करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- महाराष्ट्रात ना भूतो न भविष्यती अशा राजकीय युत्या, आघाड्या घडल्या. जनतेने स्वप्नात ही न पाहिलेल सरकार प्रत्यक्ष डोळ्याने उभारताना ही पाहिले व कोसळताना ही पाहिले. एकमेकावर राजकिय कुरघोड्या ने तर संपूर्ण देश पातळीवरील राजकारण ढवळून निघाले. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या आणि पुन्हा एकत्र येत झालं गेलं गंगेला मिळालं म्हणून दिलजमाई झाली.
मग यामध्ये माढा लोकसभा मतदार संघ मागे कसा राहील. सन 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी काँग्रेस पक्षातून भाजपा मध्ये प्रवेश केलेले रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मोहिते पाटील यांना बरोबर घेऊन माढा लोकसभेची निवडणूक जिंकली. त्यावेळी त्यांना प्रतिस्पर्धी म्हणून करमाळा तालुक्याचे विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळवत मोठी टक्कर दिली. परंतू या अटीतटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार संजय मामा शिंदे यांचा पराभव झाला व रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा विजय झाला. या गोष्टी सर्वश्रुत आहे.
माढयाचे शिंदे बंधू व अकलूज चे मोहिते पाटील यांच्यातील राजकिय वैमनस्य संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहे. ज्या मोहिते पाटील यांनी माळशिरस मधून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना एक लाखाचे मताधिक्य देऊ असे जाहीर वक्तव्य केल्यानंतर अनेकांना हा विषय हास्यास्पद वाटला तर शिंदे यांनी एक लाखाच्या वर मताधिक्य मिळाल्यास स्वतः राजकारणातून सन्यास घेईल असे विधान केले होते. परंतु मोहिते पाटील यांनी एक लाखाहून अधिक मताधिक्य निंबाळकर यांना देऊन विजयात सिंहाचा वाटा उचलला त्यामूळे संजय मामा शिंदे यांना पराभव पत्करावा लागला.
आता 2024 ला मोहिते पाटील यांना भाजपा ची लोकसभेची उमेदवारी मिळू नये यासाठी निंबाळकर यांच्या पासुन ते माढयाचे शिंदे बंधू प्रयत्न करत असल्याच्या चर्चा ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे. निंबाळकर यांना विजयी करण्यात करमाळा मतदार संघाचे माजी आमदार नारायण पाटील व शिवसेनेच्या पदाधिकऱ्यांनी मोलाची कामगिरी बजावली होती. परंतु सध्या पाटील यांनाही दूर ठेवून निंबाळकर हे शिंदे बंधूशी जवळीक साधत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. कारण नारायण पाटील हे मोहिते पाटील यांच्याशी संलग्न असल्याने शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या उक्ती प्रमाणे शिंदे बंधुशी निंबाळकर यांची सलगी वाढलेली आहे. ज्या नारायण पाटील यांनी निंबाळकर यांना विजयी करण्यासाठी ठिकठिकाणी सभा घेतल्या शिंदे बंधुंवर कडाडून शाब्दिक प्रहार केला. त्या नारायण पाटील यांना मागील काही महिन्यात डावलून शिंदे बंधू यांच्यासोबत व्यासपीठावर निंबाळकर दिसत आहेत.
निंबाळकर यांना ठाउक आहे की, नारायण पाटील यांना जवळ ठेवले तर फक्त करमाळा तालुक्यातील मते मिळू शकतात परंतु शिंदे बंधूशी जवळीकता साधली तर करमाळा बरोबर माढयाची मते मिळू शकतात असे दुहेरी बेरजेचे राजकारण सध्या निंबाळकर यांच्या कडून होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे मोहिते पाटील व नारायण पाटील समर्थक यांच्यात सध्याच्या चाललेल्या राजकारणावर तीव्र संताप व्यक्त होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे मोहिते पाटील व निंबाळकर यांची युती होईल का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. जर भाजपची उमेदवारी निंबाळकर यांना मिळाली तर मोहिते पाटील काय भूमिका घेतील व मोहिते पाटील यांना भाजपा ची उमेदवारी मिळाली तर निंबाळकर काय भूमिका घेतील याकडे संपूर्ण माढा लोकसभा मतदार संघाचे लक्ष लागून राहिले आहे.