हेरिटेज वॉकच्या माध्यमातून इतिहासाची जनजागृती
बारामती : (प्रतिनिधी – वर्षा चव्हाण)
बारामती तालुक्यातील लोणी भापकर येथे हेरिटेज वॉक च्या माध्यमातून मंदिरासोबत अनेक वीरगळ, यज्ञवराह, सुंदर पुष्करणी आणि इतिहासाच्या भरपूर गप्पा असा एकंदर कार्यक्रम पार पडला .
मंदिरे /देऊळं ही आपली अध्यात्मिक, धार्मिक व सांस्कृतिक पावित्र्याची अन् शिकवणीची तीर्थक्षेत्र किंवा पुरातन केंद्र आहेत तसेच ती कलेच्या आविष्काराचा दुर्मिळ ठेवा पण आहेत.
मंदिरासमवेत शिल्प, वीरगळ, शिलालेख, देवदेवतांच्या, यक्ष -किन्नरा,अप्सरा,प्राण्यांच्या-पक्षांच्या,वृक्ष-वेलींच्या नक्षी किंवा मुर्ती आपण नेहमीच बघत असतो,आपण देवदर्शन करतो व मंदिराभोवती प्रदक्षिणा घालतो व मंदीराच्या सौंदर्याकडे बघत बाहेर पडतो पण मंदिर कधी आपण वाचन केलंय का ?
जशी कुठलीही लिपी व भाषा वाचता येते अन् अर्थ बोध होतो तसंच मंदिरावरील शिल्प कलेचं पण आहे, शिल्प ही जशी कला आहे तसेच ती भाषा सुध्दा आहे, म्हणून त्यांचं वाचन कसं करायचं याचं प्रात्यक्षिक व मार्गदर्शन भारतीय विद्या अभ्यासक , इतिहास संशोधक डॉ. राहुल देशपांडे सर याचे कडून लाभले .
सदर कार्यक्रमाचे आयोजन विनोद खटके,मनोज कुंभार ,उदयसिंह भापकर ,विकास जाधव यांनी केले होते.