बाळासाहेबांची शिवसेना कुठे आहे ?
स्वर्गीय हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कुठे आहे ? तिने हळूहळूू” संघटनेची” कात टाकत “राजकिय पक्ष” झाल्यानंतर बाळासाहेबांची शिवसेना बदलत गेली. संघटनेसाठी जीवावर उदार होऊन राडे करणारे शिवसैनिक हल्ली दिसत नाहीत.
शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यात प्रबोधनकार ठाकरे बोलले होते-
“सामोपचाराचा मार्ग गांडूंनी सांगावा !”
हे शब्द आठवतात. याच सामोपचाराला आपण ‘संयम’ हे गोंडस नाव देत आहोत.
या संयमामुळेच एकनाथ शिंदे सारखी बांडगुळं फोफावली.
मला आठवते.गेल्याच वर्षी मुंब्रा येथील शिवसेना शाखेवर शिंदेंच्या बांडगुळांनी कब्जा करून कंटेनरमधे शाखा उभारली होती. त्यावेळी त्यांना आव्हान देत खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या शाखेला भेट द्यायला आले होते.त्यावेळी मिंध्यांच्या बांडगुळांनी व लांडग्यांनी पोलीसांच्या मदतीने पक्षप्रमुख उद्धव साहेबांना रोखून माघारी पाठवले होते. त्यावेळी हजारो शिवसैनिक उपस्थित होते; त्यांनी आपल्या पक्ष प्रमुखाच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी उग्ररूप धारण करून हैदोस घालणे अपेक्षित होते,परंतू त्यांनी पक्ष प्रमुखांच्या आदेशाची वाट पाहत “संयम” पाळला.बाळासाहेबांना हा संयम व असे शिवसैनिक किंबहूना अशी शिवसेना अपेक्षित नव्हती. त्यावेळी जर उद्रेक होऊन दंगल झाली असती तर नंतरच्या लोकसभा निवडणूकीत व विधानसभा निवडणूकीत मिंधेंचे वांदे झाले असते.परंतू उद्धव साहेबांना हात हलवत परत जाऊन टिपटॉप प्लाझा या हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घ्यावी लागली! तिथेच मिंधेंनी बाजी मारली.
पाकिस्तानला भारतात विरोध दर्शवताच वानखेडेची खेळपट्टी उखडून टाकणारे शिवसैनिक हवेत. दंगलीच्या वेळी विरोधकांवर मिळेल त्या शस्त्रांनिशी तुटून पडणारे धर्मरक्षक शिवसैनिक हवे होते. सेना भवनचे रक्षण करण्यासाठी छातीचा कोट करणारे शिवसैनिक हवे होते. एक आवाज देताच मुंबई स्मशानवत शांत करणारे शिवसैनिक हवे होते. लाल
बावट्याला गाडण्यासाठी जसा भगवा गार्ड होता तसा भगवा गार्ड हवा होता. आनंद दिघेसारखा नेता “जो गद्दारांना क्षमा नाही” गर्जतो व खोपकरला यमसदनी धाडतो ! असा जिल्हास्तरीय नेता हवा आहे. हटाव लुंगी बजाव पुंगी ! सारखी आक्रमक आंदोलनं सद्या होतच नाहीत.
आज एकनाथ शिंदे गद्दारी करतो, आनंद आश्रम वर कब्जा करतो, सेनाभवन ताब्यात घेण्याच्या वल्गना करतो आणि आम्ही संयम बाळगुन आहोत. या संयमाला बाळासाहेब गांडुगिरी म्हणत.
आज मुंबईत मराठी माणसांवर परप्रांतिय हल्ले करतात;मुंबईत मराठी माणसांना घरे नाकारतात आणि आम्ही निषेधाची पुंगी वाजवत बसतो.
आमच्या वेळी दिघे साहेब बोलत- “मला मार खाणारा शिवसैनिक नको तर मारणारा शिवसैनिक हवा”. आज नेत्यांच्या मागे लाळ घोटणारे स्वतःला नेते म्हणवतात.कल्याण-टिटवाळ्यातील एक बटू वकिल तर उपरणे घालून नेत्यांच्या मागे लटपटत असतो.व्यासपिठावर घुसखोरी करतो. परंतू शिवसैनिकांच्या केसेस लढवायच्या म्हटल्या की शेपुट घालतो. काही लोक आपला व्यवसाय वाढविण्यासाठी किंवा अवैध धंद्यांच्या संरक्षणासाठी शिवसेनेची ढाल वापरतात. त्याने मला कल्याण येथील उद्धव साहेबांच्या प्रचार सभेत शिवसेनेच्या व्हिआयपी कक्षातून पत्रकार कक्षात बसण्याचा सल्ला देताच मी त्याची आयमाय काढली होती.त्या
खुषमस्क-याचा जन्म व्हायच्या आधी पासून मी शिवसैनिक आहे, याची जाणीव करून द्यावी लागली.हल्ली असे घुसखोर लोकच व्यासपिठावर मिरवतात व ज्येष्ठ प्रेक्षकांत बसून टाळ्या पिटण्यापुरते वा गर्दी पुरते वापरले जातात. मातोश्रीवर फक्त पदाधिका-यांनाच प्रवेश तर आमच्या सारख्यांना पद नाही म्हणून प्रवेश बंदी केली जाते.
