शिवसंपर्क अभियानात माझे “न” झालेले भाषण
सध्या शिवसंपर्क अभियान जोरात सुरू आहे. शिवसैनिक वाढावेत हा या मागील उद्देश आहे. कोणत्याही पक्षाच्या वाढीसाठी सदस्य संख्या वाढवणे आवश्यक असते.हे नवीन सदस्य म्हणजे त्या पक्षाचे भावी मतदार असतात.परंतू शिवसैनिक वाढवणे आणि सदस्य वाढवणे या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. शिवसैनिक अशा मोहिमेतून नव्हे तर बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावी विचारातून व शिवसेनेच्या आकर्षणापोटी शिवसेनेकडे उत्स्फूर्तपणे आकर्षित होत असतात.त्यांना शिवबंधनात जखडून किंवा संपर्क मोहिमेतून शिवसैनिक बनवता येत नाही. अशा मोहिमेतून सदस्य बनवता येतात पण शिवसैनिक नव्हे.हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली तेव्हा असे कोणतेही अभियान राबवले नव्हते. साप्ताहिक मार्मिक मधील जळजळीत लेखांमुळे त्यावेळी एक रूपया वर्गणी भरून हजारो शिवसैनिक झाले.शिवसेनेच्या निधीत दहा रूपये देणगी देणा-याचे नांव मार्मिकच्या पहिल्या पानावर ठळकपणे झळकले होते. दीपकाकडे झेपावणारा भुंगा, मधमाश्यांचे मोहोळ म्हणजे शिवसैनिक. जसा भुंगा दीपकाकडे झेपावताना परिणामांची पर्वा करीत नाही, तसाच शिवसैनिक असतो. मधमाश्या कष्टाने मध गोळा करून मधाचे पोळे तयार करतात जशी शिवसैनिकांच्या बलिदानाने त्यागाने शिवसेना मधमाश्यांच्या पोळ्याप्रमाणे समृद्ध झाली.या पोळ्यावर कोणी दगड मारून फोडण्याचा प्रयत्न केला असता ज्या त्वेशाने व एकजूटीने मधमाश्या जीवाचा आकांत करून तुटून पडतात, ते म्हणजे शिवसैनिक. जसा भुंगा आकर्षित करण्यासाठी वा मधमाश्या जमवण्यासाठी कोणतेही अभियान घ्यावे लागत नाही, तद्वतच कोणत्याही अभियानाने शिवसैनिक घडत नसतात.
आज शिवसेना हा सत्ताधारी पक्ष आहे, मधाने काठोकाठ भरलेले मधाचे पोळे आहे,त्यामुळे हा ‘मध’ चाखण्यासाठी अनेक लोक आकर्षित होत असतात. सत्तास्थानं,पदं संपादन करण्याचे माध्यम म्हणून शिवसेनेकडे पाहत आहेत. आपल्या मातृ-पितृ पक्षाशी गद्दारी करून शिवसेनेत डेरेदाखल होऊन पदांचा उपभोग घेत आहेत. उद्या सुगीचे दिवस संपले की,यातील किती लोक शिवसेनेत टिकून राहतील?
आजवर शिवसेनेने ज्यांना जास्तीत जास्त पदं मान सन्मान मिळवून दिला तेच शिवसेनेशी बेईमान झाले.हेमचंद्र गुप्ते, सतिश प्रधान, गणेश नाईक, छगन भुजबळ, नारायण राणे, बाळा नांदगावकर, यांना शिवसेनेने काय दिले नाही ? कोणी कोंबडी विक्या, ह-या ना-या गॅन्गचा नायक, कोणी भाजी विक्या, होता.त्यांना शिखरावर नेले शिवसेनेने आणि त्यांनीच शिवसेना संपविण्याचा विडा उचलला.
