नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची जामखेडमध्ये परिवार संवाद यात्रा
प्रतिनिधी.संदिप कायगुडे
जामखेड | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे शुक्रवार दिनांक 8 एप्रिल रोजी जामखेड दौऱ्यावर येणार आहेत. जामखेड नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे शुक्रवारी राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी व पक्षाची पुढील रणनीती आणि दिशा काय असतील या बाबत या वेळी जयंत पाटील साहेब कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
जामखेड येथील राज लॉन्स येथे राष्ट्रवादी काँग्रेस परिवार संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी हा कार्यक्रम पार पडणार असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिवार संवाद यात्रा आयोजित केल्याने राष्ट्रवादी पक्षाने मोर्चेबांधणीला सुरुवात केली असल्याचे बोलले जात आहे.