बाळासाहेबांची शिवसेना अशी नव्हती.
त्यावेळी असे बडवे आडवे येत नसत.
उल्हासनगरहून शिवसैनिक आले ! असा निरोप थापा किवा नायडू यांनी दिला की सन्मानाने भेट होत असे.आज रवि म्हात्रेला वारंवार विनंती करूनही भेटीची अपॉईन्टमेंट सहा सहा महिने मिळत नाही.
त्याच वेळी दलबदलूंसाठी व खुषमस्क-यांसाठी रेड कार्पेट अंथरले जाते. १४ वर्षापुर्वी शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत बोलले होते- “आजचा शिवसैनिक व्हाईट कॉलर ( पांढरपेशा ) झाला आहे.” त्यावेळी बाळासाहेब राऊतांवर संतापले होते व शिवसैनिकांचा अपमान केल्याबद्दल त्यांची कानउघडणी केली होती. परंतू त्यानंतर काही वर्षातच राऊतांचे वक्तव्य सत्यात उतरले. आजचे काही नेते हे कॉर्पोरेट ऑफिसमधील संचालकासारखे वातानुकूलित केबिन व गाड्यांमधुन कारभार हाकतात. रस्त्यावर उतरताना आपल्या व्हाईट कॉलरला डाग लागेल, याची त्यांना भीती वाटते.तेच गाड्यांचे ताफे घेऊन मातोश्रीचे दरबारी बनतात.
सर्वसामान्य जनतेशी नाळ जुळलेले अत्यल्प नेते आहेत. बाळासाहेबांना रस्त्यावर उतरून लढणारे शिवसैनिक अपेक्षित होते. सत्ताधारी गद्दारांनी घातलेली ईडी, सीबीआय व आयटीची भीती शिवसैनिकांना घाबरवू शकत नाही परंतू सोकॉल्ड नेते मात्र घाबरून गद्दारी करतात. सर्वच नेते संजय राऊत सारखे नसतात.
जे नेते पक्ष सोडून जातात ते सर्वच गद्दार म्हणून जात नाहीत.अनेकजण पक्षांतर्गत कूरघोडी,दगाबाजी, पाडापाडी व अवहेलना सहन न झाल्याने जातात.त्यांची मनधरणी करून,राग रूसवा शांत करून पक्षाशी जोडून ठेवले पाहिजे. ज्यांना जायचे असेल त्याने जावे !असे म्हणून पक्ष वाढ होत नाही उलट पक्ष खुंटतो. समुद्र देखील ओहोटीच्या वेळी आटतो.फोडाफोडीच्या झंझावातात पक्ष टिकवायचा असेल तर नाराजांना राजी करून पक्षाशी जोडून ठेवणे ही काळाची गरज आहे. शेतकरीच शेताची राखण इमानेईतबारे करू शकतो; सालगडी वर विसंबून पक्ष चालत नसतो; हे बाळासाहेबांनी ओळखले होते.म्हणूनच ते म्हणत “शिवसैनिक हीच माझी कवचकुंडलं आहेत. ज्या रंगाची गोळी माझ्या अंगाला चाटून जाईल ती जमात जगाच्या पाठीवर शिल्लक राहणार नाही.” हे ते निष्ठावंत शिवसैनिकांच्या जीवावरच बोलत.सालगडी तर मोबदला व मानमरातब मिळेपर्यंतच थांबतात. याच गुणांमुळे बाळासाहेबांच्या देहवासनाला १३ वर्ष झाली तरी तेच शिवसैनिकांचे आराध्यदैवत म्हणून त्यांच्या ह्रदयात आहेत.आज जे शिवसैनिक उद्धव साहेबांवर जीवापाड प्रेम करतात ते बाळासाहेबांचे सुपुत्र म्हणूनच करतात.
कारण बाळासाहेबांनी त्यांच्या अखेरच्या सभेत शिवसैनिकांकडून वचन घेतले होते- तुम्ही मला जसे सांभाळले तसेच माझ्या उद्धव व आदित्यला सांभाळा ! आमच्या सारखे शिवसैनिक बाळासाहेबांना दिलेल्या वचनाला जागून अपमान,
अवहेलना व कुचंबणा सहन करूनही शिवसेनेशी एकनिष्ठ आहोत.
मी आजच्या शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना शोधत आहे. मला चंदू वाईरकर मास्तर,साबीरभाई शेख,छगन भुजबळ,आनंद दिघे, विश्वनाथ खटाटे
(बुवा),बाबु महाडिक,अशोक उर्फ काका कुलकर्णी, रमेश मुकणे सारखे कारागृहाची तमा न बाळगता शिवसैनिक म्हणून सक्रिय राहणारे शिवसैनिक अपेक्षित आहेत. (असंख्य शिवसैनिकांना ही नावे अपरिचित आहेत.) बंडखोरी करून पुन्हा सन्मानाने तिकिट मिळवणा-यांना प्रतिष्ठा मिळते,पैश्याने तिकिट व पदं देणारी शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना कशी मानू ? ज्यांचा खोपकर वा देसाई झाला पाहिजे ! असे गद्दार लोक आमच्यावर नेते म्हणून लादले जात असतील तर आम्ही स्वतः ला बाळासाहेबांचे शिवसैनिक कोणत्या तोंडाने जगाला सांगावे ?
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ शिवसैनिक
९८२२९०२४७०