अंबरनाथ येथील एका मेळाव्यात मी पंचवीस वर्षापुर्वी केलेले भाषण आजही जुन्या शिवसैनिकांनाआठवत असेल. व्यासपीठावर शिवसेनेचे दिग्गज नेते होते.शिवसैनिकांनी आपले मनोगत मांडावे हा या मेळाव्याचा उद्देश होता. शिवसैनिक ” मी बोलावे” असे संयोजकांना ओरडून सांगत होते.सूत्रसंचालन माजी नगराध्यक्ष विजय पवार करीत होते.साबीरभाई शेख हे त्यावेळी कामगार मंत्री होते. व्यासपीठाचे नियंत्रण त्यांच्याकडे होते.ते विजय पवारांना बोलले दिलीपला माईक देऊ नको.खालून शिवसैनिक आग्रह करीत होते.मी सरळ उठलो व माईकचा ताबा घेतला.आणि माझे घणाघाती उत्स्फूर्त मनोगत सुरू झाले. सुरूवातीसच मी बोललो, व्यासपीठावर जे दिग्गज बसले आहेत ते शिवसेनेच्या पुण्याईमुळे.शिवसेनेत येण्यापूर्वी ते दगड होते, बाळासाहेबांनी त्यांना शिवसेनेचा शेंदूर फासला तेंव्हा ते नेते झाले. या नेत्यांनी शिवसैनिकांना काय दिले ? किती शिवसैनिकांना समिती वा पदं दिली.किती शिवसैनिकांना साधे एसईओ केले ? किती शिवसैनिकांना नोकरीला लावले, किती शिवसैनिकांना स्वयंरोजगार मिळवून दिला ? किती शिवसैनिकांना स्वीकृत सदस्य केले ? किती शिवसैनिकांना महामंडळावर नेमले ? माझ्या प्रत्येक वाक्यावर शिवसैनिक टाळ्यांचा कडकडाट करीत होते, व्यासपीठावर बसलेले नेते अस्वस्थ झाले होते. अवघड जागेवरील दुखण्याप्रमाणे माझे अस्तित्व झाले होते ? आमचे शिवसैनिक म्हणतात शहर प्रमुख द्या, तर सांगितले जाते पर्याय द्या.मी म्हणतो, कोणताही दगड द्या ! त्याला शिवसेनेचा शेंदूर फासला की तो यशस्वी शहरप्रमुख होईल.
मी बोलत गेलो व शिवसैनिक ऐकत गेले.मला” बस” म्हणायचे कोणाचे धाडस झाले नाही.कारण मी शिवसैनिकांच्या दडपल्या गेलेल्या भावनांना वाचा फोडत होतो. जे इतर कोणाला शक्य नव्हते. माझ्या भाषणानंतर मेळाव्याचा एकंदर नूरच पालटला.माझ्या नंतर जे नेते बोलले ते माझ्या भाषणाचा धागा धरून.मधुकर सरपोतदार यांनी तर तुफान फटकेबाजी केली.शिवसैनिकांच्या नजरेत मी हिरो ठरलो होतो तर स्थानिक नेत्यांच्या नजरेत मी खलनायक भासत होतो.
या प्रसंगाची आठवण यंदाच्या शिवसंपर्क अभियानामुळे झाली. शिवसेनेची सत्ता आली पण शिवसैनिक वंचितच राहिले.इतर पक्षातून आलेले आता शिवसेनेचे मंत्री आहेत.बाळासाहेबांना आव्हान देणारे छगन भुजब आज शिवसेनेच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत. प्रताप सरनाईक सारखा माजी राष्ट्रवादी आता आमदार, प्रवक्ता व त्याची पत्नी व मुलं शिवसेनेची पदं उपभोगत आहेत. शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामनात पगारी नोकर म्हणून लागलेले संजय राऊत तीन तीन वेळा राज्यसभेवर नेमले जातात,प्रमुख प्रवक्ता म्हणून मिरवतात, यांनी शिवसेनेसाठी काय त्याग केला ? किती आंदोलनं केली ?शिवसेना वाढीत या दोघांचे योगदान काय ? याचे उत्तर शिवसैनिकांना हवे आहे ? ही दोन मोठी उदाहरणं.प्रत्येक शहरात व गावात हीच परिस्थिती आहे. एकाच घरात आमदार, मंत्री , खासदार व नगरसेवक असल्याची असंख्य उदाहरणे आहेत. मग शिवसैनिकांनी काय त्यांचे बाॅडिगार्ड, ड्रायव्हर व झेंडे मिरवत पताके लावत आयुष्य भर वंचित म्हणून जगायचे.शिवसैनिक म्हातारा झाला तरी त्याला काही मिळत नाही.नाही म्हणायला “ज्येष्ठ शिवसैनिक” हा तकलादू किताब मिळतो.
