दौंड येथे बंदला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ,दौंड शहर 100% कडकडीत बंद.
प्रतिनिधी – विकी ओहोळ
8446119158
दौंड – परभणी मध्ये संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात पोलीसांनी अटक केलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्यातील भीमसैनिक आणि संविधान प्रेमी यांच्यात आणखीनच तणावाचे वातावरण झाले आहे.
सोमनाथ सूर्यवंशी यांना ११ डिसेंबर रोजी परभणीत झालेल्या हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आली होती. ते न्यायालयीन कोठडीत होते,त्यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याचे वृत्त समजताच दौंडमध्ये ही तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.आज मंगळवार (ता.१७) रोजी दौंड शहरातील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे बाजारपेठा सकाळ पासूनच बंद ठेवल्या होत्या. परभणीतील घटनेच्या निषेधार्थ आज दौंड बंद चे आवाहन करण्यात आले होते.त्यामुळे आज दौंड शहर कडकडीत बंद होते. दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात परभणी मध्ये घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येने भीमसैनिक आणि संविधान प्रेमी जमले होते. यावेळी झालेल्या सभेत विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमनाथ सुर्यवंशी च्या मृत्यूस पोलीस प्रशासन व राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.यावेळी भीमसैनिक मोठ्या संख्येने आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.