गुलाबी थंडीत राजकारण तापू लागले : ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी
(निलेश गायकवाड )
पुणे – जिल्ह्यात ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. जिल्ह्यातील 221 ग्रामपंचायतींवर जनतेतून थेट सरपंचाची निवड केली जाणार आहे.त्यात इंदापूर तालुक्यात मुदत संपलेल्या २६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर.18 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे, तर 20 तारखेला निकाल लागेल. त्यामुळे गुलाबी थंडीत इंदापूर तालुक्यातील राजकीय वातावरण तापणार आहे. सरपंच उमेदवारांसह सदस्य पदांसाठी उमेदवारांची निवड पूर्ण करून प्रचार मोहिमेसाठी रणनीती आखली जात आहे.
ग्रामपंचायतमध्ये प्रशासक राज येणार व त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक लांबणीवर जाणार, अशा चर्चांमुळे अनेक गावात उमेदवारांची निवड करण्यास पुढाऱ्यांनी दुर्लक्ष केले होते; मात्र आता सर्वांनी उमेदवारांच्या निवडीवर फोकस केले आहे.
उमेदवारीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज असलेले निवडणूक लढण्यास इच्छुक उमेदवार लोकांच्या व पुढाऱ्यांच्या भेटी घेत आहेत. त्यातच पुढाऱ्यांनी सदस्य पदांसाठी उमेदवारांची यादी बनविणे सुरू केले असून येत्या चार-पाच दिवसांत त्याला अंतिम रूप देऊन प्रचार सुरू करण्यात येणार आहे.
राजकीय पक्ष लागले कामाला
येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांची ही एकप्रकारे राजकीय तालीमच असणार आहे. स्थानिक राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक हाच प्रमुख मार्ग आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष कंबर कसून सज्ज व सतर्क झाले असून सभा व बैठकीचे नियोजन केले आहे.
इंदापूर तालुक्यात सर्वच निवडणुका या चुरशीने होतात. तसेच या ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंच निवड होणार आहे. त्यामुळे आगामी काही कालावधीत होणाऱ्या या ग्रामपंचायतींवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रवादी व भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी चालवली आहे. ग्रामपंचायतीनंतर आगामी काही महिन्यांत तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे ऐन थंडीत या गावांमध्ये वातावरण तापणार आहे.
जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, माजी सदस्य श्रीमंत ढोले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, माजी अध्यक्ष महारुद्र पाटील, युवक अध्यक्ष शुभम निंबाळकर, भाजपचे तालुकाध्यक्ष ॲड. शरद जामदार यांच्या गावांचा निवडणूक होणाऱ्या गावांमध्ये समावेश आहे.
पडस्थळ, मदनवाडी, माळवाडी, रणमोडवाडी, डाळज नं. २, बीजवडी, लाखेवाडी, थोरातवाडी, जांब, बोरी, न्हावी, हिंगणवाडी, झगडेवाडी, कळाशी, कुरवली, म्हसोबावाडी, मानकरवाडी, रेडणी, डाळज नं.१, डाळज नं.३, बेलवाडी, डिकसळ, अजोती, सराटी, पिंपरी खुर्द, गंगावळण, या इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे.