इंदापूर, चिपळूण, संगमेश्वर या तालुक्यांमधल्या पर्यटनक्षेत्रांचा परिपूर्ण विकास आराखडा सादर करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
(निलेश गायकवाड)
इंदापूर, चिपळूण, संगमेश्वर या तालुक्यांमधल्या पर्यटनक्षेत्रांचा परिपूर्ण विकास आराखडा सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. ते आज मुंबईत यासंदर्भात आयोजित बैठकीत बोलत होते. या विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, आवश्यक निधी तातडीनं उपलब्ध केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. पुणे जिल्ह्यात इंदापूर इथली मालोजीराजे भोसले यांची गढी, हजरत चाँदशाहवली बाबांचा दरगाह, रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यात कसबा इथलं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक, श्री मार्लेश्वर देवस्थान, चिपळूण गुहागर वळण रस्त्यावरची पुरातन बौद्ध लेणी, आदी क्षेत्रांना ऐतिहासिक, आध्यात्मिक, पुरातत्वीय वारसा आहे. या क्षेत्रांचा विकास करताना पुरातत्वीय महत्वं, ऐतिहासिक सौंदर्य जपावं, पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा देण्याबरोबरच त्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावं, अशा सूचना अजीत पवार यांनी दिल्या. बैठकीला माजी राज्यमंत्री तथा आमदार दत्तात्रय भरणे, आमदार शेखर निकम, आणि वरीष्ठ सरकारी आधिकारी उपस्थित होते.