November 21, 2024 5:50 pm

विजयाचे सर्टिफिकेट घेऊनच आपण मुंबईला जाऊ या, असे आवाहन – खा.सुप्रिया सुळे

अपनी भाषा में पढ़े! Translate

विजयाचे सर्टिफिकेट घेऊनच आपण मुंबईला जाऊ या, असे आवाहन – खा.सुप्रिया सुळे
•हर्षवर्धन पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल!
•इंदापूरची तुतारी मंत्रालयात जाणार

(निलेश गायकवाड )

महाराष्ट्र हा सध्याच्या भ्रष्टाचारी सरकारपासून मुक्त करावयाचा आहे. तसेच दूध, कांदा, सोयाबीन आदी पिकांना चांगला भाव देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे. महाराष्ट्र राज्य हे देशात एक क्रमांकाचे राज्य बनवायचे आहे. निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आहे, त्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, असे आवाहन खा. सुप्रिया सुळे यांनी इंदापूर येथे गुरुवारी (दि.24) केले.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून महाविकास आघाडीचे उमेदवार उमेदवार म्हणून गुरुपुष्पामृतच्या मुहूर्तावर भव्य रॅली काढून गुरुवारी (दि.24) अर्ज दाखल केला. यावेळी खा.सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करणेपूर्वी भाग्यश्री निवासस्थानी हर्षवर्धन पाटील यांचे खा. सुप्रिया सुळे, भाग्यश्री पाटील, अंकिता पाटील ठाकरे यांनी औक्षण केले.
उमेदवारी अर्ज दाखल झालेनंतर आयोजित महाविकास आघाडी कार्यकर्त्यांच्या भव्य मेळाव्यात खा.सुप्रिया सुळे बोलत होत्या. या मेळाव्याला कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली होती. या गर्दीचीच मेळाव्यानंतर चर्चा सुरू होती.
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, राज्याच्या विकासाच्या दृष्टीने ही निवडणूक टर्निंग पॉईंट ठरणार आहे. हर्षवर्धन पाटील हे राज्यपातळीवर काम करणारी नेते आहेत, त्यांना आता राज्यभर काम करावे लागणार आहे. निवडणुकीनंतर विजयाचे सर्टिफिकेट घेऊनच आपण मुंबईला जाऊ या, असे आवाहन सुप्रिया सुळयांनी केले.
काही लोकं तिकिटासाठी दिल्लीला गेले. आपण सगळं महाराष्ट्र मध्ये ठरतं, असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी महायुतीतील घटक पक्षांना लगावला. ज्यांच्याकडून कॉन्ट्रॅक्ट दिले जाते ते पैसे घेतात त्यामुळे कामाची गुणवत्ता राहत नाही, आणास खड्डे मुक्त रस्ते तयार करायचे आहेत, असे सुप्रिया सुळे यांनी नमूद केले.
हर्षवर्धन पाटील भाषणात म्हणाले, महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांचे एवढे ज्येष्ठ नेते कोणीच नाही. 84 वर्षाचे संघर्ष योद्धा शरद पवार यांना अडचणीच्या काळात साथ देण्याचा आपण निर्णय घेतला आहे. मात्र इथल्या विद्यमान लोकप्रतिनिधींनी अडचणीच्या काळात शरद पवार साहेबांना धोका दिला आहे. त्यामुळे इथल्या लोकप्रतिनिधींना त्यांची जागा मतदारांनी दाखवून द्यावी.
विद्यमान लोकप्रतिनिधींनी सन 2009 मध्ये आमदारकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली होती, त्यावेळी त्यांना 6 वर्षासाठी पक्षातून काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तसेच दोन वर्षांपूर्वी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतली. शरद पवार यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्याने आता इंदापूर तालुक्यात विधानसभेला बदल घडणारच, असा विश्वास हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.
ज्येष्ठ नेते शंकररावजी पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी इंदापूर तालुक्यात सर्वधर्मसमभावाचा विचार मांडला. त्याच सर्वधर्मसमभावाच्या विचारानुसार आम्ही कार्यकर्ते वाटचाल करीत आहोत. आगामी 5 वर्षात इंदापूरचा चेहरा मोहरा बदलायचा आहे, तालुक्याचा सर्व क्षेत्रातील विकास करावयाचा आहे. तालुक्यातील शेतीच्या सिंचनाचा प्रश्नही प्राधान्याने सोडविला जाणार आहे, अशी ग्वाही हर्षवर्धन पाटील यांनी भाषणात दिली.
यावेळी पृथ्वीराज जाचक, मुरलीधर निंबाळकर, राहुल मखरे, तेजसिंह पाटील, अँड कृष्णाजी यादव, विलासराव वाघमोडे, भारतीताई शेवाळे, अशोक घोगरे, सागरबाबा मिसाळ, नितीन शिंदे, काका देवकर, प्रा.कृष्णाजी ताटे, अनिल पवार, संजय शिंदे, बाबासाहेब भोंग, तुषार खराडे यांनी मनोगत व्यक्त केले.
या सभेमध्ये इंदापूर शहरातील अनिलअण्णा पवार (मेम्बर) यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह तसेच बावडा ग्रा.पं. सदस्य पांडुरंग कांबळे, सुनील साबळे, विनोदकुमार जाधव यांनी असंख्य सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला. यांचा सत्कार खा.सुप्रिया सुळे व हर्षवर्धन पाटील यांनी केला.
यावेळी निरा भिमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, अंकिता पाटील ठाकरे, महारुद्र पाटील, राजवर्धन पाटील, महिला तालुकाध्यक्षा छायाताई पडसळकर, कार्याध्यक्षा आस्मा मुलाणी, मयूरसिंह पाटील, अमोल भिसे, सुखदेव घोलप, आशुतोष भोसले, उदयसिंह पाटील, हेमंत नरुटे, उमेश घोगरे, चांगदेव घोगरे, शहराध्यक्ष इनायत काझी, महिलाध्यक्षा रेश्मा शेख, बाळासाहेब पाटील, नंदकुमार सोनवणे, प्रदीप पाटील, मोहन दुधाळ, पांडुरंग शिंदे, शिवाजी हांगे, बापू कोकाटे आदींसह शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ), काँग्रेसचे व विविध संस्थांचे पदाधिकारी, संचालक, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन कैलास कदम व राजेंद्र पवार यांनी तर आभार अँड.शरद जामदार यांनी मानले.


