November 21, 2024 8:52 pm

‘बा, तथागता’ विशाल काव्य मानवी कल्याणासाठी प्रेरक माजी कुलगुरू डॉ. एन. के. ठाकरे यांचे प्रतिपादन..

अपनी भाषा में पढ़े! Translate

‘बा, तथागता’ विशाल काव्य मानवी कल्याणासाठी प्रेरक माजी कुलगुरू डॉ. एन. के. ठाकरे यांचे प्रतिपादन..

अमळनेर : विक्की जाधव.

प्रताप महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने दिनांक ११ एप्रिल रोजी म.जोतिबा फुले जयंतीच्या निमित्ताने ‘बा’ तथागता : मानवतावादी सौंदर्यशास्त्र’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा प्रताप तत्त्वज्ञान केंद्रात आयोजित करण्यात आला होता. मानवतावादी विचारवंत तथा सुप्रसिद्ध साहित्यिक म. सु. पगारे लिखित ‘बा, तथागता’ या विशाल काव्यावर आधारित चर्चाचिंतन तसेच ‘ बा, तथागता : मानवतावादी सौंदर्यशास्त्र’ या डॉ. रमेश माने संपादित समीक्षा ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.

यावेळी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू तथा कवी लेखक आणि विचारवंत डॉ. एन. के. ठाकरे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

प्रारंभी मराठी विभाग प्रमुख डॉ. रमेश माने यांनी प्रास्ताविकातून चर्चाचिंतन व प्रकाशन सोहळ्याविषयी भूमिका कथन केली. या कार्यक्रमात चर्चाचिंतनासाठी अभ्यासक डॉ. धनराज धनगर, साहित्यिक व विचारवंत जयसिंग वाघ, प्राचार्य तथा साहित्यिक डॉ. संजीव गिरासे यांनी चर्चक म्हणून भूमिका पार पाडली. या तीनही वक्त्यांनी ग्रंथावर समीक्षा आणि संशोधन अशी विविधांगी चर्चा केली.

‘बा, तथागता : मानवतावादी सौंदर्यशास्त्र’ या डॉ. रमेश माने संपादित ग्रंथाचे प्रकाशन डॉ. एन. के. ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या ग्रंथात एकूण एकवीस अभ्यासकांचे संशोधन व समीक्षणात्मक लेखांचा समावेश आहे. 

कवी म. सु. पगारे यांनी ‘बा, तथागता’ या कवितेच्या निर्मितीसंदर्भात म्हटले की, *वाचकांच्या या विशाल काव्याच्या अनुषंगाने भावना आणि विचाराने प्रेरित झालेल्या अनेक प्रतिक्रिया प्राप्त होत आहेत. तसेच अनेक विद्वानांनी या लोकप्रिय विशाल काव्याचे विविध भाषांमधून अनुवाद करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे लवकरच मराठीसह हिंदी, इंग्रजी व अहिराणीमध्ये या लोकप्रिय पुस्तकाच्या प्रती वाचकांना उपलब्ध होणार आहेत.* ‘तथागत भगवान बुद्धांचे तत्त्वज्ञान हे समस्त मानव जातीच्या सर्वंकष कल्याणासाठी उपयोगी पडणारे आहे. त्यांचे जीवनकार्य आणि तत्त्वज्ञान सर्वसामान्य माणसाला कळावे त्या अनुषंगाने सूक्ष्म अभ्यास, चिंतन, निरीक्षण व संशोधन करून तीन आविष्करणातून शुद्ध स्वरूपाच्या आचरणाची प्रेरणा मिळावी, अशा निर्मळ हेतूने ‘बा, तथागता’ या विशाल काव्याची निर्मिती झाली आहे, असे मत व्यक्त केले.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. एन. के. ठाकरे म्हणाले की, ‘तथागत भगवान बुद्धांनी जगाच्या कल्याणासाठी आपले विचारकार्य समर्पित केले. बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचे साध्या सोप्या भाषेत कवी म. सु. पगारे यांनी विश्लेषण केले आहे. ‘बा, तथागता’ हे काव्य मानवी कल्याणासाठी प्रेरक आहे. हे काव्य वाचकांनी चिंतनाच्या पातळीवर समजून घ्यावे.’ असे यावेळी प्रतिपादन केले.

या प्रकाशन सोहळ्यासाठी प्रशांत पब्लिकेशन्सचे प्रकाशक रंगराव पाटील, प्रताप तत्त्वज्ञान केंद्राचे मानद संचालक डॉ. पी. एस. भावसार, खान्देश शिक्षण मंडळाचे सहचिटणीस डॉ. धीरज वैष्णव, डॉ कवी संजीवकुमार सोनवणे, प्रा. बी. एन. चौधरी, तसेच अमळनेर व परिसरातील साहित्य, शिक्षण, सामाजिक इत्यादी क्षेत्रातील मान्यवर साहित्यिक व रसिक मोठया संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेखक विलास मोरे यांनी केले. तर आभार प्रा. ज्ञानेश्वर कांबळे यांनी मानले.

कार्यक्रमाचे आयोजन मराठी विभाग प्रमुख डॉ. रमेश माने, प्रा. ज्ञानेश्वर कांबळे, प्रा. योगेश पाटील, डॉ. विलास गावीत, प्रा. प्रतिभा पाटील यांनी केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!