November 21, 2024 2:22 pm

तावडेजी, महाराष्ट्राचं राजकारण नासवलं कुणी ?

अपनी भाषा में पढ़े! Translate

तावडेजी, महाराष्ट्राचं राजकारण नासवलं कुणी ?

दत्तकुमार खंडागळे

काल पुणे येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यावरील पुस्तक प्रकाशनाचा सोहळा पार पडला. या प्रसंगी भाजपा नेते विनोद तावडे यांनी खुप महत्वाचे वक्तव्य केले. सदर कार्यक्रमात बोलताना विनोद तावडे म्हणाले की, “पुर्वी महाराष्ट्राचे राजकारण खुप प्रगल्भ होतं. आम्ही एकमेकांवर टिका करायचो आणि पुन्हा एकत्र जेवायचो !” त्यांनी ते विरोधी पक्षनेता असतानाचा विलासराव देशमुखांचा किस्साही सांगितला. पुर्वी राजकारणात वैरभाव नव्हता. पण गेल्या काही वर्षात हे चित्र राहिले नसल्याची खंत विनोद तावडे यांनी बोलून दाखवली. खरेतर हे विनोद तावडेंनी बोलून दाखवलं यासाठी त्यांचे कौतुक करावे लागेल. अवघ्या महाराष्ट्राला हेच वाटतय. गेल्या आठ-दहा वर्षात राज्यातल्या राजकारणाचा स्तर अतिशय नीच पातळीवर आला आहे. राज्याच्या गल्लीबोळात ज्या पध्दतीचे वाद होत नाहीत, शिवीगाळी होत नाही तसे थिल्लर चित्र सध्या विधानसभेत पहायला मिळतं आहे. २०१४ नंतर राज्यात भाजपाची सत्ता आली आणि हे चित्र हळूहळू बदलत गेले. राज्याचे राजकारण गटाराच्याही खालच्या लायकीला आले. पण ही परस्थिती का आली ? कुणामुळं आली ? राज्याचे राजकारण कुणी नासवलं ? याचा विचार केला तर उत्तरासाठी डोकं खाजवण्याची गरज लागणार नाही. ज्यांना राजकारण जास्त कळत नाही ते लोकही याचं उत्तर सहज देतील. या सगळ्या नासलेल्या परस्थितीचा कर्ताधर्ता कोण आहे ते सांगतील. विनोद तावडे थेट बोलले नाहीत. त्यांनी वस्तुस्थितीवर बोट ठेवले पण हे राजकारण कुणी नासवलं ? का नासवलं ? याची त्यांनी मिमांसा केली नाही. त्यांची अडचण समजून घेता येईल. भाजपात राहून ते हे बोलू शकतात हे खुप महत्वाचं आहे. कारण अलिकडे गडकरी सोडले तर भाजपात फक्त चमच्यांची फॅक्टरी वाढली आहे. पुर्वी राजकारणात नेते टिका करायचे, पत्रकार टिका करायचे पण त्यांच्यात सलोखा होता. कुणातही विद्वेष नव्हता. व्यक्तीगत पातळीवर जिव्हाळा जपला जात होता. जुण्या सगळ्याच नेत्यांचे परस्पराच्यांवर आरोप व्हायचे पण ते तात्पुरतं असायचं. आचार्य अत्रेंचा आणि यशवंतराव चव्हाण यांच्यातला किस्सा तर सर्वांना माहिती आहे. सध्याच्या काळात अत्रेंसारखं कुणी लिहीले तर त्याचा ‘खून’ च केला जाईल.

 

