खरी शिवसेना कोणाची
हे जनतेच्या न्यायालयात ठरेल !
खरी शिवसेना माझीच! असल्याचा दावा एकनाथ शिंदे हे करीत असले तरी त्याचा निकाल न्यायालयात प्रलंबित आहे. निवडणूकीपुर्वी शिवसेना पक्ष व चिन्ह कोणाचे तसेच अपात्रतेबाबतचा निकाल लागणे अपेक्षित होते. परंतू न्यायालयाने दप्तरदिरंगाई करून सरकारी लालफितीच्या कारभारालाही लाजवले. काल निवडणूक पार पडली. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे याच दिवसाची वाट पाहत होते.
न्यायालयाने कितीही विलंब लावला तरी खरी शिवसेना कोणाची ? याचा कौल जनतेच्या न्यायालयात मागणार ! असे मतदारांवरील ठाम विश्वासामुळे बोलत होते.
जनतेची स्मरणशक्ति अल्पकाळ टिकणारी असते, त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरें बाबतची सहानुभूती विस्मरणात जाण्यासाठी कालापव्यय होणे आवश्यक होते.कपटी भाजप व एकनाथ शिंदे यांनी ही बाब अचुक हेरली होती.त्यासाठी न्यायालयात जी delay tacties अवलंबावी लागते व जे प्रयास-सायास व डावपेच करावे लागतात ते सर्व मार्ग त्यांनी अवलंबले. न्यायालयाने ही न्याय निवाडा करण्यात अक्षम्य दिरंगाई करून त्यांना अप्रत्यक्ष सहकार्यच केले. सरन्यायाधिश पदावर चंद्रचुड हे होते तो पर्यंत contempt of court च्या बडग्याच्या भीतीने कोणीही तोंड उघडत नव्हते. एकंदरीत न्यायायालयाने Justice delayed is justice denied हे तत्व मान्य करून निकालास अनाकलनीय विलंब लावून एकप्रकारे न्यायच नाकारला.
काल महाराष्ट्रातील मतदान पार पडले. गेल्या कित्येक निवडणूकीतील मतदानापेक्षा जास्त टक्के मतदान झाले.यामागे लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांची टक्केवारी मोठी आहे.याचा लाभ सत्ताधारी युतीला होऊन व ही योजना कार्यान्वित करण्याचा हेतू सफल होताना दिसत आहे.
कालच्या निवडणूकीत शिंदे गटाने जे ५१ उमेदवार मुळ शिवसेने विरोधात उभे केले तसेच भाजपा समर्थक मनसेनेही ठाकरे गटा विरोधातच उमेदवार उभे केले होते, ते ठाकरे शिवसेनेचे खच्चीकरण करण्याच्या कुटील हेतूनेच. मनसेने भाजपा विरोधात एकही उमेदवार दिला नाही. तरी देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार शिंदे गटापेक्षा जास्त निवडून येतील, असा एक्झिट पोल मधे सांगितले जात आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा विरोधात एकनाथ शिंदे गटाने ५१ उम्दवार दिले आहेत, त्या ५१ मतदार संघातून एकनाथ शिंदे गटाचे बरेचसे माजी आमदार पराभूत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यात प्रताप सरनाईक, भरत गोगावले, यामिनी जाधव, दीपक केसरकर,तानाजी सावंत, यांच्यासारखे किमान १५ आमदार पराभूत होतील.
तसेच इतर पक्षांतून आयात केलेले किमान १५ उमेदारही पराभूत होतील.
त्यामुळे त्यामुळे शिवसेने विरोधात उभे केलेले किमान ३० उमेदवार पराभूत होतील. त्यामुळे ठाकरे यांच्या शिवसेनेचे ३० तर शिंदे गटाचे २१ आमदार निवडून येऊ शकतात.तसे झाल्यास उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच शिवसेना खरी असल्याचा जनतेच्या न्यायालयात निवाडा होईल.
काल मला वर्षावरून एका व्यक्तिने फोन करून माझे मत विचारले.त्यामुळे मला आश्चर्याचा धक्काच बसला. शिंदे गटाला माझ्या मताचे मोल कळते याचा सुखद आनंदही झाला. असाच आनंद मला Tv9 वाहिनीने मला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची बाजू मांडण्यासाठी त्यांच्या चर्चेत आमंत्रित केले,तेव्हा झाला होता. वास्तविक माझ्याकडे ज्येष्ठ शिवसैनिक खेरीज कोणतेही पद नाही,मी शिवसेनेचा नेताही नाही, प्रवक्ताही नाही तरी मला एका चॅनेलने मला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची गटाची बाजू मांडण्यासाठी आमंत्रित केले,यातच सर्व आले.
मी आज जे विश्लेषण केले आहे, त्यानुसार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे, हे निर्विवादपणे सिद्ध होईल.एकनाथ शिंदे यांचे सर्व मिळून ३०-३५ आमदार निवडून येतील तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे किमान ५५ आमदार निवडून येतील. महाविकास आघाडीने बहुमत सिद्ध केल्यास सर्वानुमते उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच पुन्हा मुख्यंमंत्री व्हावेत,हीच श्रींची इच्छा असावी.
प्रत्यक्षात काय घडेल ? याची प्रतिक्षा २३ तारखेच्या दुपार पर्यंत करावी लागेल.
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार
९८२२९०२४७०