कल्याण लोकसभा मतदार संघ
उप-यांच्या हवाली !
ज्येष्ठ शिवसैनिक
होणार उप-यांच्या पालखीचे भोई !
कल्याण लोकसभा मतदार संघात लोकसभा निवडणूकी पाठोपाठ विधानसभा निवडणूकीतही दारूण पराभवास सामोरे जाण्याची नामुश्की पत्करावी लागली. या नंतर देखील विनायक राऊत असो की संपर्क नेते गुरूनाथ खोत यांचे डोळे उघडले नाहीत.या दोन नेत्यांनी स्थानिक नेत्याचे बटिकत्व पत्करल्यासारखे वागत होते.
या पुर्वीचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे (भाऊ) यांनी शिदे गटाच्या ब्लॅकमेल टॅक्टीसचे बळी पडून शिदेसेेनेत सामील झाले.त्यामुळे रिक्त झालेल्या जिल्हाप्रमुख पदी पर्यायी सक्षम शिवसैनिक उपलब्ध असूनही ( माजी महापौर रमेश जाधव,माजी नगरसेवक हर्षवर्धन पालांडे व डॉ.जानू मानकर) विनायक राऊत व गुरूनाथ खोत यांनी ही नियुक्ति टाळली.लोकसभा निवडणूकीत गडबड होण्याच्या भीतीपोटी (?) नेमणूक केली नाही. लोकसभा निवडणूकीत २ लाख ९ हजार इतक्या फरकाने पराभव होऊनही जिल्हा प्रमुख बदलण्याचे या नेत्यांना सूचले नाही. नंतर योग्य संधी च्या शोधात असलेल्या विनायक राऊत व गुरूनाथ खोत यांनी पक्षत्याग केलेल्या चंद्रकांत बोडारेंच्या गद्दारीचे बक्षिस म्हणून त्यांचे बंधू जे जिल्हा समन्वयक होते त्यांनाच जिल्हा प्रमुख पद बहाल केले.
त्यापाठोपाठ विधानसभा निवडणूक लागली. विनायक राऊत व गुरूनाथ खोत या जोडगोळीने पुन्हा जिल्हाप्रमुख असलेल्या धनंजय बोडारे यांच्याच गळ्यात कल्याण विधानसभेच्या उमेदवारीची माळ गळ्यात घालण्यासाठी शिष्टाई केली. अन्य इच्छुक उमेदवारांना हुलकावणी देत लाडक्या धनंजयलाच विधानसभेची उमेदवारी दिली. शिवसैनिकांनी नाराजी बाजूला सारत बोडारेंचा प्रचार केला.मात्र त्यांचा निभाव लागला नाही व ते तिस-या नंबरवर फेकले गेले. या निवडणूकी दरम्यान जिल्हा प्रमुख पदी रमेश जाधव किंवा हर्षवर्धन पालांडेंना जिल्हा प्रमुख पद द्यावे व त्यांची नाराजी दूर करावी असे मत मांडण्यात आले परंतू कल्याण विधानसभेचा उमेदवार व जिल्हाप्रमुख ही दोन्ही पदं एकाच व्यक्ती कडे असल्याने अंबरनाथ व उल्हासनगर हे दोन्ही मतदार संघ उघड्यावर पडले. तिन्ही मतदार संघात दारूण पराभवाची नामुश्कि आली. तरी जिल्हाप्रमुख पदाची खांदेपालट करण्याची बुद्धी राऊत व खोत यांना झाली नाही. त्यामुळे हर्षवर्धन पालांडे सह अनेक शिवसैनिकांनी ठाकरे गटास जय महाराष्ट्र केला. असंख्य माजी शिव सैनिक जे जिल्हाप्रमुखांच्या गटबाजीच्या राजकारणाला कंटाळून शिंदे गटात गेले होते ते पुन्हा पक्ष प्रवेश करू इच्छित होते त्यांचे प्रवेश हेतूपुरस्सपणे रोखण्यात आले. पक्ष वाढीपेक्षा जिल्हा प्रमुखाचे हीत रक्षण करणे हे राऊत व खोत यांना महत्वाचे वाटले.