———
इंदापूरची तुतारी मंत्रालयात जाणार -खा. सुळे
——————————————
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी इंदापूरची तुतारी विधानसभेत पोहोचणार असल्याची ग्वाही इंदापूर येथे दिली होंती. त्याचा संदर्भ घेऊन सुप्रिया सुळे यांनी तुतारी विधिमंडळ बरोबर मंत्रालयातील पोचणार असल्याचे नमूद करताच कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कळकाट केला.
———
पवार साहेबांनी राज्याचा विचार करून उमेदवारीचा निर्णय घेतला – हर्षवर्धन पाटील
——————————————
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षातून 6 जणांनी उमेदवारी मागितली होती. लोकशाहीमध्ये उमेदवारीची इच्छा व्यक्त करणे योग्यच आहे. मीही पक्षाकडे उमेदवार मागणीचा अर्ज केला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचा सारासार विचार करून माझ्या उमेदवारीचा निर्णय घेतला. माझे पक्षातील या सहकाऱ्यांना आवाहन आहे की, पवार साहेबांचा विचार सोडू नका, त्यांचे हात बळकट करण्याची गरज आहे. उमेदवारी मागणारे सर्वजण आम्ही एकमेकांच्या जवळचे सहकारी आहोत. त्यामुळे यातून निश्चित मार्ग निघेल, असे हर्षवर्धन पाटील यांनी भाषणात नमूद केले.
———
25 दिवस द्या, 5 वर्षे माझी जबाबदारी – हर्षवर्धन पाटील
——————————————
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मतदान होईपर्यंत 25 दिवस पक्षासाठी द्या, नंतरची 5 वर्षे माझी जबाबदारी राहील, असे आवाहन भाषणात केले.
__________

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!