खासदार संजय राऊत यांचं राहतं घर तसंच निकटवर्तियांच्या ११ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर ईडीची टाच
प्रतिनिधी-अर्जुन आहेर
ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं शिवसेना खासदार संजय राऊत यांचं दादर इथलं राहतं घर आणि अलिबाग जवळच्या ८ जमिनी ताब्यात घेतल्या आहेत. हे घर संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या नावावर तर जमीन वर्षा राऊत आणि स्वप्ना पाटकर यांच्या संयुक्त मालकीची आहे.
किहिम इथल्या जागेच्या पाहणीसाठी ईडीचे ५-६ अधिकारी-कर्मचाऱ्यांचं पथक गेलं आहे. गोरेगावातल्या पत्राचाळीच्या पुनर्विकासातल्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांची चौकशी सुरू आहे. त्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. प्रवीण राऊत यांच्या जमिनीही ईडीनं ताब्यात घेतल्या आहेत. या मालमत्तेची एकूण किंमत ११ कोटींहून अधिक आहे.
यावर ‘असत्यमेव जयते’ अशी प्रतिक्रिया राऊत यांनी ट्विटरवर दिली आहे. यातून काहीही आश्चर्य वाटलेलं नाही. अशाप्रकारची कारवाई होणार हे आधीपासूनच माहिती होतं. त्यामुळंच उपराष्ट्रपतींना पत्र लिहून यासंदर्भातली माहिती दिली होती, असं राऊत म्हणाले. कष्टाच्या पैशातून या मालमत्तेची खरेदी करण्यात आली असून केवळ सूडाच्या राजकारणातून ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप राऊत यांनी केला.