ज्या लोकांनी थट्टा उडवली आज त्यांना तोंडात बोट घालायची वेळ आली;रील स्टार सुरज चव्हाण मराठी बिग बॉस मध्ये निवड
(निलेश गायकवाड)
बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनची जोरदार सुरुवात झाली आहे. या सीझनमध्ये वेगवेगळे कलाकार पाहायला मिळतायत. अभिनेत्री वर्षा उसगावकरपासून ते छोटा पुढारीपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्ती घरात पाहायला मिळतायत. यावेळेस घरात अनेक रील स्टार्सची चलती आहे. या रील स्टार्समधील एक नाव आहे सुरज चव्हाण. गुलीगत धोका म्हणत टिकटॉक आणि रिल्सवर ज्याने धुमाकूळ घातला असा हा पठ्ठ्या बिग बॉसच्या घरात दाखल झाला आहे. टिक टॉकचे रेकॉर्ड मोडणारा, अस्सल मराठी मातीतला स्टार सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या घरात पोहोचला आहे. मात्र हा सूरज चव्हाण आहे तरी कोण, तो इथपर्यंत कसा पोहोचला असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. त्याचा इथपर्यंतचा प्रवास मुळीच सोपा नव्हता.
सुरज हा बारामतीमधील मोरगाव शेजारील मोडवे या गावात वास्तव्यास आहे. सुरजचा जन्म गरीब आणि छोट्या कुटुंबात झाला. मात्र लहानपणीच त्याच्या डोक्यावरचं आई- वडिलांचं छत्र हरपलं. त्यानंतर मोठ्या बहिणीने त्याचा सांभाळ केला. त्याला लहानाचं मोठं केलं. त्याचा स्वभाव फार भोळा आणि मृदू आहे. लहानपणापासून त्याने गरिबीत हलाखीचे दिवस पाहिले. त्यामुळे तो त्याचं शिक्षणही पूर्ण करू शकला नाही. त्याचं शिक्षण हे ८ वी पर्यंतच झालं आहे. त्यानंतर त्याला मोलमजुरी करावी लागली. तो दररोज मजुरीसाठी जायचा. मात्र एक दिवस त्याच्या बहिणीच्या मुलाने त्याला टिक टॉकबद्दल सांगितलं.
त्यानंतर सुरजने त्याच्या बहिणीच्या मोबाईलवर एक व्हिडिओ बनवला. त्यानंतर तो व्हायरल झाला. त्याला प्रसिद्धी मिळू लागली. त्याने मोलमजुरी करून स्वतःचा फोन घेतला. त्यानंतर स्वतःची आयडी बनवली व तो व्हिडिओ बनवू लागला. तो टिक टॉकवर इतका प्रसिद्ध झाला की लोक स्वतः त्याला भेटण्यासाठी येऊ लागले. मदतदेखील करू लागले. मात्र कालांतराने टिक टॉक भारतात बॅन झालं. मात्र त्यानंतर त्याला युट्युबवरील सीरिज ‘प्रेमासाठी काहीपण’ विचारणा झाली. त्यानंतर त्याने ‘बुक्कीत टेंगुळ’ हे व्हिडिओ केले. त्याला काही चित्रपटात काम करण्यासाठीही विचारणा झाली. त्याचे आज युट्यूबवर लाखो फॉलोवर्स आहेत.
सूरजने शून्यातून विश्व निर्माण केलं. आपण कसे दिसतो यापेक्षा आपल्या कलेला प्रोत्साहन देत त्याने आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द ठेवली. आता तो बिग बॉस मराठी मध्ये दिसतो आहे. सूरजला पाहताच अनेकांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली. मात्र सुरजची ही कथा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.