अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी योजनांची प्रभावी अंमलबाजवणी करा
-अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे
(निलेश गायकवाड )
मुंबई,दि.8:-राज्यातील अल्पसंख्याक समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास करण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. या योजनांची प्रभावी अमंलबजावणी करावी, नाविन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून लोकाभिमुख उपक्रम राबवावेत अशा सूचना अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे यांनी संबधीत अधिकाऱ्यांना दिल्या. अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी निधी कमी पडू देणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
आज मंत्रालयात मंत्री श्री. भरणे यांनी अल्पसंख्याक विकास विभागाचा आढावा घेतला. यावेळी सचिव रुचेश जयवंशी, सहसचिव मोईन ताशिलदार, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. भरणे म्हणाले, अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहत आणण्यासाठी प्रयत्न करणार असून त्यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी कटिबद्ध आहे. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती योजना, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचा निधी वाढविण्यासाठी पाठपुरावा करणे, स्वयंसहायता बचतगट योजना महत्वपूर्ण आहेत. या विभागाच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा, अशी सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केली.