चक्रव्यूहात अडकलेला अभिमन्यू-
एकनाथ संभाजी शिंदे
अभिमन्यूला चक्रव्यूहात शिरायचा मार्ग माहित होता परंतू बाहेर पडायचा मार्ग ठाऊक नव्हता. तशीच अवस्था मामु एकनाथ शिंदे यांची आजमितिस झाली आहे. भाजपाने कपटनितीने शिंदेंना त्यांंच्या चक्रव्यूहात खेचून नेले परंतू परतीचे सर्व मार्ग ब्लॉक करून टाकले आहेत. आत्ता त्यांची अवस्था सहनही होत नाही व सांगताही येत नाही, अशी झाली आहे.
आपल्या बरोबर ४० आमदारांचे भवितव्य ( त्यातील १२ जणांना मंत्रीपदाची लॉटरी लागल्याने ते तूर्तास बचावले आहेत) अंध:कारमय झाले आहे. सगळ्यात वाईट अवस्था दीपक केसरकर, अब्दुल सत्तार व तानाजी सावंत यांची झाली आहे. कारण हेच लोक एकनाथ शिंदेंची तळी सातत्याने उचलून धरत होते व उद्धव ठाकरेंवर आगपाखड करीत होते.
शिंदेंच्या बंडात सामिल झालेल्या १६ आमदारांत डॉ. बालाजी किणीकर हे होते.ते यंदा चवथ्यांदा निवडून येऊनही त्यांची मंत्रीपदी वर्णी लागली नाही या उलट योगेश कदम सारख्या नवख्याची वर्णी लागली आहे.
एकनाथ शिंदे हे त्यांनी चोरलेल्या शिवसेनेचे नामधारी प्रमुख नेते आहेत. त्यांच्या पक्षाचे निर्णय ते स्वतंत्र बुद्धीने घेऊ शकत नाहीत, हे वारंवार सिद्ध झाले आहे.लोकसभा निवडणूकीतील उमेदवारांची निवड करताना भाजपाच्याच आदेशाने उमेदवार निवडावे लागले. विधानसभेच्या निवडणूकीतही त्याचीच पुनरावृत्ती झाली.हे कमी म्हणून की काय ? विधानसभेतील निकाला नंतरही मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लावायची व कोणाचा पत्ता कट करायचा याचा निर्णय घेण्याचा अधिकार पक्ष प्रमुख म्हणवणा-या मामु एकनाथ शिंदेंना नव्हता तर मोदी शहांनी तो निर्णय घेऊन तो शिंदेंवर थोपवला. अन्यथा तानाजी सावंत, अब्दुल सत्तार व दीपक केसरकर यांना शिंदेंनी वगळलेच नसते. शिवसेनेचा कोकणातील वाढता प्रभाव रोखण्यासाठी दीपक केसरकर यांना वगळण्यास भाग पाडून निलेश राणें यांची मंत्रीपदी वर्णी लावून भाजपास बळकटी देण्याचा प्रयत्न झाला. एकनाथ शिंदेंना हतबलेने या निर्णयास संमती द्यावी लागली.
शिंदेंच्या शिवसेनेचे ५७ आमदार कसे निवडून आले हे सर्वश्रूत आहे. भाजपाची कृपादृष्टी व EVMची किमया नसती तर २० आमदरही येणे कठीण होते.या ५७ पैकी १२ जणांना मंत्री पद लाभले असले तरी ४५ आमदार नाराज झाले आहेत.
एकनाथ शिंदेंकडे जे आमदार आकृष्ट झाले ते एकनाथ शिंदेंकडे अलौकिक नेतृत्व गुण होते म्हणून मुळीच नाही. त्यांच्या पेक्षा किती तरी ज्येष्ठ नेते शिंदेंच्या सेनेत आहेत, परंतू गद्दारी करण्याचे धारिष्ट्य त्यांच्यात नसल्याने नाईलाजाने व सोईस्कररित्या त्यांनी एकनाथ शिंदेंना नेतृत्व सबहाल केले. एकटे दिपक केसरकरच शिंदेंपेक्षा किती तरी ज्येष्ठ नेते आहेत.
एकनाथ शिंदे यांना ईडीची नोटीस येताच त्यांचा खाजगी सचिव फरार झाला होता व नंतर ८ दिवसातच त्यातून वाचण्यासाठी त्यांनी १६ आमदार घेऊन शिंदेंनी सूरत गाठले. इडी व अन्य कारवाईपासून वाचायचेअसेल तर माझ्यासोबत या ! असे आवतण देऊन ४० भयग्रस्त व नाराजांची मोट बांधली. “आम्हाला अदृश्य शक्तिचा आशिर्वाद आहे,” असे म्हणत गुवाहाटी गाठले. तिथे कामाख्या देवीला नवस करून गोवामार्गे मुंबई लपत छपत गाठली व पुढचे काळेकृत्य केले.
