हा तर धर्मवीर आनंद दिघेंसह हिन्दूधर्माचा घोर अपमान !
आत्ता शुद्धिकरण कोणाचे करायचे ते तुम्हीच ठरवा !
काल ठाण्यात शिवसेनेचा पहिला सुसंवाद मेळावा सुशाकात (निवांतपणे) पार पडला. शिवसैनिक ही मोठ्या प्रमाणात नेत्यांची भाषणं ऐकण्यासाठी एकवटले होते. जल्लोशात घोषणाबाजी झाली. आमदार भास्कर जाधव नेहमीच्या तडफदार भाषेत एकनाथ शिंदेंवर तुटून पडले.संजय राऊतही बोलले. नेमका सुसंवाद काय साधला गेला ? सुसंवाद झाला की नुसते एकतर्फी भाषणबाजी हे कळले नाही.वृत्तपत्रांतील बातम्यांत (सुसंवाद) शिवसैनिकांची मनोगतं ऐकली गेली नाहीत.फक्त नेत्यांनी प्रोत्साहनपर व शिंदे विरोधात भाषणं झाल्याचेच आढळून आले. संवाद हा दोन व्यक्तीत होत असतो.एकाने बोलायचे व सर्वांनी ऐकायचे व टाळ्या पिटायच्या याला सुसंवाद तरी कसा म्हणायचा ? त्यातल्या त्यात एक समाधान आहे की नेते त्यांच्या वातानुकूलित केबीनमधुन बाहेर पडू लागले.
या सुसंवाद मेळाव्यास एकनाथ शिंदे समर्थकांनी ठरवून अपशकून केला. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या अर्धपुतळ्यास शिवसेनेच्या नेत्यांनी आदरांजली म्हणून वाहिलेली भगवी शाल जी हिंदू धर्माचे प्रतिक आहे ती काढून फेकून दिली व पायदळी तुडवली. हा निव्वळ दिघे साहेबांचाच नव्हे तर हिंदू धर्माचा अपमान आहे. मुळात धर्मवीर आनंद दिघे साहेबांना अभिवादन करण्यापासून रोखणारे हे कोण मोठे बाजीराव लागून गेले ? दिघे साहेबांचे नाव चोरले,दिघे साहेबांचा आनंद आश्रम बळकावला म्हणजे तुम्ही दिघे साहेबांचे मालक झालात का ? त्यांच्यावर तुमची मक्तेदारी आहे का ? तर मुळीच नाही.या उलट मी तर म्हणेन एकनाथ शिंदे यांनी दिघे साहेबांचे नाव, प्रतिष्ठा व पावित्र्य बाटवले आहे. गद्दारांना क्षमा नाही म्हणणा-या व गद्दाराचा खोपकर करणा-या दिघे साहेबांचे नाव गद्दारांनी घेण्याचा अधिकार त्यांना आहे का ? हे त्यांनी दिघे साहेबांच्या पवित्र स्मृतिस स्मरून सांगावे. दिघे साहेबांची ढाल करून तुम्ही प्रथम ठाणेकरांना संमोहित करण्याचा प्रयत्न केला. ज्या दिघे साहेबांनी फक्त एका वर्षात फोरव्हिलर घेणा-या नगर सेवकाची धुलाई केली त्याच दिघे साहेबांच्या बोगस व स्वयं घोषित शिष्योत्तमाने गेल्या तीन वर्षांत किती बंगले, गाड्या, सोने-चांदी, फार्महाऊस व बेनामी संपत्ती गोळा केली.पाच वर्षांत संपत्तीत किती पटीने वाढ झाली याचा विचार केला तर हे खोकेबाज दिघे साहेबांच्या चरणांजवळही उभे राहण्याच्या योग्यतेचे नाहीत.
अश्या भ्रष्ट व गद्दारांनी शिवसेनेत्या नेत्यांनी वाहिलेले पुष्पहार व भगवी शाल पायदळी तुडवून आपली औकात दाखवली. ज्या टेंभी नाक्यातून दिघे साहेबांनी भाजपला तडीपार केले, खासदारकी हिसकावून घेतली, त्याच ठाण्यात भाजपाचे नेते मोदी-शहांचे फोटो व कमळ चिन्ह असलेले बॅनर झळकावले, तेव्हा “शिंदेसुता” तुझा धर्म कुठे शेण खात होता ? ख-या अर्थाने आनंद आश्रम कोणी बाटवला असेल तर तो एकोजीपंत शिंदे यांनी. आमच्या नेत्यांनी हार घातला भगवी शाल घातली म्हणून जर तुम्ही पुतळ्याचे शुद्धिकरण करणार असाल तर तुमच्या भ्रष्ट व गद्दारीने बरबटलेल्या हाताचा स्पर्श देखील दिघे साहेबांना मान्य नसेल.
मध्यरात्री दिल्लीतील “आका” जवळ मुख्यमंत्री पद व पक्षाच्या भवितव्याची भीक मागणारे हात दिघे साहेबांनी कलम करून टाकले असते.पैसा कमवला म्हणून इभ्रत कमवता येत नाही; मंत्री पदं व सत्ता मिळूनही जनमानसाच्या ह्रदयात स्थान मिळवता येत नाही. नुकताच प्रसिद्ध झालेला छावा चित्रपट नक्की पहा.संभा अपने मौत का जस्न मनाकर चला गया और हम अपनी जीत का मातम मना रहे है ! असा काहीसा तो डायलॉग आहे. झुकेगा नाही साला ! म्हणणारे निष्ठावंत कुठे आणि सत्तेच्या तुकड्यासाठी लाचार होऊन स्वपक्षाशी द्रोह करणारे कपटी अनाजी पंत कुठे ? कितीही धनसंपदा कमवा तुम्हाला नोटांवर सोनं चांजीच्या शय्येवर जाळणार नाहीत तर लाकडांवरच जाळतील ! तुम्ही सात पिढ्यांना पुरून उरेल इतकी संपत्ती जरूर कमवली असेल परंतू तुमच्या सत्तर पिढ्या तुम्हाला “गद्दार” म्हणूनच संबोधतील.
आत्ता शुद्धिकरण कोणाचे करायचे हे तुम्हीच ठरवा.
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार
९८२२९०२४७०