२०१४ च्या मोदी लाटेत राज्यात भाजपाची सत्ता आली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले. राज्याची सुत्र त्यांच्याकडे गेली. हातात आलेली सत्ता कायम राखण्यासाठी फडणवीसांनी सर्वात पहिले स्वपक्षातील लोक संपवायला सुरूवात केली. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे असे एकामागे एक मोहरे बाद केले. स्व पक्षातील लोकांची वाट लावून झाल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा विरोधी पक्षातील लोकांच्याकडे वळवला. इतर पक्ष फोडायला, नेते बाद करायला सुरूवात केली. आजही हा सिलसिला चालूच आहे. खोट्या केसेस, इडीच्या धाडी वगैरे बी टिम त्यांच्या दिमतीला होतीच. भाजपासाठी हयात घालवणा-या लोकांना फाट्यावर मारत त्यांनी उपरे लोक आमदार-खासदार केले. त्यांना मंत्रीपदं बहाल केली. माधव भंडारीसारखे भाजपाचे प्रवक्ते अडगळीत पडले आणि नव्या चमच्यांना भाजपात वजन प्राप्त झाले. हे नवे चमचे फडणवीसांच्या मागे-पुढे करू लागले. फडणवीस पादले तरी, “व्वा व्वा काय सुगंध आहे !” अशा पध्दतीची भलामण हे लोक करू लागले. या लोकांना फडणवीसांनी विरोधकांच्यावर मोकळे सोडले. कुणी शरद पवारांच्यावर बोलायचं, कुणी उध्दव ठाकरेच्यावर बोलायचं, कुणी राहूल गांधींच्यावर बोलायचं. या टिनपाट लोकांनी खुपच कहर केला आहे. टिका करताना कुठलीही मर्यादा, सभ्यता ठेवायची नाही. अत्यंत विखारी भाषेत बोलायचं. वेळ प्रसंगी तो माणूस आयुष्यातून बरबाद झाला तरी चालेल पण त्याला धडा शिकवायचाच, त्याचा पत्ता कट करायचाच. अशा पध्दतीची व्युहरचना आखली गेली. जे जे फडणवीसांना नडले, त्यांच्या आड आले त्यांची त्यांची व्हिलेवाट लावण्याचे काम या टिमने करायचे. त्यांना फडणवीसांचा आशिर्वाद आणि सत्तेचे कवच होतेच. या शिवाय त्यांना सत्तेचा लाभ होताच. त्यांचे एकच काम होते. ही टिम फडणवीसांच्या विरोधकांच्यावर पिसाळलेल्या कुत्र्यासारखं तुटून पडते. त्यांचे उभे आडवे लचके तोडते. त्याला सरळ ठेवायचाच नाही असा त्यांचा हेका असतो. या नंतर फडणवीस कसे महान आहेत ? त्यांचे नेतृत्व किती मोठे आहे ? अशा फुशारक्या मारायच्या. फडणवीस हागले तरी,”व्वा व्वा काय स्वाद आहे !” असच बोलायचं. राज्याच्या राजकारणात जसे देवेंद्र फडणवीसांचे महत्व वाढले, त्यांना दिल्लीचा आशिर्वाद लाभला तसे राज्याचे राजकारण नासायला सुरूवात झाली. या पुर्वी गोपिनाथ मुंडे, प्रमोद महाजन, नितिन गडकरी, एकनाथ खडसे, अण्णा डांगे ही मंडळी भाजपाची आणि राजकारणाची बुज ठेवून होती. त्यांनी त्यांच्या विचाराचे कार्यकर्ते घडवले. पक्ष वाढवला, मोठा केला. राजकारणतली सभ्यता सांभाळली. पण भाजपातून जसे मुंडे-महाजन गेले तसे चित्र बदलले. पक्षासाठीचे योगदान, गुणवत्ता या पेक्षा हलकटपणाला आणि लाचारीला महत्व प्राप्त झाले. फडणवीसांच्याकडून सत्तेचा लाभ देताना अशाच पध्दतीने मुल्यमापन होते की काय ? असा प्रश्न पडतो.

 

याचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीवर आणि सभ्यतेवर झाला आहे. ज्या महाराष्ट्राने देशाला अनेक क्षेत्रात आदर्श उभा करून दिला त्याच महाराष्ट्राची आजची अवस्था जुण्या युपी-बिहार सारखी झाली आहे. राज्यातले राजकारण नासले आहे. येणा-या काळात याच हलकट राजकारणासाठी खुलेआम मुडदे पाडले जातील. फडणवीसांची आयात टिम टिका करताना ज्या पध्दतीची भाषा वापरते ती राज्याच्या संस्कृतीला साजेशी नाही. फडणवीसांनी याची सुरूवात केली. त्यानंतर विरोधकांनीही आपली वस्त्रे सोडायला सुरूवात केली आहे. तिथेही आता असल्याच संस्कृतीला महत्व आहे. एकमेकावर बोलताना, घसरताना कुठल्या मर्यादेवर जायला हवं ? याचा विचार व्हावा. काही दिवसापुर्वी अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांची गाडी मनसेकडून फोडली गेली. त्यावेळी मनसेचा एक कार्यकर्ता ह्रदयविकाराच्या झटक्याने मेला. त्याचे आयुष्य संपले, त्याच्या घरावर दु:खाचा डोंगर कोसळला. मरणारे मरतात, नेत्यांचे काहीच वाकडे होत नाही. नेते मरणा-या आणि नेत्यांसाठी तुरूंगात जाणा-या कार्यकर्त्यांचे घर चालवायला जात नाहीत. परवा शिवसेना आणि मनसेत राडा झाला तो ही असलाच. यात सामान्य कार्यकर्ता बरबाद होईल. राज ठाकरेंच किंवा उध्दव ठाकरेंच काय वाकडं होणार आहे ? पण बेअक्कल कार्यकर्त्यांना अकला कधी येणार ? हा प्रश्न आहे. ही राडेबाजी महाराष्ट्राची नक्कीच संस्कृती नाही. या राडेबाजीची बिजं देवेंद्र फडणवीसांनी पेरली आहेत. ती आता उगवून यायला लागली आहेत. येणा-या काळात तरारून उगवून येतील. तेव्हा हा महाराष्ट्र उभा जळताना दिसेल. कधी नव्हे इतका महाराष्ट्र नासला आहे. जाती-पातीचे वाद, धर्मा-देवाचे वाद यापुर्वी कधीच नव्हते. समोरून एखादा मित्र आलाच तर प्रथम त्याची जात लोकांच्या डोळ्यासमोर येते. तो माणूस म्हणून दिसण्याऐवजी जात म्हणून दिसतो आहे. हे वातावरण भयंकर विषारी आहे. असले विषारी वातावरण यापुर्वी कधीच नव्हते. फडणवीस किंवा दुसरे कुणीच चिरकाल सत्तेत राहू शकत नाहीत. ‘उदय’ आणि ‘अस्त’ हा निसर्गाचा नियम आहे पण सत्तेच्या तापाने फणफणलेल्या लोकांना याचे भान कुठे असते ? अशा नेत्यांची चाटूगिरी करणा-या स्वार्थांध चमच्यांनाही त्याचे भान रहात नाही. आज अवघा महाराष्ट्रच विनाशाच्या उंबरठ्यावर उभा असलेला दिसतो आहे.

