March 28, 2025 12:22 pm

कुणी निंदा कुणी वंदा स्पष्ट बोलणे व लिहिणे हाच माझा फंडा !

अपनी भाषा में पढ़े! Translate

कुणी निंदा कुणी वंदा
स्पष्ट बोलणे व लिहिणे हाच माझा फंडा !
बरेच दिवस मी समाज माध्यमांवर व्यक्त होत नव्हतो. याचा अर्थ मी वैफल्यग्रस्त वगैरे नव्हतो.तर मी आत्मचिंतन करीत होतो. मी पक्ष प्रमुखांची भेट मागणे व त्यासाठी सात महिने तितिक्षा करणे योग्य की अयोग्य ? मी ५२ वर्षांपासून शिवसैनिक म्हणून कार्यरत आहे.माझी काम करण्याची ,बोलण्याची इतकेच नव्हे तर वागण्याची पद्धत खास आहे. त्यात मालवणी खाक्या म्हणा किंवा ठाकरी बाणा असतो. किंवा त्याहून पुढे जाऊन त्यास सडेतोडपणा असेही म्हणू शकता. माझी पत्रकारिता लांगूलचालन करणारी नव्हती व कधीच नसेल. परखडपणा हा माझ्या पत्रकारिता व लेखनाचा आत्मा आहे.
सद्याचे युग हे खुशमस्क-यांचे आहे. गुडी गुडी वातावरण आहे.तू मला भाऊ बोल मी,मी तुला आबा/बाबा म्हणेन. तू माझ्या चुकांवर पांघरूण घाल मी तुझ्या घोडचुकांवर चादर घालतो. आपण दोघे भाऊ मिळून लोणी खाऊ ! हे आजच्या यशस्वीतेचे गमक मानले जात आहे.
स्पष्टवक्तेपणा, सडेतोडपणा हा आजच्या काळात गुण नव्हे तर अवगुण मानला जात आहे. त्यामुळे माझ्या सारख्या स्पष्ट बोलणा-याला खलनायक ठरवले जाते. आणि चमचेगिरी व भाटगिरी करणारे बडवे नेत्यांच्या गळ्यातील ताईत ठरतात.त्यांचा खोटा दिखावा,पांघरलेला मुखवटा खरा मानून त्यावर नेतेही मोहित होतात.
मी गेली ३ वर्षे सातत्याने पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची व पक्षाची पाठराखण एकतर्फी करीत आहे.गद्दार मामु एकनाथ शिंदे एण्ड कंपनी विरोधात प्रखर टीका करीत आहे तेही त्यांच्या बालेकिल्यात राहून. माझ्या वर गुन्हा दाखल झाला,मला जीवे मारण्याची धमकी आली, माझी दुचाकी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला.परंतू मी कधीही तसूभरही मागे हटलो नाही वा डगमगलो नाही. मी पक्षाकडून कधीही व काहीही अपेक्षा बाळगळी नाही. आज मी सत्तरीकडे झुकलो आहे.मोह, माया, पद, तिकिट व पैसा या बाबी माझ्यासाठी नगण्य आहेत. अडिच वर्षांपूर्वी दस्तुरखुद्द पक्ष प्रमुखांनी मला आमदार रविंद्र वायकर यांच्या मार्फत हवे ते पद ऑफर केले होते.परंतू मी पदासाठी नाही तर पक्ष अडचणीत असल्याने खारीचा वाटा देता यावा म्हणून पुढे सरसावलो आहे,असे विनम्रपणे मातोश्रीवर सांगितले होते.मी जीवाची बाजी लावून या प्रतिकूल कालखंडात माझ्या धारदार लेखणीने व परखड वक्तृत्वाने अडिच तीन वर्षे लढा दिला.माझे लेख छापायला कोणी धजावत नव्हता तेव्हा मी पदरमोड करून “गद्दारांना क्षमा नाही” हा लेखसंग्रह स्वखर्चाने प्रकाशित केला.मी व्यासपीठावर बोलायला उभा राहिल्यावर नेते मला चिठ्ठी पाठवून जहाल बोलू नका ! असे फर्मान सोडत असत.तरी मी माझा दांडपट्टा सुरू ठेवल्यावर काही नेते व्यासपीठावरून पायउतार होत असल्याचे अनेकांनी पाहिले आहे. एकनाथ शिंदें विरोधात बोलण्याची बिशाद नसलेले “नेते” म्हणून खुर्च्या उबवत असत.
एक बावन्न वर्षे शिवसैनिक असलेला ६८ वर्षीय तरूण पक्ष प्रमुखांकडे सात महिन्यांपासून भेटीची वेळ मागतो व ती टाळली जाते. कारण झारीतील शुक्राचार्यांचे व बडव्यांचे बिंग फुटण्याची भीती होती.म्हणून मला पक्ष प्रमुखांच्या नजरेत खलनायक बनविण्याचे प्रयत्न यशस्वी ठरले असावेत.
