इंदापूर तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष तानाजी भोंग यांचा राजीनामा
(इंदापूर तालुका काॅंग्रेस ला पुन्हा एकदा मोठा धक्का )
(निलेश गायकवाड )
पुणे (इंदापूर): इंदापूर तालुका काँग्रेसचे नेते तानाजी भोंग यांनी इंदापूर तालुका काँग्रेसच्या प्रभारी कार्याध्यक्ष तसेच इंदापूर तालुका उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे.
त्यांच्याकडे या अगोदर महाराष्ट्र प्रदेश किसान कॉंग्रेसचे प. महाराष्ट्र सरचिटणीस पदही होते. त्याचाही राजीनामा दिला असल्याचे समजते .
तानाजी भोंग हे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कॉंग्रेस सोडल्यापासून सक्रिय होते. त्यांची तालुक्यात कॉंग्रेसचा शांत, संयमी,सर्वसामान्य चेहरा म्हणून ओळख होती. इंदापूर तालुक्यात कॉंग्रेसच काम आणि काँग्रेस चळवळ टिकवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता . २०१९ पासुन कॉंग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून नंतर महाराष्ट्र प्रदेशला किसान कॉंग्रेसचे सरचिटणीस म्हणून काम करत असताना त्यांनी शेतकरी, कृषी कामगार आदी विषयांवर महत्वपूर्ण भूमिका मांडलेल्या होत्या. गेल्या दिड दोन वर्षांत तालुका काँग्रेसचे प्रभारी कार्याध्यक्ष म्हणून काम केलेले आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार संजय जगताप, कॉंग्रेसचे नेते आमदार संग्राम थोपटे, प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचेशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. तरीही त्यांनी राजीनामा दिल्याने तालुक्यात व जिल्हात चर्चेचा विषय झाला आहे. सद्याच्या लोकसभा निवडणुकीत सुरवातीला त्यांनी जोरदारपणे महाविकास आघाडी म्हणून सहभाग घेतला होता.
त्यांच पक्षाच काम तालुक्यात , जिल्ह्यात तसेच राज्यात परिचित आहे. त्यांच्या समर्थनात व पक्ष वाढीसाठी तालुक्यात भरपूर लोक जोडलेली आहेत.त्यांचा तालुक्यात चांगला जनसंपर्क आहे.
त्यांच्याशी संपर्क साधला त्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला.पक्ष श्रेष्ठीवर नाराज असल्याचे समजते.कारण गेले दोन वर्षे झाली इंदापूर तालुक्याचे अध्यक्ष पद हे रिक्त असून, गेली दोन वर्षे प्रभारी अध्यक्ष नियुक्त आहेत.पण त्यांनी तसं काही नसल्याच सांगितले. येत्या काळात ते काय निर्णय घेतात हे औत्सुक्यचे ठरेल कारण विधानसभा जवळ आलेल्या आहेत.