मुख्यमंत्र्यांना वाढदिवशी अनोखी भेट; थेट अमेरिकेतील टाइम्स स्क्वेअरवर झळकला शुभेच्छा देणारा व्हिडिओ
मुख्यमंत्री शिंदेंना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा; जरांगे पाटलांसोबतच्या फोटोंसह अमेरिकेतील प्रसिद्ध चौकात व्हिडिओतून शुभेच्छा
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचा जल्लोष सातासमुद्रापार; टाइम्स स्क्वेअरमधील व्हिडिओने वेधले सर्वांचेच लक्ष
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचा थेट अमेरिकेत जल्लोष; जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा विजयी क्षणही झळकला
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज ६० वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर राज्यासह देशभरातील विविध क्षेत्रांतील दिग्गज मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशातच आता थेट सातासमुद्रापार अमेरिकेतही मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन झाल्याचं पाहायला मिळालं. युवासेना पदाधिकारी राहुल कनाल यांनी टाइम्स स्क्वेअरवर व्हिडिओ झळकावत मुख्यमंत्री शिंदे यांना वाढदिवसानिमित्त ‘सरप्राइज गिफ्ट’ दिलं आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस थेट अमेरिकेतील सुप्रसिद्ध चौकात साजरा करण्यात आल्याने या व्हिडिओने सर्वाचंच लक्ष वेधून घेतलं आहे.
अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील टाइम्स स्क्वेअरमध्ये मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आलेल्या व्हिडिओमधून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या विजयी क्षणाचा फोटोही झळकला आहे. तसंच या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र व खासदार श्रीकांत शिंदे, युवासेना पदाधिकारी राहुल कनाल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी व मराठा आंदोलनावेळी सरकार आणि आंदोलक यांच्यात संवाददूताची भूमिका बजावणाऱ्या मंगेश चिवटे यांचाही फोटो झळकला आहे.
मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी पोस्टर्स लावणे, सोशल मीडियावर पोस्ट लिहिणे असे प्रकार नेहमी पाहायला मिळतात. मात्र राहुल कनाल यांनी थेट अमेरिकेतील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ झळकावल्याने या व्हिडिओची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे.