मुंबई मेट्रो-३ च्या आरे कॉलनी इथल्या कारशेडचं काम प्रगतीपथावर
प्रतिनिधी-अर्जुन आहेर
मुंबई मेट्रो-३ च्या आरे कॉलनी इथल्या कारशेडचं काम प्रगतीपथावर असून पुढल्या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत मेट्रो-३ चा सीप्झ ते बीकेसी हा पहिला टप्पा प्रवाशांसाठी खुला होईल असा विश्वास एमएमआरसी, अर्थात मुंबई मेट्रो रेल कोर्पोरेशननं व्यक्त केला आहे.
आंध्रप्रदेशात अल्स्टोम इथल्या कारखान्यातून मेट्रो-३ च्या गाडीचे डबे घेऊन येणारे ८ ट्रेलर मुंबईसाठी रवाना झाले असून लवकरच ते मुंबईत दाखल होणार आहेत. या गाडीच्या चाचण्या घेण्यासाठी अवश्यक तयारी देखील सुरु असल्याचं एमएमआरसीनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
आरे कॉलनीमधल्या मेट्रो कारशेडच्या कामावरची स्थगिती गेल्या २१ जुलै रोजी सरकारनं हटवली असून सर्वोच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय आणि राज्य सरकारनं दिलेल्या आदेशांचं पालन करत या ठिकाणी वेगानं काम सुरु झाल्याचं यात म्हटलं आहे.