उमेदवारी दाखल होण्यापूर्वीच रात्र जागून काढण्याची वेळ: निवडणूक अर्जाला ´एरर´चा फटका
( इतरांचा अंदाज घेऊन उमेदवारी अर्ज भरणाऱ्यांनो सावधान )
(निलेश गायकवाड )
इंदापूर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे निवडणुकीसाठी उमेदवारांना https://mahasec.maharashtra.gov. in या वेबसाईटवर अर्ज भरावे लागत आहेत. महा-ई-सेवा केंद्रात जाऊन हे कामे करावे लागत आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात इतरांचा अंदाज घेऊन उमेदवारी अर्ज भरू, असे ठरविणाऱ्या इच्छुकांपुढे ही वेबसाईट सातत्याने बंद पडत असल्याने आता मोठे संकट निर्माण झाले आहे. मंगळवारी अनेक इच्छुकांनी महा-ई-सेवा केंद्राच्या ठिकाणी रात्र जागून काढली. सरपंच पदाचा एक उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी किमान दीड तासाचा वेळ लागतो. विविध विवरण पत्रांसह अनेक प्रतिज्ञापत्रे विवाह नोंदणीची सत्यप्रत गॅझेट रहिवासी पुरावा विविध हमीपत्रे अपत्यांबाबतची घोषणापत्र जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र अशा अनेक किचकट बाबी अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. ही सगळी प्रक्रिया अत्यंत किचकट आहे. त्यामुळे सर्वच महा-ई केंद्र चालकांना हे अर्ज भरून घेता येतील, अशी ही परिस्थिती राहिलेली नाही. नियमित काम करणारे हुशार केंद्र चालक हे अर्ज भरू शकतात. त्यांनाही सध्या रात्रीचा दिवस करावा लागत आहे.
उमेदवारी अर्ज भरताना डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावे लागत आहे. चुकीची माहिती भरली तर निवडणुकीनंतर विजयी उमेदवारांचे सर्व विवरणपत्रे प्रतिज्ञापत्रे काढून पराभूत उमेदवार हमखास तक्रारी करतात. त्यामुळे अर्ज भरताना कोणतीही चूक होऊ नये यासाठी प्रत्येक इच्छुक लक्ष घालत आहेत.
अर्ज दाखल होण्याबाबत धाकधूक वाढली
एकीकडे इंटरनेट सेवेचा बोजवारा उडतो आहे तर दुसरीकडे इंटरनेट सेवा सुरू झाल्यावर वेबसाईट एरर येण्याचे प्रमाण वाढले आहे. बुधवारी तर दिवसातील अनेक तास ही वेबसाईट खुलीच होत नव्हती. त्यामुळे इच्छुकांची मोठी गैरसोय झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 2 डिसेंबर ही आहे. परंतु सातत्याने येत असलेल्या अडथळ्यांमुळे आता अर्ज दाखल होतील की नाही अशी धाकधूक इच्छुकांना लागली आहे.
