July 1, 2025 1:48 am

पुरस्कारांचा बाजार व पुरस्कार देण्याचा बिनभांडवली धंदा !

अपनी भाषा में पढ़े! Translate

पुरस्कारांचा बाजार व पुरस्कार देण्याचा बिनभांडवली धंदा !
पुरस्कारांचा आत्ता पूर आला आहे. आठवडे बाजाराप्रमाणे नित्य नेमाने घाऊक पुरस्कार वाटणा-यांची टोळी सर्वत्र कार्यरत आहे. देणगी वा सहायता निधी द्या आणि कोणीही मासळी बाजारात मासे खरेदी करावेत तसे पुरस्कार घेऊन जा ! तुम्हाला पुरस्कार तर आमचा उद्धार ! हा परवलीचा शब्द झाला आहे. पुरस्कार देणारे दलाल आत्ता जागोजागी आढळून येत आहेत. या अपप्रवृत्तीचा निषेध करण्याऐवजी समाजातील बुद्धीजीवी म्हणवणारे व समाजप्रबोधन करणे हे ज्यांचे कर्तव्य आहे , ते या मोहजालात अडकत आहेत. या विषयी मी अनेकवेळा प्रकाशझोत टाकला आहे.
आज हा लेख नव्याने लिहिण्याचा उद्देश जनजागृती हाच आहे. स्वत:ला बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणवणा-या डॉ (?) महेंद्र देशपांडे यांनी इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्डसाठी नामांकन मागविण्यासाठी समाज माध्यमांवर आवाहन केले आहे.आचार्य बाळशास्री जांभेकर या मराठीतील आद्य पत्रकारांच्या नावाने पुरस्कार मिळत असेल तर तो कोणत्याही पत्रकाराला मोठा सन्मान वाटणे स्वाभाविकच आहे. मात्र त्या भावनेला कॅश करून जर त्याचा बाजार मांडला जात असेल तर त्याचा निषेध हा झालाच पाहिजे. मी केलेली टीका काहींना झोंबते परंतू माझा नाईलाज आहे. जसे काही लोकांना पुरस्कारांचा हव्यास असतो तसाच ते विकून अर्थार्जन करणे हा काहींचा व्यवसाय झाला आहे.
मध्यंतरी तर पीएच.डी.चा बाजार मांडला होता. अगदी राजभवन हा पीएचडी वाटपाचा अड्डा झाला होता. त्याचा गौप्यस्फोट Sprouts चे संपादक उन्मेष गुजराथी यांनी वेळोवेळी केला आहे. त्यामुळे त्या तपशिलात मी जात नाही.
आमच्या महापालिकेतील जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांनी टोंगा या बेटसदृश्य देशाच्या कॉमनवेल्थ वोकेशनल युनिव्हर्सिटीतून १.२० लाख रूपये देऊन डॉक्टरेट मिळवली होती.मी त्याचे बिंग फोडल्याने उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सदर पीएच.डी. अवैध असल्याचा निर्वाळा दिल्यानंतर ती रद्द करण्यात आली व त्याच्या नावासमोरील डॉ. ही हटविण्यात आले. मध्यंतरी डॉ. डि.वाय. पाटील युनिव्हर्सिटीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डॉक्टरेट बहाल केली होती. ते मुख्यमंत्री पदावर असताना त्यांना अशी पदवी दान करणे हे अनैतिक आहे.
कोणत्याही NGO ने उठावे व पीएच.डी. दान करावी याचा अर्थ पानटपरीवर पान जितक्या सहजतेने मिळते तितक्या सहजतेने पीएच.डी मिळते. तुम्ही पीएच.डी.चे पान चघळत बसा ते तुम्हाला चुना लावून पैसे उकळत राहतात. त्यामुळे रितसर कोर्स करून, एखाद्या विषयावर संशोधन करून व प्रबंध सादर करणा-या गुणवंत लोकांच्या मांडीला मांडी लावून हे फुकटे पीएच.डी.धारक बसतात. हा गंभीर विषय आहे.त्याला पायबंद बसावा म्हणून हा प्रयत्न.
माझे मित्र म्हणतात, अरे आकाशच फाटले आहे, तू ठिगळ कुठे कुठे लावणार ? त्यांना मी सांगू इच्छितो- कौन कहेता है, आसमान को छेद नही होता, एक पथ्थर तब्यतसे उछालो तो यारो ! मी माझ्या सामाजिक बांधिलकीचा खारीचा वाटा उचलत आहे, याचे मला समाधान आहे.
आत्ता आजच्या विषयावर येतो. कोणी तरी स्वत:ला एखाद्या नाशिकस्थित संस्थेचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणवून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने पुरस्कार वाटपाचा सपाटा लावत असेल व पत्रकार सहायता निधीच्या नावे पैसे मागून पुरस्कारांची खिरापत वाटत असेल तर तो गंभीर विषय आहे. या संस्थेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र स्तरावर असेल असे जरी आपण गृहित धरले तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक्सलन्स अवॉर्ड देण्याचा अधिकार यांना कोणी दिला. त्यांचे परिक्षक कोण, निवड समितीत कोण कोण आहेत ? त्यांची शैक्षणिक व बौद्धिक पात्रता काय आहे ? या संस्थेने आजवर या निधीतून किती पत्रकारांना सहायता केली आहे?
माझा अनुभवच सांगतो. “मी ते आवाहन वाचले व उत्सूकतेपोटी फोन केला. तर मला महेंद्र देशपांडे या व्यक्तिने सांगिले तुम्ही तुमची माहिती पाठवा मग आम्ही तुमचा विचार करू ! मी माझी छापील माहिती व्हाट्सअप करताच अवघ्या ५ मिनिटातच मला निरोप आला की तुमची International Excellence Award साठी निवड झाली असून आपण पत्रकार सहाय्यता निधीस ४ हजार पाठवताच तुम्हाला तुमच्या फोटोसह निवड झाल्याचे पत्र देण्यात येईल. मी तर संभ्रमातच पडलो. माझी माहिती वाचली कधी, निवड समितीने निवड केली कधी ? काहीच नाही.फक्त पाचच मिनिटात आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली ? ?
या बाबत अधिक चौकशी केली असता सदर व्यक्तिस पत्रकारितेत पीएच.डी मिळाल्याचे कळताच अजून एक धक्का बसला. यांनी पत्रकारितेत कोणता शोध निबंध लिहिला ? कोणता कोर्स केला ? तर काहीही कळले नाही. नंतर कळले की ही तर मानद पदवी आहे. मानद पदवी देण्याचा अधिकार कोणाला आहे ? मानद पदवीधारक डॉ.लावू शकत नाही.आणि हे महाशय तर डॉ. महेंद्र देशपांडे अशी आपली ओळख सांगतात. हा पदवीदान समारंभ हैद्राबाद मधे न होता नाशिकला झाला व त्या समारंभात कथित विद्यापिठाचा एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हता, यातच सर्व आले. पुढे असेही कळले की ते वर्षभर असे विविध प्रकारचे पुरस्कार देत असतात.अशा पुरस्कारांना शासकिय पातळीवर कवडीचीही किंमत नसते.
आगामी ७ जानेवारीचा कार्यक्रम पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके सभागृहात असल्याचे जाहिर केले आहे. तेथे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. जीवन गौरव पुरस्कार द्यायला ही काही शासकिय संस्था नाही. कार्यक्रमाचा खर्च त्यांच्या माथी मारण्याच्या बदल्यात हा जीवन गौरव पुरस्कार दिला तर नाही ना ?
या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस,मंत्री मंगल प्रभात लोढा,आमदार प्रशांत ठाकून, आमदार प्रसाद लाड,उद्योजक जे.एम. म्हात्रे, संपादक विवेक मेेहेत्रे आदी मान्यवरांना आमंत्रित केले असल्याचे म्हटले आहे, ते उपस्थित राहतील असे म्हटलेले नाही. या वरून हा किती भोंगळ प्रकार असावा, याची कल्पना यावी. या मोहजालात ज्यांना अडकायचे त्यांनी खु़शाल अडकावे,मला विघ्न संतोषी म्हणायचे असेल तरी खुशाल म्हणावे ! सत्य ठासून मांडणे हे माझे कर्तव्य आहे व मी हे कर्तव्य भावनेेनेच लिहिले आहे.
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार
९८२२९०२४७०

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!