November 21, 2024 12:27 pm

बेट्यांनो, राजकारणासाठी आया-बहिणींची शिकार करणे आपली परंपरा नाही !

अपनी भाषा में पढ़े! Translate

बेट्यांनो, राजकारणासाठी आया-बहिणींची शिकार करणे आपली परंपरा नाही !

दत्तकुमार खंडागळे

काही दिवसापुर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एका मुलाखतीत, “देवेंद्र फडणवीस हे रोमँटीक नाहीत, त्यांना रोमँन्स जमतही नाही आणि कळतही नाही. धरण उशाला आणि कोरड घशाला !” अशी माझी अवस्था असल्याचे सांगितले. त्यांच्या या बेधडक आणि मनमोकळ्या वक्तव्यावर सामाजिक माध्यमातून प्रचंड टिका-टिप्पणी झाली. अतिशय खालच्या पातळीला जात त्यांची टिंगल-टवाळी करण्यात आली. अक्षरश: काहीही बोलले गेले. विशेष म्हणजे यात केवळ पुरूषच आघाडीवर होते असे नाहीतर महिलाही खुप होत्या. अतिशय खालच्या पातळीवर जात टिका-टिप्पणी सुरू होती. देवेंद्र फडणवीसांशी राजकीय वैर असेल, मतभेद असतील मान्य आहे म्हणून त्यांच्या पत्नीच्या चारित्र्यावर चिखलफेक का ? देवेंद्र फडणवीस खूनशी राजकारण करतात, सुडबुध्दीने वागतात, त्यांनीच राजकारणातली सभ्यता संपवली मान्य आहे, त्यांनीच महाराष्ट्राचे राजकारण नासवले आहे हे ही मान्य. पण त्यांच्यावर निशाणा साधण्यासाठी त्यांच्या पत्नीला माध्यम का केेले जाते ? त्यांच्या व्यक्तीगत आयुष्यात डोकावण्याची गरज का पडावी ? बेट्यांनो, राजकारणासाठी आया-बहिणींची शिकार करणे आपली परंपरा नाही. ही महाराष्ट्राची सभ्यता किंवा संस्कृती नाही. ट्रोलींगची टोळधाड भाजपानेच जन्माला घातली. तिने कुठलीच नितिमत्ता न बाळगता विरोधकांना नेस्तनाबुत करण्यासाठी कमरेच सोडून डोक्याला गुंडाळले. आज विरोधी बाजूकडूनही तेच सुरू आहे. त्यांच्या बाजूचेही लोक असेच वागू लागले आहेत. त्यांनी गाय मारली म्हणून आम्ही वासरू मारणे योग्य आहे का ?

 