 

छत्रपती शिवरायांच्या काळात त्यांना अनेक बलाढ्य शत्रूंना सामोर जावं लागलं. आदिलशहा, निजामशहा, औरंगजेब, अफझलखान वगैरे वगैरे अशा अनेक शहा आणि सरदारांची नावे ओठावर येतील. पण महाराष्ट्राने या सगळ्या स्वराज्याच्या शत्रूपेक्षा जास्त तिरस्कार अणाजीपंताचा केला. त्याने जे विष पेरले त्याने स्वराज्याची वाट लागली. देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेत हेच मत आहे. त्यांचे चेले-चपाटे फडणवीसांच्या विष्ठेला पेढा म्हणून खातीलही कारण त्यात त्यांचा स्वार्थ दडला आहे. पण वास्तव वेगळे आहे. फडणवीसांना या चेले चपाट्यांच्या कोंडाळ्यातून वस्तुस्थिती समजणार नाही. सामान्य जनता फडणवीसांच्या बाबतीत हेच बोलते आहे. फडणवीस चाणाक्ष आहेत, बुद्धीमान आहेत. त्यांच्याकडून खुप अपेक्षा होत्या पण झालं उलटच. अजूनही वेळ गेली नाही. पुन्हा राज्याचे राजकारण, समाजकारण आणि एकूणच सगळे वातावरण निखळ व प्रगल्भ होवू शकतं. राज्यात सलोख्याचे वातावरण निर्माण होवू शकते. फडणवीस हे चित्र बदलू शकतात. त्यांच्यात ती धमक आहे. फक्त गरज आहे त्यांनी विधायक राजकारणाकडे पाऊल टाकण्याची. त्याच्या मागची जी टूकार पिलावळ आहे तिला आवरण्याची. फडणवीसांनी जर आत्मपरिक्षण केले तर त्यांच्या लक्षात येईल की आपण काय करतो आहोत ? राज्य कुठल्या थराला घेवून जातो आहोत ? अणाजीपंत जसे शाश्वत खलनायक ठरले तसेच देवेंद्र फडणवीसही शाश्वत खलनायक ठरू शकतात. अणाजीपंताचे नाव जरी घेतले तरी लोकांना घृणा वाटते तसे फडणवीसांच्या बाबतीत घडू शकतं. फडणवीसांनी वेळीच हे सगळं सावरायला हवं. त्यांच्यासारखा एक चांगला व बुध्दीमान नेता असा विद्वेषाच्या राजकारणात वाया जाणे महाराष्ट्राला परवडणारे नाही. फडणवीसांच्या कारनाम्यांनी राजकीय व सामाजिक सलोख्याची वाट लागलीच पण त्यांची व्यक्तीगतही लागलेली आहे. त्यांना सत्तेच्या धुंदीत, आणि चमच्यांच्या खुषमस्करीत हे कळणार नाही. पण ज्या दिवशी त्यांच्यापासून सत्ता दुर जाईल तेव्हा त्यांना याची जाणीव होईल. पण त्यावेळी वेळ गेली असेल. आपण जे पेरतो तेच उगवतं हे शाश्वत सत्य आहे. संत कबीरांचा एक दोहा आहे, अगर बोया पेड बबूल का तो आम कहॉ से होए ।

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!