राशिन येथील हशू आडवाणी विद्यालयाच्यावतीने जनजागृती रॅली
कर्जत (विशेष प्रतिनिधी-संदिप आढाव)
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त “हर घर तिरंगा” या अभियानाच्या जागृतीसाठी आज राशीन शहरांमधून समाज विकास संस्थेच्या हशू आडवणी माध्यमिक व उच्च माध्यमिक (कला, वाणिज्य, विज्ञान) विद्यालय राशीन च्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाज विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अल्लाउद्दीनजी एस. काझी यांच्या हस्ते प्रभातफेरीचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्रजी नष्टे यांच्या मार्गदर्शनाखाली रॅलीची सुरुवात झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रादेशिक पोशाख तसेच महापुरुषांचे वेष परिधान केलेले होते हे या प्रभात फेरीचे आकर्षण ठरले. या फेरिला माजी मंत्री व विधान परिषद सदस्य प्रा.राम शिंदे यांनी शुभेच्छापर भेट दिली. याप्रसंगी विद्यार्थी आणि शिक्षक यांचे विशेष कौतुक केले. तसेच श्री. जगदंबा विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय दिलीप खंडागळे आणि पर्यवेक्षक श्री. सोनवणे सर यांनी देखील या फेरीसाठी शुभेच्छा पर भेट दिली. यावेळी स्पीकरवर देशभक्तीपर गीते आणि विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या दिलेल्या घोषणांनी राशीन शहरातील मुख्य बाजारपेठ दणाणुन गेली होती. या जनजागृती फेरीसाठी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्यासोबत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी विशेष योगदान दिले.