मुख्यमंत्री पद भुषलेल्या व्यक्तिस उपमुख्य मंत्री पद स्विकारावे लागणे ही मोठी नामुष्की असते. उडणा-या स्वच्छंदी पाखराला पिंज-यात बंदीस्त करण्याचा हा प्रकार, राजकारणात पंख छाटण्यासाठी केला जातो. कोणताही स्वाभिमानी नेता अशी पदावनती स्विकारणार नाही. परंतू गद्दारीची बीजं ज्यांनी रोवली ते दुस-यावर विश्वास ठेऊ शकत नाहीत. एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद पक्षातील एखाद्या ज्येष्ठ नेत्यास दिले असते तर ही नामुष्की टाळता आली असती. परंतू कोणतेही विशेष अधिकार नसलेले व शोभेचे असलेले हे असंवैधानिक पद स्विकारून शिंदेंनी एका पक्ष प्रमुख पदाचा, त्या पक्षाचा ( चोरलेला असला तरी) घोर अपमान केला आहे. आमच्या नगर पालिका व महापालिकेत अशी दोन उदाहरणं आहेत, एक उपमुख्याधिकारी होता.मी त्याच्या वैधतेला आव्हान दिले होते, त्यामुळे त्याला पदावनत करून विशेष अधिकारी पदावर पदावनत करताच जे. एन. थदानी नावाच्या सदर अधिका-याने पदावनती नाकारून आपल्या नोकरीचा राजिनामा दिला होता. दुसरा प्रकार जकात नाके बंद होताच ऑक्ट्रॉय सुप्रिटेंडंला पदावनत करून सहाय्यक आयुक्त पदी नेमताच त्याने तात्काळ आपल्या नोकरीचा राजिनामा दिला होता. ते तर वर्ग- २ चे मनपा अधिकारी होते, त्यांनी जो स्वाभिमान व बाणेदारपण दाखवला, तो मामु एकनाथ शिंदेंना दाखवता आला नाही ! ही किती लज्जास्पद बाब आहे.
आत्ता ५ वर्षे देवेंद्र फडणवीसांच्या हाताखाली काम करावे लागेल, अधिकार काहीच नसतील वरून भाजपा हायकमानच्या हुकूमाचा तालेवार बनून रहावे लागेल. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या एका माजी सैनिकाची लाचारी लांच्छनास्पद आहे. आपले आमदार फुटू नयेत व आपण अनाथ होऊ नये, ही चिंता आत्ता शिंदेंना दिवस-रात्र भेडसावत असेल.हा नियतीने उगवलेला सूड आहे, उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसल्या नंतर त्यांना ज्या वेदना झाल्या होत्या, त्याची ही अंशत: परतफेड नियती करीत असावी. यालाच इंग्रजीच Poetic Justice हिंदीत कुदरत का कानून व मराठीत जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे इश्वर ! असे म्हणतात.ही तर सुरूवात आहे. शिंदेंच्या सेनेचे आकाश फाटले आहे.तिला ठिगळ लावण्याचा प्रयत्न म्हणून अडिच वर्षाचे मंत्रीपद हा फॉर्म्युला आणला जात आहे.
राजकारणात कोणीही कोणासाठी थांबत नसतो, नाराजांची मोट बांधुन भाजप शिंदेसेनेचे खच्चिकरण करू शकतो.
कारण शिंदे सेनेतच भाजपाचे १० आमदार आहेत.
शेवटी भाजपा अशी परिस्थिती निर्माण करेल की, शिंदे सेनेचे भाजपात विलिनीकरण करणे भाग पडेल. एकनाथ शिंदेच्या गळ्यात अपघाताने नेतृत्वाची माळ पडली आहे. ५७ आमदार ते ही स्वत:ला कोणतेही अधिकार नसताना सांभाळणे शिंदेंसाठी अशक्यप्राय बाब आहे. भाजपा फक्त मुंबई महापालिकेच्या निवडणूकी पर्यंतच शिंदेंना गोंजारेल नंतर मात्र त्यांना निष्प्रभ करून टाकेल व महाबळेश्व येथील दरे गावी पाठवून देईल.कारण अभिमन्यू चक्रव्यूहातून बाहेर पडूच नये ! हीच भाजप श्रेष्ठींची सुप्त इच्छा असावी.
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार
९८२२९०२४७०