June 30, 2025 4:30 pm

राज ठाकरेंना तलवार द्यायची नाही तर काय दांडिया भेट द्यायचे का?

अपनी भाषा में पढ़े! Translate

तलवार देणे घेणे हा आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा कसा असू शकतो ?

दोन दिवसापुर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची दणकेबाज उत्तर सभा झाली.या सभेस असलेली उपस्थिती देखील विरोधकांचे डोळे पांढरे करणारी होती.या सभेत राज ठाकरे यांचे ठाकरी शैलीत कधी ओरखडे काढणारे,कधी वा़भाडे काढणारे तर कधी मिश्किल शैलीत विरोधकांची टर उडवणारे व आपली भूमिका ठणकाऊन मांडणारे भाषण झाले. स्वर्गीय हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेबांच्या शैलीची आठवण राज ठाकरे यांचे भाषण ऐकताना नेहमीच होते. त्यामुळे राज ठाकरे यांचे भाषण ऐकणे ही एक पर्वणी असते. पुर्वी एका पेक्षा एक दमदार भाषण करणारे नेते होते. अटल बिहारी वाजपेयी, सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख,प्रमोद नवलकर,दत्ताजी साळवी,मधुकर सरपोतदार, व भाषाप्रभू वामनराव महाडिक ही दमदार भाषण करणारी फळी अस्तंगत झाली. महाराष्ट्रात आता राज ठाकरे इतका प्रभावी राजकिय वक्ता दुसरा कोणी दिसत नाही.अशा या राज ठाकरे यांच्या भाषणाचे चाहते अगणित आहेत. ते सर्वच मनसेचे सैनिक असतात असे नाही.श्रोत्यांना खिळवून ठेवण्याची व मंत्रमुग्ध करण्याची कला त्यांना अवगत आहे.एखाद्याची नक्कल/ मिमिक्री करणे हा त्याचाच भाग आहे. ठाण्यातील सभेत त्यांच्या चाहत्यांनी एक तलवार भेट दिली.सदर तलवार उंचावून राज ठाकरे यांनी उपस्थित जनसमुदायास एक प्रकारे अभिवादन केले. यात आर्म अॅक्ट लागू होण्याचे कोणतेही कारण प्रथम दर्शनी तरी दिसत नाही. सभा दणक्यात व विरोधकांच्या नाकावर टिच्चून यशस्वी झाली व कोणताही गैरप्रकार घडला नाही. मग राज ठाकरे व त्यांच्या जिल्हाप्रमुख व शहर प्रमुखा विरोधात नौपाडा पोलीसांनी आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला.वास्तविक कोणत्याही कृती मागचा हेतू गुन्हेगारी स्वरूपाचा असेल तर गुन्हा दाखल होतो.न्याय निवाडा करताना मा.न्यायमूर्ती देखील हेतू Intension पाहूनच निर्णय देतात. जर एखाद्या कृत्यात गुन्हेगारी हेतू नसेल तर त्याला दोषी मानता येणार नाही. ठाण्यातील सभेत कोणी चाहता तलवार भेट देईल,याची राज ठाकरेंना कल्पना देखील नसेल. व्यासपीठावर सत्कार स्वागत सुरू असताना चाहत्यांपैकी कोणी तलवार भेट दिली व ती स्विकारून जनसमुदयास अभिवादन केले तर आर्म अॅक्ट कसा काय लागू होतो ? तलवार देणा-यांना आपल्या नेत्यास शौर्य व पराक्रमाचे प्रतिक असलेली तलवार भेट देऊन स्वागत करावेसे वाटले तर त्यात गैर काय आहे ? तलवार भेट देण्याची परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आहे. भवानी मातेने छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार भेट दिली होती, पुर्वी्या महिला आपल्या पतीला तलवार देऊन युद्धावर पाठवून सुहास्यवदनन निरोप देत असत.हे तरी आठवते का ?खुद्द बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,शरद पवार,आदित्य ठाकरे, इंदिरा गांधी अशा अनेक नेत्यांना वेळोवेळी तलवार भेट दिली गेली आहे. नव्हे ती तर महाराष्ट्राची परंपराच आहे. मग राज ठाकरे व त्यांच्या चाहत्यांनी तलवार भेट दिली घेतली तर इतका गाजावाजा का केला जात आहे ? याला मराठीत रडीचा डाव म्हणतात ! राज ठाकेरेंना तलवार भेट द्यायची नाही तर काय दांडिया भेट द्यायचा का ? उगाच थातुरमातर गुन्हे दाखल करून नंतर तोंडघशी पडण्यात काय अर्थ आहे.जे सरकार जेलमधे असेलेल्या आपल्या मंत्र्याला,ज्याची कोट्यवधीची मालमत्ता जप्त होऊनही अद्याप मंत्री पदावरून काढू शकत नसेल त्यांनी आर्म अॅक्टचा बागुलबुवा करून थयथयाट करू नये !

दिलीप मालवणकर (ज्येष्ठ पत्रकार)

९८२२९०२४७०

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!