ज्या मराठी मुलूखात परस्त्रीचा आदर करण्याची परंपरा होती, जिथे शत्रूंच्या स्त्रीयांचाही सन्मान करण्याची शिकवण शिवरायांनी दिली होती त्या महाराष्ट्रात असं व्हावं ? हे खेदजनक आहे. अमृता फडणवीस एका माजी मुख्यमंत्र्याची व विद्यमान उपमुख्यमंत्र्याची पत्नी आहेत. आजवर अनेक मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री झाले पण त्यातल्या कुणाच्याही पत्नीने अमृता फडणवीस यांच्यासारखा हल्लकल्लोळ माजवला नाही. त्या सर्वांनी आप-आपली पारंपारिक सोज्वळ प्रतिमा जपली. डोईवरच्या पदराला चारचौघात कधी ढळू दिले नाही. टिपीकल भारतीय स्त्री जशी होती तशा त्या वागल्या. अमृता फडणवीस यांनी या सगळ्या चालत आलेल्या रिवाजाला कोलून लावले. त्या मुक्तपणे जगल्या आणि जगतायत. त्यांना जे जे आवडतय ते ते त्या बिंधास करतायत. त्यानी काय करावं ? काय करू नये ? हा त्यांचा व्यक्तीगत प्रश्न आहे. त्या एका नेत्याच्या पत्नी असल्या तरी त्या स्वतंत्र व्यक्ती आहेत. त्यांना जे जे वाटतय ते ते त्या करू शकतात. हा त्यांचा हक्क आहे. हा अधिकार त्यांना भारताच्या राज्य घटणेने दिला आहे. भले त्या कलाकार म्हणून दर्जेदार नसतील, त्यांचा आवाज, त्यांचे गायन, त्यांचे नृत्य नसेल चांगले. पण ते चांगले नाही म्हणून त्यांनी गायचेच नाही किंवा नृत्य करायचेच नाही असे होईल का ? गायचं, नाचायच की आणखी काही करायचं हा त्यांचा व्यक्तीगत प्रश्न आहे. बाकी त्यांचे गायन ज्यांना ऐकायचे नाही त्यांनी ऐकू नये, नृत्य पहायचे नाही त्यांनी पाहू नये. त्यांना जे जे आवडतं ते ते त्या करू शकतात. माजी मुख्यमंत्र्याची पत्नी आहे म्हणून तिनं असंच वागलं पाहिजे, तसच वागलं पाहिजे, डोक्यावर पदर घेवूनच आलं पाहिजे हा अट्टाहास योग्य नाही. अमृता फडणवीस यांनी तथाकथीत सभ्यतेच्या चौकटीत बसणारं सोज्वळच वागलं पाहिजे, तिने नाकावर पदर घेवूनच बाहेर आलं पाहिजे, तिने असंच बोलल पाहिजे, तसंच वागलं पाहिजे या अपेक्षा चुकीच्या आहेत आणि त्यासाठी घेतलेले आक्षेपही चुकीचे आहेत. अमृता फडणवीस यांच्या परवाच्या मुलाखतीच्या निमित्ताने जी राळ उडाली ती नक्कीच निंदनीय आहे. राजकारण खुषाल करा. राजकारणात कुणालाही चारीमुंड्या चित करा. त्याला नेस्तनाबुत करा. पण त्यासाठी त्याच्या बेडरूममध्ये घुसून त्याच्या कमरेखाली वार करावेत हे योग्य नाही. राजकारणासाठी कुणाच्याही घरातील महिलांना टार्गेट करणे योग्य नाही. भाजपविरोधी अनेक चांगले चांगले लोक अमृता फडणवीस यांच्या वक्तव्यावर तुटून पडले होते. हे सगळे आंबटशौकीन ज्या पध्दतीने बोलत होते ते पाहून वाईट वाटलं. महाराष्ट्र काय होता आणि काय झाला आहे ? भविष्यात इथलं राजकारण कुठल्या थराला जाणार आहे ? याची कल्पना आली की अंगावर काटा आल्याशिवाय रहात नाही. राजकारणासाठी कुणाच्याही बेडरूममध्ये घुसून डोकावण्याची काय गरज ? ते त्यांचे व्यक्तीगत आयुष्य आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय भूमिकेवर, निर्णयावर, दोगलेपणावर, त्यांच्या चुकावर आपण बोलू शकतो, टिका करू शकतो. पण त्यांना विरोध म्हणून त्यांच्या बेडरूममध्ये डोकावणं, त्याच्या खासगी आयुष्यावर, त्यांच्या पत्नीवर भाष्य करणे योग्य नाही. केवळ देवेंद्र फडणवीसच नव्हे तर कुणाच्याही बाबतीत अशा पध्दतीने वागणे योग्य नाही. अमृता फडणवीस यांचा एक कलाकार म्हणून तुम्ही लेखाजोखा मांडू शकता. त्या कलाकार म्हणून किती दर्जेदार आहेत ? याची चर्चा करू शकता. त्याची समिक्षा करू शकता. पण त्या खासगी आयुष्यात काय करतात ? यावर बोलण्याचा अधिकार कुणालाही नाही. अशा पध्दतीने एखाद्या महिलेला टार्गेट करणे आपली परंपरा नाही याचे भान ठेवायला हवे. स्वत:ला फुले, शाहू, आंबेडकरांचे वारस म्हणवणारे अनेकजण यात आघाडीवर होते. अमृता फडणवीस यांच्यावर विकृत पिचका-या मारत होते. त्यांच्यावर अश्लिल भाष्य करत आपला आंबटशौकी कंड थंड करताना दिसत होते. ही विकृत मानसिकता फुले, शाहू, आंबेडकरांच्या परंपरेला शोभणारी नाही. या पाईकांनी तर अधिक जबाबदारीने वागायला हवं. त्यांना संघाने जोपासेल्या विकृत डुकरांसारखं वागता येणार नाही. कारण त्यांची परंपरा ती नाही. हे पाईक शिवबाचे वारस असतील, फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचे वारस असतील तर जबाबदारी अधिक वाढते. संघाने पोसलेल्या गटारघाणीतील डुकरांशी बरोबरी करून चालणार नाही.