एकाच घरात किती पदं द्यावित, एकाच व्यक्तीला कितीवेळा तिकिट द्यावे ? हे या निमित्ताने धोरण म्हणून जाहिर झाले पाहिजे. स्वीकृत सदस्य कोणाला नेमायचे? शिवसैनिकाला की सौदेबाजांना ? आमच्या येथे केके या नावाने कुप्रसिद्ध असलेल्या वादग्रस्त व्यक्तीस स्वीकृत नगरसेवक केले होते.शिवसैनिक म्हणून नव्हे तर धनाढ्य व्यक्ती म्हणून. यंदाही एकाच प्रभागात जेथे चार नगरसेवक
निवडून आले तिथेच अजून दोन स्वीकृत नगरसेवक नेमण्यात आले. यामुळे शिवसेना कशी वाढेल ? स्वीकृत नगरसेवक नेमताना उल्हासनगर पुर्व व पश्चिम असा विचार करून दोन शिवसैनिकांना स्वीकृत नगरसेवक केले पाहिजे होत.तसेच ज्या विभागात शिवसेनेचे कार्य चांगले आहे परंतू तिथे नगरसेवक निवडून येत नाही,अशा विभागात नगरसेवक नेमायला हवे. जेणे करून त्या विभागाला नगरसेवक लाभल्याने शिवसैनिकांचे मनोबल उंचावून नागरी सुविधा विषयक कामं होतील व पुढील निवडणूकीत शिवसेनेचे नगरसेवक वाढतील.परंतू असा विचार केला जात नाही व मी मांडला तर रोष पत्करावा लागतो.
जे शिवसैनिक हुशार आहेत, कायदा जाणतात, महापालिका कामकाजाची माहिती आहेत, अशा पात्र शिवसैनिकांना डावलून लाळघोट्या व वशिल्याच्या लोकांना स्वीकृत नगरसेवक पद बहाल केले गेले तर शिवसेना कशी वाढेल.मुंबई, ठाणे परिसरात अशी अनेक उदाहरणं आढळून येतात. आज अनेक नगरसेवक पाच पाच वेळा निवडून आले.एकेका घरात तीन-चार पदं आहेत, मग वर्षानुवर्षे कार्यरत असलेल्या शिवसैनिकांनी काय फक्त गर्दीचा एक ठिपका म्हणून राबत रहायचे ? पदाधिकारी नेमताना काही काल मर्यादा हवी. शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने कानसेन नव्हे तर कान टोचणा-यांची गरज आहे. शिवसंपर्क मोहिमेत सदस्य संख्या निश्चितपणे वाढेल पण शिवसैनिक वाढतील का ? जे पुर्वपार शिवसैनिक आहेत व काही कारणाने दुरावले असतील तर त्यांना जवळ करा, जे शिवसैनिक हयात नाहीत त्यांच्या वारसांना भेटून शिवसैनिक करून घ्या, कारण त्यांच्या रक्तात शिवसेना भिनलेली आहे. शंभर सदस्यांपेक्षा असे दहा कट्टर शिवसैनिक लाख मोलाचे असतील.
या शिवसंपर्क मोहिमेत ज्येष्ठ शिवसैनिकांना भेटणे,विश्वासात घेणे व त्यांचे मार्गदर्शन घेणे अपेक्षित आहे. आजवर किती ज्येष्ठ शिवसैनिकांशी संपर्क केला ? कल्याणचे काका हरदास, अंबरनाथ चे दाजी बनकर, उल्हासनगरचे रमेश मुकणे, तुकाराम सांडगे, प्रकाश माळकर अशा किती ज्येष्ठ शिवसैनिकांची भेट घेतली ? माझ्या माहितीनुसार कोणाचीच भेट घेतली नाही ?माझी भेट घेण्याचा विचारही ते करू शकत नाहीत. मला माईक देणार नाही पण माझी लेखणी कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. शिवसंपर्क मोहिमेत माना डोलावण्यापेक्षा माझे हे कटू डोस निश्चितच शिवसंपर्क मोहिमेत यशस्वी करण्यासाठी उपयुक्त ठरतील.
जय हिंद ! जय महाराष्ट्र !
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार
9822902470