बारामतीत संजय गांधी, श्रावणबाळ व इंदिरा गांधी योजनेची २३१ प्रकरणे मंजूर
बारामती (विशेष प्रतिनिधी-संदिप आढाव)
संजय गांधी योजना समितीची संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्ती योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना लाभार्थी निवड सभा दि. २८ मार्च २०२२ रोजी बारामती संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष धनवान वदक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी संजय गांधी योजनाचे १६२ अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी १५४ अर्ज मंजुर करण्यात आले व आठ नामंजूर करण्यात आले. श्रावणबाळ योजना ७१ अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी ६५ अर्ज मंजूर करण्यात आले व सहा नामंजूर करण्यात आले. त्याचप्रमाणे इंदिरा गांधी योजनेचे १२ अर्ज प्राप्त झाले होते ते सर्व अर्ज मंजूर करण्यात आले. एकूण प्राप्त २४५ अर्जांपैकी २३१ प्रकरणे सर्वानुमते मंजूर करण्यात आली. तर १४ प्रकरणे नियम व अटी मध्ये न बसल्याने नामंजूर करण्यात आली.
तसेच बारामती तालुक्यातील संजयगांधी योजना, श्रावणबाळ योजना व इंदिरा गांधी योजनेतील एकूण पात्र १०,७७७ लाभार्थ्यांचे एकूण अनुदान १,०४,५९१०० रुपये अनुदान पैकी प्रति महिना प्रमाणे मार्च अखेर पर्यंतचे सर्व अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती संजयगांधी निराधार योजनेचे अध्यक्ष धनवान वदक व तहसीलदार विजय पाटील यांनी दिली.
यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अध्यक्ष धनवान वदक, सचिव तथा तहसीलदार विजय पाटील, नायब तहसीलदार सुवर्णा ढवळे,सदस्य सुनिल बनसोडे, शिवराज माने, शहाजी दळवी, निलेश मदने,प्रविण गालिंदे, सदस्या नुसरत इनामदार,जीवना मोरे तसेच लिपिक स्वप्नील जाधव, मदतनीस तृप्ती घोडके इत्यादी उपस्थित होते.