कालच्या सामनात जी पदाधिका-यांची यादी प्रकाशित झाली ती शिवसेनेच्या आजवरच्या परंपरेला छेद देणारी होती. आजवर पक्ष प्रमुखांच्या आदेशानुसार मध्यवर्ती कार्यालय पदाधिकारी नेमल्याचे जाहिर केले जात होते. परंतू यंदा प्रथमच थेट जिल्हाप्रमुखाच्या आदेशानुसार पदाधिकारी नेमल्याचे सामनातून जाहिर केले गेले. यात अनेक ज्येष्ठ शिवसैनिकांना डावलून आयारामांना ज्येष्ठ शिवसेना पदाधिका-यांच्या उरावर बसवले.उदाहरणार्थ शिवाजी जावळे जे ज्येष्ठ पदाधिकारी असताना शहर प्रमुख पदी बिंदरपाऊ जे पक्षात फारसे सक्रिय नव्हते त्यांना शहर प्रमुख पदी बसवले कारण ते बोडारे समर्थक आहेत. त्याच प्रमाणे महानगरप्रमुख पदी कॉन्ग्रेस मधुन नुकतेच शिवसेनेत आलेल्या राधाचरण करोतिया यांना नेमण्यात आले. राधाचरण करोतिया हे माझे मित्र वा हितचिंतक जरी असले तरी त्यांनी शिवसेनेचे महानगर पद भुषवावे हे पटत नाही. महानगर प्रमुख हे मोठे पद आहे, या पुर्वी हे पद नव्हते परंतू ते निर्माण केले गेले. या पदावर शिवसेनेतील ज्येष्ठ शिवसैनिकच असावा ज्याला शिवसेनेची विचारसरणी व कार्यपद्धतीची जाणीव असेल. त्यासाठी अनेक पर्याय असताना नवख्यावर हा पदभार देणे योग्य नाही. आमच्या सारख्या ५१-५२ वर्षे शिवसैनिक असलेल्यांवर असे नेतृत्व लादणे हा बलात्काराचाच प्रकार म्हणावा लागेल.
उद्धव साहेबांनी एकनाथ शिंदेबाबत जी चूक केली तिच चूक धनंजय बोडारे बाबत राऊत व खोत करीत आहेत. उद्या बोडारेंच्या मनाजोगते झाले नाही तर एकनाथ शिंदे ची पुनरावृत्ती उल्हासनगर मध्ये होऊ शकते. विधानसभेचे तिकिट नाकारले तर ६५ लोकांनी राजिनामे तयार ठेवले होते, हे विसरून चालणार नाही.
मी जे लिहितो वा बोलतो ते पक्ष व पक्ष प्रमुखांच्या प्रेमापोटी. अन्यथा कोणी काहीही करो माझे वैयक्तिक काहीच नुकसान नाही. ठाणे जिल्हा हा शिंदे पिता पुत्रांचा बालेकिल्ला. याच बालेकिल्यात मी गेली अडिच वर्षे बिनधास्तपणे शिंदेशाहीला उघड आव्हान देत आहे.मला माझ्या जीवाची पर्वा नाही का ? मला शिंदें विरोधात न लिहिण्यासाठी आॅफर आल्या नसतील का ? मी कशाचीही तमा न बाळगता उद्धव साहेबांची साथ देत आलो,परखडपणे लिहित आलो.
काही हितचिंतक म्हणतात तुम्ही थेट मातोश्री वर जाऊन साहेबांशी का बोलत नाही ? मातोश्री वर पोहचणे पुर्वी सहज शक्य होते आत्ता ते दिव्य ठरले आहे.मागुनही अपॉन्टमेंट मिळत नाही.राऊत खोत हे झारीतले शुक्राचार भेट होऊ देत नाहीत.मग आपली व्यथा सार्वजनिक करण्या वाचून परियाय उरत नाही. ती व्यथा माझी एकट्याची नसून प्रतिनिधिक असते.असंख्य शिवसैनिकांच्या भावनांचे ते प्रतिनिधीत्व असते.
आत्ता मी स्पष्ट वक्ता म्हणून बदनाम केला जात आहे तरी मी लिहित आहे.मा.पक्ष प्रमुख उद्धव साहेबांनी यात जातीने लक्ष द्यावे ही अपेक्षा आहे.अन्यथा उप-यांच्या पालख्या वाहण्यापेक्षा घरीच बसलेले बरे ! गद्दारी अन्ब पक्षाचा विचारगी मनाला शिवणार नाही. निवडणूकीत आपल्या पक्षाचे जे चिन्ह असेल त्याला मतदान करण्यापुरताच मी शिवसैनिक असेन.हो पत्रकार म्हणून मग मी स्वतंत्र व ख-या अर्थाने पत्रकारिता करण्यासाठी मुक्त होईन !
दिलीप मालवणकर
९८२२९०२४७०