देवा तुला सोन्याचा शर्ट वाहिन !
एका निपुत्रीक दांपत्याला मुल बाळ होत नव्हतं. त्याने एका जागृत मानल्या जाणा-या देवस्थानात जाऊन नवस केला. देवा जर मला पुत्रप्राप्ती झाली तर मी तुला सोन्याचा शर्ट वाहिन. आणि एनकेन प्रकारे (बहुदा टेस्ट ट्युब बेबी मुळे ) त्या दांपत्याला पुत्र प्राप्ती झाली. देवीने आपले मागणे पूर्ण केले,आत्ता नवस फेडायची वेळ येऊन ठेपली.
सोनं किती महाग,आणि सोन्याचा शर्ट द्यायचा तर लाखो रूपये लागणार ! आपली तर ऐपतच नाही,आत्ता करायचे काय ? नवस फेडला नाही तर देवी कोपणार ! ही भीती होतीच.परंतू तो भक्त पक्का राजकारणी होता.बहुदा ठाण्यातील काॅलनी परिसरातील. मग काय ? त्यांनी देवालाच मुर्ख बनवण्याचा घाट घातला, आणि नवस फेडायला गेले सुद्धा ! ते ही शर्ट घेऊन. सोन्याचा शर्ट घालून नवस फेडला जाणार, ही वार्ता कर्णोपकर्णी वा-यासारखी पसरली ! टेंभी नाक्यावर गर्दी जमली. तो दाढीधारी भक्त पुढे आला, लोकांनी श्वास रोखला, सोन्याचा शर्ट पाहण्यासाठी सर्व जण आतुरलेले होते.त्याने पिशवीतून आणलेला शर्ट काढून देवीच्या पायाशी ठेवला. गर्दी अवाक् झाली, सोन्याचा लवलेश नसलेला शर्ट देवीच्या पायाशी होता. लोक बोलले, धोका,धोका ! याने तर देवीलीही फसवलं ! तो दाढीवाला पांढरा शुभ्र वेश परिधान केलेला टेंभी नाक्यावरील देवतेचा भक्त बोलला.मी कोणताही धोका दिलेला नाही,मी गद्दारी मुळीच केलेली नाही.मी गद्दार नाही तर खुद्दार आहे. लोक बोलले तु खोटारडा आहेस,लबाड आहेस ! तू दैवतांना फसवतोस तर आमच्याशी काय इमान राखणार ! तेंव्हा तो बोलला,मी कामाख्या देवीची शपथ घेऊन सांगतो,मी देवीला फसवलेे नाही.हा सोन्याचाच शर्ट आहे.पण तुमच्या लक्षात कसे येत नाही.आणि त्याने तो शर्ट उचलून छोट्या बालकाला घातला.बोलला, हे बघा ! हा शर्ट सोन्याच्याच मापाचा आहे.मी शर्ट शिवण्याआधी या नवसाने झालेल्या मुलाचे नांव सोन्या ठेवले आहे. नंतर त्याने तो शर्ट त्या बालकाच्या अंगातून काढून त्या बालकास सांगितले, या लोकांचा ना माझ्यावर विश्वासच बसत नाही, सोन्या बाळा हा शर्ट तूच आत्ता देवीला दे व नवस फेड ! ती देवी आपल्या भक्ताची चापलुशी पाहून हसली, जनता ही फसली व त्या राजकिय नेता कम बाप रूपी भक्ताचा जयजयकार करू लागली !
तात्पर्य : लोकांना मुर्ख बनवणं सोप्प असतं, ते ज्याला जमतं तोच गद्दारीवर निष्ठेचा मुलामा चढवू शकतो.आपल्या आसपास असे लोक आहेत, त्यांच्या पासून सावध रहा.तिकिट देतो म्हणून तुम्हाला जाळ्यात अडकवतील आणि ऐन वेळी गावाचं किंवा प्लॅटफाॅर्म तिकिट हातावर टेकवतील.
ही कथा वास्तवावर आधारित पंरतू काल्पनिक कथा आहे.लोकहितार्थ प्रकाशित केली आहे.
दिलीप मालवणकर
९८२२९०२४७०