June 28, 2025 10:01 pm

आंतराष्ट्रीय पुरस्कारांच्या नावाखाली पत्रकार सहायता निधीची मागणी !

अपनी भाषा में पढ़े! Translate

आंतराष्ट्रीय पुरस्कारांच्या नावाखाली पत्रकार सहायता निधीची मागणी !

पुरस्कार्थींची फसवणूक करण्याचा नवा फंड

समाज माध्यमांवर आंतर राष्ट्रीय पुरस्कार योजना जाहिर करायची व नामांकन मागवायची पद्धत आत्ता सुरू झाली आहे. या माध्यमातून इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्डच्या निमित्ताने पत्रकार सहायता निधी गोळा करून पुरस्कार्थींकडून लाखो रूपये गोळा होत असल्याचा गैरप्रकार ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांनी उघडकीस आणला आहे.

बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणवणारा महेंद्र देशपांडे याने काही दिवसापुर्वी “इंटर नॅशनल एक्सलन्सी अवॉर्ड” देण्यात येणार असल्याचे समाज माध्यमांवर जाहिर करून नामांकन पाठवण्याचे आवाहन केले होते. पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात माजी खासदार रामशेठ ठाकूर यांना दि. ७ जानेवारी २०२४ रोजी जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार असून विविध क्षेत्रातील लोकांना “इंटर नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड” देण्यासाठी नामांकन मागविली आहेत.

डॉ. महेंद्र देशपांडे हे स्वत:ला पत्रकारितेत पीएच.डी. मिळाल्याचे सांगत असले तरी ही पीएचडी बोगस असल्याचे आढळून येते. बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाचा गैरवापर करून पुरस्कारासाठी आकर्षित केले जाते व नंतर पत्रकार सहायता निधीच्या गोंडस नावाखाली देणगीची मागणी केली जाते. तसेच वर्षभर वेगवेगळे पुरस्कार देण्याचा कार्यक्रम (डॉ?) महेंद्र देशपांडे हे बाळशास्री जांभेकर पत्रकार संघटनेच्या नावे विविध पुरस्काराचे कार्यक्रम करीत असतात. काहीजण गंमतीने म्हणतात की, यांनी तृतिय पंथियां खेरीज सर्वांना एवॉर्ड दिले आहेत.

पनवेल येथील पुरस्कार कार्यक्रमाची खात्री करून घेण्यासाठी पत्रकार दिलीप मालवणकर यांनी चौकशी केली असता अवघ्या पाचच मिनिटात “आपली इंटर नॅशनल एस्सलन्स अवॉर्डसाठी निवड झाली असून आपण पत्रकार सहायता निधीस ४ हजार रूपये जीपे करताच, आपणांस फोटोसह आपली निवड झाल्याचे पत्र व्हाट्सअप करण्यात येईल,”असे सांगण्यात आले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारासाठी इतक्या झटपट निवड कशी झाली ? यावरून मालवणकर यांना शंका येताच, त्यांनी सखोल चौकशी केली असता, सदर इसमाने बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने एक संस्था काढली असून वर्षभर वेगवेगळ्या लोकांना पुरस्कार देण्याचा सपाटा लावून पैसे गोळा करीत असतो. पत्रकार सहायता निधीसाठी पुरस्कारांच्या निमित्ताने पैसे गोळा करूनही आजवर कोणत्याही पत्रकारांस सहायता केल्याचे ऐकिवात नाही. एका स्थानिक संस्थेस आंतरराष्ट्रीय पुरस्कार देण्याचा व जीवन गौरव पुरस्कार देण्याचा अधिकार आहे का ? असा प्रश्न मालवणकर यांनी उपस्थित केला आहे.

सदर कार्यक्रमास माजी खासदार रामशेठ ठाकूर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार प्रसाद लाड, उद्योजक जे. एम. म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार विवेक मेहेत्रे आदी उपस्थित राहणार असल्याचे दर्शवून पुरस्कारासाठी नामांकन देण्यास आकृष्ट करीत आहेत व त्या माध्यमातून पुरस्कार्थींची संभाव्य फसवणूक करण्यात येत आहे. आजवर अनेक इच्छूक या भूलथापांना बळी पडले आहेत. या पुरस्कारांना शासन दरबारी कवडीचीही किंमत नसते. तरी अशा गैरप्रकारांना बळी पडू नये, तसेच माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी त्यांना जीवन गौरव पुरस्कार देण्याचे जाहिर करून पनवेल मधेच हा कार्यक्रम ७ जानेवारी रोजी आयोजित केला असल्याचे जाहिर केले असल्याने माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनीही याबाबत खुलासा करावा, अशी मागणी मालवणकर यांनी केली आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!