January 7, 2025 1:38 pm

माध्यमांनो, आपण खरच भाडखाऊ आहोत का ?

अपनी भाषा में पढ़े! Translate

माध्यमांनो, आपण खरच भाडखाऊ आहोत का ?

दत्तकुमार खंडागळे

परवा अभिनेत्री प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेवून माध्यमांना काही सवाल केले. तिची पत्रकार परिषद राजकीय होती, सामाजिक होती किंवा तिच्या अस्वस्थतेतून घेतली होती ? या पेक्षा तिने माध्यमांना जे सवाल केले आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत. त्यावर माध्यमांनी, संपादक मंडळींनी आणि तमाम पत्रकारांनी गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे. प्राजक्ता माळीने माध्यमांना जे प्रश्न विचारले आहेत ते अंतर्मुख करणारे आहेत. पण मेंदूला ब्रेकींगचा कँन्सर जडलेल्या आणि पुर्णपणे धंदेवाईक झालेल्या माध्यमांना हे समजणार कधी ? ते नशेत आहेत, धंद्याच्या आहारी गेलेत. एखादा दारूडा जसा पुर्ण दारूच्या आहारी जातो, त्याच्या पेशींनाच दारूची सवय लागते तशी माध्यमांची अवस्था झाली आहे. त्यांना प्राजक्ताच्या प्रश्नांनी काय होणार ? ज्यांचा विवेकच मेला आहे त्यांना प्राजक्ताचे सवाल कसे जागे करणार आहेत ? ही मंडळी प्राजक्ताला कसे गांभिर्याने घेणार आहेत ? त्यांना बातम्या देताना कुणाचं आयुष्य बरबाद होईल का ? कुणाच्या आयुष्याची वाट लागेल का ? आपल्या बातमीच्या परिणामाने कुणी आत्महत्या करेल का ? त्यांच्या कुटूंबावर काय बेतेल ? याचा विचार त्यांच्या मेंदूलाही शिवत नाही. बातमी सर्वात आधी गेली पाहिजे, जास्त वाचली पाहिजे किंवा जास्त पाहिली पाहिजे. त्यासाठी आम्ही वाट्टेल तसे मथळे देतो, मसाला लावतो. घाई-गडबडीत बातमी चालवतो. कसलाही कंटेट विकतो. समाजाच्या माथी मारतो. ब-या-वाईटाचा अजिबात विचार करत नाही. कारण आम्हा सर्वांच्या मेंदूला ब्रेकींगचा कँन्सर झालाय. “माध्यमं हवे तसे मथळे देतात, हव्या त्या थराला जाऊन बातम्या करतात, लोकांच्या आयुष्याशी खेळतात !” असं प्राजक्ताच मत आहे आणि हे शंभर टक्के खरं आहे.

मला इथं प्राजक्ताला काही सल्ला द्यायचा नाही, ती संघाच्या कार्यक्रमाला का गेली ? तिची राजकीय भूमिका काय आहे ? काय असावी ? या बाबतही काय बोलायचं नाही. तिची राजकीय, समाजिक जी काही मतं असतील ती तिची आहेत आणि ती असण्याचा तिचा अधिकार आहे. तो तिचा हक्क आहे. बाकी त्या मतांच्या, भूमिकांच्या ब-या-वाईट परिणामांना ती सामोरी जाईलच. त्यामुळे ती माझ्याच मताची असावी, माझ्याच राजकीय व सामाजिक भूमिकेची असावी असं अजिबात वाटत नाही. असं वाटण योग्यही नाही. ज्या दिवशी तिचे डोळे उघडतील, तिला वाटेल, तिला पटेल तेव्हा ती भूमिका बदलेल. मग तिची भूमिका डावी असो किंवा उजवी असो. हा तिचा व्यक्तीगत प्रश्न आहे. तिची कुणाशी मैत्री असेल, जिव्हाळा असेल किंवा ती कुणाच्या प्रेमात असेल याच्याशी देणघेण असण्याचा संबंध नाही. हा तिचा खासगी विषय आहे. त्यात आम्ही तोंड खुपसण्याचे कारण काय ?आमचे कॅमेरे आणि आमचे डोळे इतरांच्या बेडरूममध्ये का घालावेत ? तिच्या खासगी आयुष्यात डोकावण्याचा अधिकार इतर कुणालाच नाही. कुणी कुणावर प्रेम करायचं ? नाही करायचं ? कुठली राजकीय भूमिका ठेवायची ? हे सारं प्रत्येकाचं व्यक्तीगत स्वातंत्र्य आहे. घटणेने हे स्वातंत्र्य या देशातल्या प्रत्येकाला दिलं आहे. माध्यमातल्या लोकांनी या स्वातंत्र्यासाठी भांडायला पाहिजे. ते अबाधीत ठेवण्यासाठी लढायला पाहिजे, पण असं होत नाही. आमच्या गावाकडे स्त्री-पुरूष संबंधातून मिळणा-या पैशाला किंवा सेक्स विकून मिळणा-या पैशाला भाड म्हणतात. माध्यमं अभिनेत्रींच्या अंतर्वस्त्रांच्या, त्यांच्या प्रेमाच्या, भानगडींच्या बातम्या देऊन रोज अप्रत्यक्ष सेक्सच विकत असतात. मग माध्यमं ‘भाड’ खातात किंवा ‘भाडखाऊ’ आहेत असं म्हणायचं का ? आज माध्यमांनी सगळीच मर्यादा सोडली आहे. काही सन्मानीय अपवाद वगळता बहूतेकांनी कमरेचं कधीच सोडलय. आज मुख्य प्रवाहतल्याही आणि छोट्या-मोठ्या बहूतेक माध्यमाची डिजीटल पोर्टल पाहिली तर शिसारी येते. या पोर्टल्सवरती काय चालवतात ही मंडळी ? “मलाईकाची अंतर्वस्त्रे अशी, तिच्या आतल्या चड्डीचा रंग असला तसला, मल्लिकाने उडवली झोप, शिल्पाने केेले घायाळ, कटरिनाने लावली आग” असे मथळे देत त्यांच्या उन्मादक फोटोंसह अंतर्वस्त्रांच्या बातम्या सर्रास लावल्या जातात. त्यांच्या न झालेल्या घटस्फोटांच्या बातम्या लावल्या जातात. गत वर्षात या माध्यमांनी ऐश्वर्या रॉय आणि अभिषेक बच्चन यांना किमान शंभरवेळा घटस्फोट दिला असेल. कित्येक अभिनेत्रींना कुठे कुठे झोपवलं असेल ? याला सीमा नाही. अभिनेत्यांच्या, अभिनेत्रींच्या, नेत्यांच्या व राजकारणात काम करणा-या महिलांच्या भानगडीच्या बातम्यांचा तर सडा पडलेला असतो. हे असंल आम्ही रोज विकतो.

माध्यमांची जी अवस्था आहे त्या पेक्षा वाईट समाज माध्यमांची आहे. समाज माध्यमांची स्थिती पाहिली की सध्याच्या समाजाचे मन काय आहे ? त्याची मानसिकता काय आहे ? त्याची लायकी काय आहे ? ते नेमके समजते. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. इथं शत्रूंच्या लेकी-बाळींचाही सन्मान केला गेला. हा महाराष्ट्राचा वारसा आहे. पण सध्या तो अस्ताला गेला आहे. समाज माध्यमात रोज विरोधी विचारांच्या महिलांचे धिडवडे काढले जातात. यात उजव्या विचारांचे लोक खुपच आघाडीवर असतात. “यत्र नार्यस्तू पुज्यन्ते, तत्र रमन्ते देवत:” असं बोंबलणारे संस्कृतीचे रक्षक रोजच समाज माध्यमातून महिलांचे लचके तोडत असतात. मग ती सोनिया गांधी असो किंवा एखादी अभिनेत्री. विरोधी विचारांची असली की तिचे लचके तोडायला सरसावलेच. या भामट्यांची संस्कृती हिच आहे. त्यांच्याकडून अपेक्षाच करू शकत नाही पण दुस-या बाजूने संघावर रोज हल्ला चढवणारे, स्वत:ला पुरोगामी समजणारेसुध्दा कमी नाहीत. प्राजक्ता माळी प्रकरणात यातल्या अनेकांनी प्राजक्ताच्या कथीत प्रकरणात तृप्ती मिळवण्याचा प्रयत्न केला. स्वत:ला शवमण्याचा प्रयत्न केला. जिथं शत्रूंच्या स्त्रियांचा सन्मान होत होता तिथं आपल्याच लेकी-बाळींनाही सोडलं जात नाही. प्राजक्ता कुठल्या विचाराची आहे ? कुणाच्या स्टेजवर जातेय ? हे पाहून आम्ही तिचा सन्मान करणार का ? ती विरोधी विचारांची असली किंवा आपल्या विचारांची नसली तरी महाराष्ट्राचीच लेक आहे याचं भान ठेवायला हवे. संघोटे असंच वागतात तोच त्यांचा संस्कार आहे. त्यांच ‘स्त्री दाक्षिण्य’ विकृत आहे. ‘देवी’ म्हणायचं आणि हळूच झोपवायच, सोईने तिचे लचके तोडायचे, हा त्यांचा संस्कारच आहे. किमान शिवराय, शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेणारांनी तरी जबाबदारीने वागावे. त्यांनी तर आपली मर्यादा सांभाळावी. राजकीय द्वेषाने आम्ही इतके पछाडत चाललो आहोत की आम्हाला या मर्यादांचेही भान राहिले नाही. सगळ्यांनीच कमरेच सोडलं आहे. अवघा समाजच असा नंगापुंगा होतोय. मग अशा समाजातली माध्यमं भाडखाऊ नसतील तर त्यात नवल कसले ? अशा समाजातले नेते, अधिकारी, अभिनेते किंवा इतर लोक सुतळाक कसे असणार ? हा खरा प्रश्न आहे.

दत्तकुमार खंडागळे संपादक वज्रधारी, मो. 956151006

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!