राज्यात हिंदू खाटीक समाजास अनुसूचित जाती प्रमाणे सर्व सवलती लागू कराव्यात
राज्यात हिंदू खाटीक समाजाची हिंदू खाटीक, कलाल खाटीक, धनगर खाटीक अशी विभाग निहाय वेगवेगळी नावं आहेत. तसंच काही भागात अनुसूचित जातीशिवाय ओबीसी आणि अन्य पोट प्रवर्गातून आरक्षण दिलेलं आहे. हिंदू खाटीक प्रवर्गातील सर्व नावं एकाच प्रवर्गातली असल्याचं ग्राह्य धरून त्यांना अनुसूचित जाती प्रमाणे सर्व सवलती लागू कराव्यात, यासाठी राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागामार्फत केंद्र सरकारला परिपूर्ण प्रस्ताव शिफारशीसह पाठवला जाणार असल्याची माहिती, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. ते आज महाराष्ट्र राज्य हिंदू खाटीक मागासवर्गीय सामाजिक संघटनेच्या नेत्यांबरोबर या संदर्भात झालेल्या बैठकीत बोलत होते. या संदर्भात बार्टीनं सादर केलेल्या अभ्यास अहवालात काही त्रुटी असल्याचं मुंडे यांनी नमूद करत सदर त्रुटींची १५ दिवसांच्या आत पूर्तता करून सुधारित अहवाल दाखल करण्याचे निर्देश बार्टीला दिले.