हर्षवर्धन पाटील यांनी बावडा येथे सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
मोठ्या मताधिक्याने विजयाचा व्यक्त केला विश्वास!
(निलेश गायकवाड)
इंदापूर : प्रतिनिधी दि.20/11/24
इंदापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष व महाविकास आघाडीचे उमेदवार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या 15 व्या निवडणुकीसाठी बावडा (ता. इंदापूर) येथे बुधवारी (दि.20) सकाळी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी पत्नी भाग्यश्री पाटील, मुलगी अंकिता पाटील ठाकरे, मुलगा राजवर्धन पाटील यांनीही मतदान केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांचे लोकाभिमुख नेतृत्व आणि इंदापूर तालुक्यातील जनतेचा आमचेवर असेलेला विश्वास, साथ व आशीर्वाद यामुळे इंदापूर विधानसभा मतदारसंघातून आपला मोठ्या मताधिक्याने विजय निश्चित आहे. तसेच राज्यात महाविकास आघाडी सत्ता येणारच आहे, असा ठाम विश्वासही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला. दरम्यान, मतदानानंतर हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील विविध मतदान केंद्रांना भेटी दिल्या. याप्रसंगी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहनही हर्षवर्धन पाटील यांनी केले.