करमाळा प्रतिनिधी :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिण योजना अंतर्गत महिलांना प्रति माह 1500 देवून महिलांना अर्थसहाय्य म्हणून योजना राबविली. सदर योजनेला संपूर्ण महाराष्ट्रातून भरभरून प्रतिसाद लाभत आहे. परंतु महिलांनी एखाद्या बँकेतून कर्ज प्रकरण केले असता सदर कर्ज प्रकरणा करिताचा हप्ता म्हणून लाडकी बहिण योजनेचे जमा झालेले रक्कम परस्पर बँका कपात करीत असल्याने महिलांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वास्तविक पाहता, लाडकी बहिण योजनेचे जमा झालेले पैसे परस्पर कर्जाच्या हप्त्यात कपात करू नये अशा शासनाचा आदेश असताना तसेच स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी यांनी सुध्दा याबाबत आदेश पारित केलेले असताना करमाळयातील बंधन बँक सर्व आदेशांची पायमल्ली करीत लाडक्या बहिणींचे आलेले पैसे कपात करीत आहे.
करमाळयातील सुमंतनगर भागातील रूक्साना समीर पठाण यांनी बँकेशी संपर्क साधला असता बँक अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्हाला शासन आदेश वगैरे काही माहिती नाही. आम्ही लाडकी बहिणीचे आलेली सर्व रक्कम कपात करून घेणार आहे तसेच आपल्याला कोठे तक्रार करायची असेल तेथे करा अशा आशयाची उध्दट उत्तरे अधिकाऱ्यांकडून पठाण यांना दिलेली असल्याची तक्रार पठाण यांनी केलेली आहे. याबाबत लवकरच पठाण हया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार संजय मामा शिंदे, जिल्हाधिकारी सोलापूर तसेच तहसीलदार करमाळा यांना लेखी तक्रार करणार आहेत.