रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या कृषी दुतांकडून बोर्डो पेस्ट तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन
प्रतिनिधी/ अजिनाथ कनिचे
इंदापूर तालुक्यातील वरकुटे खुर्द येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या कृषी दुतांच्या वतीने बोर्डो पेस्ट तयार करण्यासाठीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.
तेव्हा कृषी महाविद्यालयातील आलेले कृषिदूत विराज मगर, श्रीनिवास चौधरी, रणजितसिंह भगत ,विकास भुई, आकाश शेलार ,औदुंबर शिंदे, स्वप्निल ताम्हाणे यांनी बोर्डो पेस्ट कसे तयार केले जाते याचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
चुना ,मोरचूद व पाण्याचा योग्य प्रमाणातील मिश्रणाला बोर्डो पेस्ट म्हणतात. हे मिश्रण प्रभावी बुरशीनाशक असून वेगवेगळ्या तीव्रतेच्या बोर्डो मिश्रणाचा फवारणी व झाडाच्या बुंध्याला लावण्याकरता वापर केला जातो. वर्षातून कमीत कमी दोन वेळेस बुंध्यांना बोर्डो पेस्ट (मलम)लावावी .
बोर्डो पेस्ट (मलम )साठी एक किलो स्वच्छ मोरचूद पूड, व एक किलो कळीचा चुना प्लास्टिकच्या वेगवेगळ्या बादलीत किंवा मडक्यात पाच- पाच लिटर पाण्यात रात्रभर भिजत घालावे. तसेच बुरशीमुळे होणारे मुळकुज ,खोडकूज, मर इत्यादी रोगांच्या नियंत्रणासाठी बोर्डो मिश्रण एक टक्के हे उत्तम बुरशीनाशक आहे असे कृषी दुतांनी पटवून दिले. तसेच मिश्रण तयार करताना कोणत्याही धातूच्या भांड्याचा वापर करू नये, फवारणी होईपर्यंत प्लास्टिक ड्रम मध्ये मिश्रण साठवावे .मिश्रण ढवळताना लाकडी किंवा प्लास्टिक काठीचाच वापर करावा इत्यादी काळजी घ्यावी. असे कृषी दूतांनी शेतकऱ्यांना सांगितले.
