ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची प्रकृती खालावली उपचारा घेण्यास हाकेकडून नकार
अमळनेर : विक्की जाधव..
राज्यातील ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये अशी मागणी करत लक्ष्मण हाके जालन्यातील वडीगोद्री गावात उपोषणाला बसले आहेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. गेल्या 2 दिवसांपासून त्यांनी पाणीही घेणे बंद केले आहे. त्यामुळे, त्यांची प्रकृती बिघडली असून आज डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली.
त्यातच आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार समता परिषदेच्या शिष्टमंडळाने उपोषणस्थळी हाके यांची भेट घेतली आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, प्रदेश चिटणीस समाधान जेजुरकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी प्रा.लक्ष्मण हाके यांच्यासह आंदोलकांची भेट घेत पाठिंबा दिला
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 2 दिवसांपासून पाणी पिणेही बंद केले आहेत. त्यामुळे, त्यांची प्रकृती बिघडत चालली असून अशक्तपणाही आला आहे. लक्ष्मण हाके यांच्या शरीरातील शुगर आणि पाणीपातळी खालावली, चक्कर येत असल्याने डॉक्टरांच्या पथकाकडून त्यांना उपचाराचा आग्रह करण्यात आला. मात्र, हाके यांच्याकडून उपचार घेण्यास नकार देण्यात आला आहे. तर, डॉक्टरांनी सलाईन लावण्याची विनंती केली, पण सलाईन घेण्यासही त्यांनी नकार देत आपले प्राणांतिक उपोषण सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे, ओबीसी समाज बांधवांकडून हाके यांच्या उपोषणस्थळी गर्दी होत आहे. ओबीसी आरक्षणाच्या बचावसाठी राज्यात विविध ठिकाणी आंदोलन उपोषण सुरू आहे. त्यातच मंत्री छगन भुजबळ यांनी प्रा.लक्ष्मण हाके यांच्यासह आंदोलकांची फोनवरून चर्चा केली. त्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या शिष्टमंडळाने आज वडीगोद्री येथील आंदोलनस्थळी भेट देऊन हाके यांच्याशी चर्चा केली आहे.