 

खरेतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्या पध्दतीच्या संस्कृतीची भाषा करतो, ज्या मनूस्मृतीची वाहवा करतो किंवा मनूस्मृतीवर आधारीत समाज व्यवस्थेचे समर्थन करतो त्या व्यवस्थेला अमृता फडणवीस लाथा घालत आहेत. संघाची जी धारणा आहे ती धारणा अमृता फडणवीस कोलून लावत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ महिलांच्या प्रतिमेकडे ज्या पध्दतीने पाहतो तो दृष्टीकोनच अमृता फडणवीस उध्वस्त करत आहेत. ही खुप मोठी आणि महत्वाची बाब आहे. अमृता फडणवीस इतर मुख्यमंत्र्यांच्या, नेत्यांच्या टिपीकल बायकांप्रमाणे नक्कीच नाहीत आणि हेच त्यांचे वेगळेपण लोकांना पचनी पडत नाही. त्या ज्या मुक्तपणे वावरतायत, व्यक्त होतायत, हवं ते करतायत हे लोकांना हजम होत नाही. खरेतर त्यांच्या या बंडखोरीचे स्वागत व्हायला हवे पण पारंपारिकतेचा पगडा असलेल्या आणि विखारी राजकारण डोक्यात असलेल्या लोकांना ते सहन होताना दिसत नाही. विशेष म्हणजे संघवाल्यांना, भाजपवाल्यांना अमृता फडणवीस अवघड जागेचं दुखण झाल्या आहेत. त्यांचे वर्तन त्यांच्या तथाकथित सोज्वळ संस्कृतीत मोडणारे नाही. तरीही भक्त मंडळी चिडीचुप आहेत. त्यांनी या आपल्या बंडखोर मम्मीला स्विकारले आहे. ते काहीच बोलत नाहीत. त्यांनी ही पश्चिमेसारखी विचारधारा असणारी व जगणारी मम्मी स्विकारली आहे. अमृता यांच्या ठिकाणी जर एखाद्या विरोधी पक्षातल्या नेत्याची पत्नी असती तर संघधार्जिणी टोळधाड विष ओकली असती. ते ज्या लायकीने बोलतात, टिका करतात त्याची परमसीमा त्यांनी गाठली असती. त्यांच्या हरामखोरीनेच आज अमृता फडणवीस यांच्यावर विरोधी बाजूकडून अश्लिल टिका होतेय. कारण संघानेच ही घाण पेरली व पोसली. जे बिज त्यांनी पेरले ते आज तरारून आलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रात ही घाण पोसली आणि वाढवली. आज ती त्यांच्याच अंगलट येते आहे. आपले फडणवीसांशी लाख मतभेद आहेत म्हणून त्यांच्या व्यक्तीगत आयुष्यात, त्यांच्या बेडरूममध्ये डोकावणे योग्य नाही. ही विकृती शिवरायांच्या महाराष्ट्राला शोभणारी नाही. जे चाललय ते अंत्यत दु:खद व चुकीचे आहे. विरोधी पक्षातल्या एखाद्या तरी जाणकार नेत्याने या गोष्टीवर बोलायला हवे होते. अमृता फडणवीस यांच्यावर अश्लाघ्य व कमरेखाली टिका करणा-या विकृतांना फटकारणे जरूरीचे वाटत होते पण त्यांंच्यातल्या कुणीही याचा साधा निषेध व्वक्त केलेला नाही. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावतोय त्याची भिती वाटते. अशीच विकृत परंपरा निर्माण झाली, राजकारणासाठी लोक कुठल्याही थराला जायला लागले तर भविष्यात महाराष्ट्राला मोठी किंमत मोजावी लागेल हे नक्की.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!