“ज्ञानोबा-तुकोबांच्या” जयघोषात रंगला प्राथमिक शाळेचा दिंडी सोहळा
प्रतिनिधी – प्रा. तुषार वाबळे
” बारे पांडुरंगा केव्हा भेट देशी झालो मी परदेशी तुजविण
ओवाळावी काया चरणावरोनि
केव्हा चक्रपाणी भेटशील
तुका म्हणे माझी पुरवावीआवडी वेगें घाली उडी नारायणा ||
” दोन वर्षांच्या खंडानंतर माउली, माउलीच्या जयघोषात आणि टाळ मृदंगाच्या निनादात संतांच्या पालख्यांसोबत लाखो वारकरी पंढरीच्या वाटेवर निघाले आहेत. विठुरायाच्या भेटीची आस कोणालाच सुटत नाही याची अनुभूती आज पुन्हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळे वस्ती शेटफळगडे यांच्या वतीने आयोजित दिंडी सोहळा पाहिल्यावरती शेटफळगडे व पंचक्रोशीतील आबालवृद्धांना आली.या सोहळ्याची सुरुवात शेटफळगडे गावच्या नवनिर्वाचित सरपंच सौ शितल धुमाळ आणि निरगुडे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री हनुमंत देवकाते तसेच उपस्थित पालकांच्या हस्ते विठ्ठलाच्या प्रतिमेचे आणि विठ्ठलाचे व रुक्मिणीचे रूप धारण केलेल्या बालकांचे पूजन करून झाली.

टाळ-मृदंगाच्या तालावर भजनात दंग बाल वारकऱ्यांची पाऊले…. ज्ञानोबा माऊली’, ‘माऊली, माऊली चा गजर…… डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या पताका घेतलेले बाल वारकरी… अशा भक्तिमय वातावरणात प्राथमिक शाळेतून दिंडी सोहळ्याने प्रस्थान केले. पुढे हा सोहळा विविध ठिकाणाहून बस स्टॅन्ड वरून श्री नागेश्वर हायस्कूल च्या मैदानात येऊन विसावला. यावेळी श्री नागेश्वर विद्यालयाचे प्राचार्य श्री भिसे सर आणि त्यांचे सहकारी यांनी पालखी आणि दिंडीचे स्वागत करून प्रतिमा व विठ्ठल-रुक्मिणीचे पूजन केले .यावेळी प्रांगणात वारकरी बनलेल्या सर्व बालगोपाळांनी रिंगण सोहळा पार पाडला. त्याचबरोबर उपस्थित पालक तसेच महिला पालक ,महिला शिक्षिका यांनी अभंग, ओव्या गात फुगड्यांचा आस्वाद घेतला.
शेटफळ गडे गावच्या माजी उपसरपंच सौ.अर्चना कुंभार तसेच नागेश्वर विद्यालयातील शिक्षकांनी मार्फत विद्यार्थ्यांना खाऊ तर माजी सैनिक श्री लहू वाबळे व श्री राहुल राऊत यांच्या तर्फे नाश्त्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी वाबळे वस्ती शाळेच्या शिक्षिका सौ.कारंडे मॅडम, सौ.चंदाराणी पाठक मॅडम, सौ.प्रतिभा कांबळे मॅडम आणि अंगणवाडी सेविका श्रीमती तांबे मॅडम ,श्रीमती कदम मॅडम यांनी या संपूर्ण सोहळ्याचे उत्कृष्ट आयोजन केले . तर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री रामदास कदम यांचे देखील या सोहळ्यास सहकार्य लाभले. त्याचबरोबर शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी देखील मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभाग नोंदवला व अशा उपक्रमशील शाळेतील सर्वांचे अभिनंदन केले.