भिगवण-शेटफळ गटातून दिग्गज नेत्यांची फळी करणार राष्ट्रवादीत प्रवेश:राणिताई आढाव यांचा प्रवेश निश्चित
(निलेश गायकवाड)
भिगवण (दि.20) : पुणे जिल्हा परिषद व इंदापूर पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या इंदापूर तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापायला लागले आहे. भाजप व इतर पक्षाच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बहुतांश कामात कमालीची आघाडी घेतल्याचे चित्र आहे. त्याचाच एक भाग म्हणून येणाऱ्या काळात होणाऱ्या शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या इंदापूर येथील मेळाव्यात तालुक्यातील दिग्गज नेते पक्ष प्रवेश होणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे.प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये इनकमींग जोमात आहे. त्यामुळे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाबाहेर फटाक्यांची चांगलीच आतषबाजी बघायला मिळणार असल्याच्या चर्चेला सध्या कार्यकर्त्यांमध्ये उधाण आले आहे.
राज्याचे जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लोकांच्या टीका टिप्पणीकडे दुर्लक्ष करून निवडणुकीच्या तयारीला लागा अशा प्रकारचा आदेश नुकताच झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात दिल्याचे दिसून आले होते . त्यामुळे इंदापूर करांना आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे साहेबांच्या मेळाव्याची . असे असले तरी इंदापूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मात्र गेल्या काही महिन्यांपासून आधीच निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
भिगवण- शेटफळगढे जिल्हा परिषद गटातील मा. जिल्हा परिषद सदस्या राणीताई आण्णासाहेब आढाव यांचा पक्षप्रवेश येत्या ३ एप्रिल रोजी लाखेवाडी येथे राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्यात आपण राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे .
आढाव यांनी बोलताना सांगितले की,आपण जिल्हा परिषद सदस्या असताना विविध उपक्रम राबवुन अनेकांना वैयक्तिक स्वरूपाच्या योजना मंजुर केल्या होत्या तसेच कोट्यावधी रुपयांचा निधी मतदार संघात खेचुन आणला होता. गेल्या दहा वर्षाच्या काळात पक्षाशी प्रामाणिकपणे व निष्ठेने काम केले होते परंतु आपल्या प्रामाणिकपणेच्या कामाची दखल न घेता तसेच आपल्याला सन्मानाची वागणुक न दिल्यामुळे आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारसाहेब यांचा विचाराशी सहमत होऊन तालुक्याचे भाग्यविधाते ना. दत्तात्रय भरणे यांच्या विकास कामाकडे पाहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत आहोत.
राणीताई आढाव यांनी २०१२ साली काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर जिल्हा परिषद निवडणुक लढवली होती व या निवडणुकीत त्या विजयी झाल्या होत्या.तसेच त्यांचे पती आण्णासाहेब बापुराव आढाव यांनी तक्रारवाडी ग्रामपंचायतचे २००४ साली सरपंचपद भुषवले होते.
भिगवण शेटफळ गटातील भाजप मधील दिग्गज नेते करणार प्रवेश
सध्या येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती व ग्रामपंचायती या निवडणुकीचे वारे वाहत असल्याने व आपल्या पक्षातून मिळणारी असमाधानकारक वागणूक व गटातटाच्या राजकारणामुळे विविध कार्यकर्ते व दिग्गज नेते राष्ट्रवादीच्या गळाला लागल्याचे बोलले जात आहे त्यामुळे भिगवण शेटफळ गटातून भाजप पक्षातून कोणते व किती दिग्गज नेते प्रवेश करणार हे मात्र अजून देखील गुलदस्त्यात असल्याचे चित्र दिसत आहे.
पक्षप्रवेश मोठ्या थाटामाटात होणार असल्याच्या चर्चा
महिला- पुरुष, युवक- युवती शाखांचे उद्घाटन, जुन्या नवीन पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश, विविध विकासकामांचे उद्घाटन, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या शेतकरी आंदोलन व मोर्चे व त्यामुळे इंदापूर तालुक्यात निर्माण झालेले तणावपूर्ण वातावरण आणि विद्यमान राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची कोट्यवधी रुपयांची विकासकामे व उदघाटने व कार्यक्रमाचा सपाटा सुरू आहे. असे असताना आता मात्र लवकरच एका आजी ,माजी दिग्गज नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश मोठ्या थाटामाटात होणार असल्याच्या चर्चेला सध्या कार्यकर्त्यांमध्ये उधाण आले आहे.