आयडी कार्ड मागितले म्हणून चक्क बारामती आरटीओ ने लावल्या उठबश्या काढायला;उंडवडी सुपे टोलनाक्यावर घडला प्रकार
(निलेश गायकवाड)
बारामती तालुक्यात प्रशासकीय कामे वेळेत मार्गी लागावीत, म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, ज्येष्ठ नेते शरद पवार असतील किंवा सुप्रिया सुळे हे अधिकाऱ्यांना नेहमीच पूर्ण स्वातंत्र्य देत आले आहेत. पण या स्वातंत्र्याचा गैरफायदा बारामतीतील अधिकारी घेतात, आणि उगाचच तक्रार नको म्हणून पवार कुटुंबावर प्रेम करणारे लोक मात्र मूग गिळून गप्प बसतात. मग या अधिकाऱ्यांचा रुबाब एवढा वाढतो, की गप्प बसतात, म्हणून ते सामान्य लोकांच्या मानाच मुरगळतात.. बारामती तालुक्यातील आरटीओच्या एका कर्मचाऱ्याविरोधात उंडवडीच्या टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी दिलेली तक्रार यामुळेच चर्चेत आली आहे.
बारामती तालुक्याच्या सुपे पोलीस ठाण्याच्या हद्दीत संत तुकाराम महाराज राष्ट्रीय महामार्गाचा उंडवडी येथील टोलनाका आहे. त्या टोलनाक्यावर गेल्या काही महिन्यांपासून टोलची वसुली सुरू आहे. दोन दिवसापूर्वी एक घटना घडली. 26 ऑगस्ट 2024 रोजी साप्ताहिक सुट्टी होती, पण टोल नाक्यावर काही कारणास्तव गेलेल्या टोल नाक्याचा कर्मचारी संदीप लोंढे याला आरटीओच्या एका कर्मचाऱ्याने उठाबशा काढायला लावल्याची तक्रार या कर्मचाऱ्याने केली आहे.
या संदर्भात लोंढे याने सुपे पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. अर्थात त्यावरून काय कारवाई होईल अशी अपेक्षा करण्यात काहीच अर्थ नाही, कारण हा प्रकार तसा गंभीर असूनही त्याची फक्त लेखी तक्रार घेतली गेली आहे. अर्थात तिथे नेमकं काय घडले हे आरटीओच्या कर्मचाऱ्याकडून समोर आल्याशिवाय याविषयी स्पष्टता येणार नाही, परंतु तरीदेखील मिळत असलेल्या माहितीनुसार आरटीओ कर्मचाऱ्याचा इगो दुखावला म्हणून हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.
आता हा इगो म्हणजे काय? तर या कर्मचाऱ्याने उंडवडीच्या टोलनाक्यावर गाडीतून आलेल्या आरटीओच्या कर्मचाऱ्याला अडवले. त्याला टोल भरण्याची सूचना केली, तेव्हा संबंधित कर्मचाऱ्यांनी आपण आरटीओ कर्मचारी असल्याचे सांगितल्यानंतर एका कर्मचार्याने त्याला आयडी कार्ड मागितले. त्यावरून गड्याचे बिनसले.
बारामतीतला अधिकारी, कर्मचारी म्हणजे अनभिषिक्त सम्राटच हो, मग त्याला कुठे ओळख मागायची असते का? पण आरटीओच्या कर्मचाऱ्याला आय कार्ड मागितले आणि भारी आभाळ कोसळले. एकंदरीत संबंधित कर्मचारी तिथून टोल भरून किंवा कार्ड दाखवून गेला असावा, परंतु दुसऱ्या दिवशी अगदी जाणीवपूर्वक हे कर्मचारी आरटीओचीच गाडी घेऊन तिथे पोहोचले आणि त्यांनी संबंधित टोलनाक्याच्या वरिष्ठाला देखील आयकार्ड मागितले. कर्मचाऱ्यांची ओळखपत्र तपासली असेही बोलले जात आहे. त्याच वेळेस ज्या कर्मचाऱ्यांनी अडवले होते, तो कर्मचारी तिथे दिसून आला आणि कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार संबंधित साहेबांनी त्याला उठाबशा काढायला लावल्या.