मला मातोश्रीचे अप्रुप नाही मी १९७५ पासून मातोश्री वर सन्मानाने जात आलो. बाळासाहेब व मिनाताईंनी मला जुन्या मातोस्रीच्या पहिल्या मजल्यावर नेऊन वाचनालयासाठी गोणीभर पुस्तकं दिली होती.बाळासाहेबांशी चर्चा करायला मी दिघे साहेबांसोबत जात असते.एक दोन वेळा तर बाळासाहेबांनीच तोडगा काढला होता. त्यावेळी आदित्य ठाकरेंचा जन्मही झाला नव्हता. एकदा बाळासाहेब आजारी असताना ९३ साली खुद्द उद्धव ठाकरे यांनी उल्हासनगर पक्षांतर्गत विषयावर निर्णय घेऊन पक्षविरोधी कार्य केल्याबद्दल तत्कालीन शहर प्रमुख चंद्रकांत बेडारे व शहर उपप्रमुख संभाजी पाटील यांना पक्षातून निलंबित केले होते. मी दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आल्यावर खुद्द मातोश्री मीनाताई ठाकरे यांनी औक्षण केले होते. त्यामुळे मातोश्रीचे मला अप्रूप आहे किंवा भेटीची ओढ वा आसक्ति आहे असे मुळीच नाही.
राज ठाकरे हे तर २००२ साली माझ्या घरी येऊन गेले होते नंतर निवडणूक प्रचार सभा झाली होती. ते सामना त नेहमी भेटत.त्यांचे पिताश्री जे मार्मिक मध्ये शुद्धनिशाद या नावाने सिनेप्रिक्षान लिहित त्यांच्या शिवाजी पार्क जवळील सेनापती बापटांच्या पुतळ्याजवळ असलेल्या श्रीकांत जी ठाकरे यांच्या निवासस्थानी तीन वेळा भेटलो होतो. शिवसेनेच्या बहुतांश नेत्याच्या भेटीगाठी मी अनेक वेळा घेत असे.
अशा परिस्थितीत मी पक्षप्रमुखांची
रितसर भेट मागितली होती. मी इतरांसारखी घुसखोरी करून भेट घेऊ शकलो असतो. परंतू मी शिस्तीत व सन्मानापूर्वक भेट मागितली होती.माझ्या सारख्या ज्येष्ठ व समर्पित शिवसैनिकास सात महिने पक्ष प्रमुख भेट देत नाहीत,या मुळे माझा स्वाभिमान दुखावला गेला. त्यामुळे माझा संयम सुटला व मी माझ्या परखडपणाने नाईलाजास्तव लेख लिहिला. नेमके याच लेखाचे भांडवल केले गेले व विरोधकांनी बागुलबुवा केला.काही स्थानिक स्वयं घोषित मला मारण्यासाठी शोधत आले होते. एरवी ही बांडगुळं कुठे लपतात ? खुद्द पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे अश्लील व्यंगचित्र प्रकाशित करणाऱ्या संघीया विरोधात पोलीस तक्रार करायला कोणी धजावले नाही. पक्ष प्रमुखांचा वाढ दिवस वा पक्षाच्या वर्धापन दिनी बॅनर न लावणारे व स्वतःच्या वाढदिवसाला अडिच लाखांचे बॅनर लावणारे स्वतःला नेते म्हणवतात व मातोश्रीवर चमकेशगिरी करतात.
मी पक्षप्रमुखांची भेट का मागितली होती ? मला मातोश्री पहायची होती का ? मी उद्धव ठाकरे यांना आयुष्यात कधी पाहिले नव्हते म्हणून मला पक्ष प्रमुखांच्या भेटीची ओढ होती का ? तर मुळीच नाही.
मला पद हवे होते का ? ज्या व्यक्ती ने ५२ वर्षात पदाची अभिलाशा धरली नाही त्याला पदाची काय गरज ? मग मला उमेदवारी हवी होती का ? मुळीच नाही.
मग भेटीचा अट्टाहास का ?
कल्याण लोकसभा मतदार संघात विशिष्ट लोकांची मक्तेदारी झाली आहे.सवते सुभे निर्माण झाले आहेत. एकाच कुटुंबात किती पदाधिकारी असावेत ? एकाच व्यक्तीला किती पदं आणि किती वर्ष द्यायची. पदाधिका-यांची काही कालमर्यादा असावी, दुहेरी निष्ठा बाळगणारे कसे ओळखणार ? पक्ष सोडून जाई पर्यंत आपण त्यांना पदावर का ठेवावे ? याच पदाची शिडी करून ते गद्दारी करतात.यावर काय उपाय योजना करता येईल? विधानसभा व लोकसभा निवडणूकीत जे पराभूत झाले त्यांना पुन्हा महापालिकेत उमेदवारी देणे योग्य ठरेल का ?
यासारखे पक्षहिताचे अनेकस प्रश्न होते.
यात माझा स्वार्थ असलेला एक तरी प्रश्न होता का ?
माझ्या एका शब्दाचा बाऊ करून माझी भेट नाकारली परंतू मी सात महिने प्रतिक्षा केल्यानंतर माझ्या भावनांचा उद्रेक झाल्यास त्याला मी एकटाच जबाबदार कसा ? भेट वेळेवर झाली असती तर ही कटूता टाळता आली नसती का ? आत्ता भेटीची निकड उरलेली नाही.
मी पक्ष निष्ठ आहे व्यक्ति निष्ठ नाही.माझा पक्ष बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही संघटना आहे. ठाकरी बाणा हा माझ्या लेखणीचा बाणा व कणा आहे.
पक्षहितासाठी लिहिताना मला कोणी “खलनायक” ठरवत असेल तर मला काही फरक पडत नाही.
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ शिवसैनिक
९८२२९०२४७०

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!