरण तापले..
अमळनेर : विक्की जाधव
तालुक्यातील बहुप्रतीक्षित पाडळसरे धरण प्रकल्पाला नुकतीच गुंतवणूक बोर्डाची (PIB) मान्यता मिळाली आहे. ही माहिती आमदार अनिल पाटील यांच्या कार्यालयातून काही पत्रकारांना देण्यात आली. मात्र, ही मान्यता नेमकी कुणाच्या पाठपुराव्यामुळे मिळाली, यावरून अमळनेरमध्ये राजकीय घमासान पेटले आहे. तर अशी मान्यता खरच मिळाले असेल तर पत्रक का प्रसिद्ध केले नाही. बैठक होण्याचा आधीच गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले कार्यकर्ते यांनी संपूर्ण अमळनेर शहरात जाहीर करून दिले की जणू आमचा नेता आजच पाडळसरे धरण आजच पूर्णत्वास नेईल.
(या संदर्भात बऱ्यांच विभागांच्या मान्यता घ्यायच्या आहेत मग एवढा उतावीळपणा का ?)
सत्ताधारी भाजपच्या खासदार स्मिता वाघ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार अनिल पाटील यांनी “धरण मंजुरीमागील खरा शिल्पकार मीच ” असा दावा करत सोशल मीडियावर आपआपले पुरावे मांडण्याची चढाओढ सुरू केली आहे.
एकीकडे स्मिता वाघ यांच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ना. गुलाबराव पाटलांपर्यंत सर्वांचे आभार मानणारे पत्रक प्रसिद्ध केले, मात्र त्यात स्थानीक आमदार अनिल पाटील यांचे नाव मात्र पूर्णपणे वगळले गेले. दुसरीकडे, अनिल पाटील यांच्या समर्थकांनीही आपल्या आमदारांनी सातत्याने पत्रव्यवहार, पाठपुरावा केल्याचे दाखवत ‘जाणू त्यांनीच मान्यता मिळवून दिली’ असा जोरदार दावा केला यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.
राजकीय क्षेत्रात यामुळे एक नवा “श्रेयवादाचा खेळ” रंगला आहे.
“तुम्ही लोकप्रतिनिधी आहात म्हणजे पत्रव्यवहार केला हे गृहित धरलेच जाते; पण ‘मी म्हणजे मीच’ हे योग्य नाही, आपण जनतेचे सेवक आहोत, हे भान ठेवा,” असा अप्रत्यक्ष टोला एका वरिष्ठ नेत्याने मारल्याची चर्चा आहे.
या सर्व गदारोळात, पाडळसरे धरण लवकरात लवकर साकारावे ही जनतेची अपेक्षा आहेच, पण राजकीय श्रेयासाठी सुरू असलेले हे नाटक मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित करते – जनतेच्या कामात खरोखर झोकून देणं महत्त्वाचं की त्याचं श्रेय घेणं?